कोरोनामुळे जगभरात झालेल्या मृत्यूंपैकी 15 टक्के मृत्यूंना वायू प्रदूषण कारणीभूत ठरले आहे, असा खुलासा राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) केला असून, त्याकडे गांभीर्याने पाहायला हवे. फटाक्यांवर निर्बंध घालण्याविषयी सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ही माहिती एका अहवालाच्या हवाल्याने देण्यात आली. सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घातली जावी आणि जर कुणी नियमांचे उल्लंघन केले तर 1 लाख रुपये दंड वसूल करण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. दिवाळीत फटाक्यांवर पूर्णपणे निर्बंध घालणे अवघड आहे. याचे कारण असे की, गेल्या वर्षी काही याचिकाकर्त्यांनी फटाक्यांवर बंदी घातल्यानंतर हरित लवादाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा विचारात घेऊन सर्वोच्च न्यायालय यासंदर्भात काहीतरी महत्त्वाचा निर्णय देईल, अशी अपेक्षा त्यावेळी होती; परंतु न्यायालयाने 2005 च्या मार्गदर्शक नियमावलीवर बोट ठेवून फटाके फोडण्यावर पूर्णपणे निर्बंध घालण्यास नकार दिलाच; शिवाय सणासुदीच्या काळात फटाके फोडणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून, तो हिरावून घेता येणार नाही असे सांगून फटाके फोडणे न्यायसंगत ठरविले. अर्थात, फटाक्यांच्या दुष्परिणामांविषयी व्यापक प्रचार-प्रसार न केल्याबद्दल न्यायालयाने केंद्र सरकारवर टीकाही केली. तसे पाहायला गेल्यास सरकार आणि काही स्वयंसेवी संस्था फटाके न फोडण्याच्या विषयावर बर्‍याच वर्षांपासून प्रबोधन करीत आहेत; परंतु अशा अनेक मोहिमा होऊनसुद्धा दरवर्षी दिवाळीला मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात आणि त्यामुळे वातावरणाचे प्रदूषण होते.
दिवाळीच्या आसपास श्वसनाचे आजार असणार्‍यांचा त्रास वाढतो. फटाक्यांच्या धुरात नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डाय ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, अ‍ॅस्बेस्टॉस याखेरीज अत्यंत विषारी रासायनिक घटक असतात आणि ते आपल्यासाठी आत्यंतिक धोकादायक असतात. कफ, अस्थमा, ब्राँकायटिस, न्यूमोनिया, एम्फिसिया, डोकेदुखी,
फुफ्फुसांचा कर्करोग, डोळ्यांची जळजळ, श्वसननलिकेतील ें
इन्फेक्शन अशा अनेक प्रकारचे आजार यामुळे होतात. फटाक्यांमध्ये विषारी घटकांचे प्रमाण अधिक असल्यामुळे फुफ्फुसांची क्षमता कमी होते. फटाक्यांचा धूर पेशींच्या नाशाला कारणीभूत ठरतो आणि त्यामुळे फुफ्फुसांची ऑक्सिजन ग्रहण करण्याची तसेच कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जित करण्याची क्षमता कमी होते. विषारी फटाक्यांमुळे शरीरात विषाणू आणि जीवाणूंचा संसर्ग वाढण्याचा धोका असतो. त्याखेरीज फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषणाची समस्याही वाढते. फटाके फोडले जात असताना आवाजाचा स्तर 15 डेसिबलने वाढतो आणि त्यामुळे श्रवण क्षमता कमी होते. त्याचबरोबर कानाचे पडदे फाटणे, रक्तदाब वाढणे, हृदयविकाराचा झटका येणे अशा समस्या उद्भवू शकतात. जर सर्वसामान्य लोकांना फटाक्यांमुळे होणार्‍या दुष्परिणामांविषयी तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 बाबत आणि ध्वनिप्रदूषणाबाबत जागरूक केले गेले तर त्यांच्यात वातावरणाविषयी संवेदनशीलता वाढीला लागेल.
मानवनिर्मित प्रदूषणामुळे दरवर्षी सुमारे चार लाख सत्तर हजार लोक मृत्युमुखी पडतात, असे आकडेवारी सांगते. मानवनिर्मित प्रदूषणामुळेच आज भारतातील अनेक शहरे प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. राजधानी दिल्ली सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक ठरली आहे. जर फटाक्यांच्या ऐवजी दिव्यांच्या माध्यमातून दीपावलीचा उत्सव साजरा केला तर वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल आणि कोट्यवधी रुपयांचा अपव्यय टळेल. गेल्या काही वर्षांत वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण घटून घातक वायूंचे प्रमाण वाढले आहे, हे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण सुमारे 25 टक्क्यांनी वाढले आहे. यामुळे अत्यंत घातक आजार तर पसरत आहेतच; शिवाय वातावरणही प्रचंड प्रमाणात प्रदूषित होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे कारखाने आणि उद्योगधंद्यांमध्ये केला जाणारा कोळशाचा आणि खनिज तेलांचा वापर होय. या इंधनाच्या ज्वलनामुळे सल्फर डाय ऑक्साइड वायू उत्सर्जित होतो आणि तो मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. शहरांचा वाढता विस्तार, कारखान्यांमधून निघणारा धूर, वाहनांची वाढती संख्या आणि
मेट्रोचे पसरत चाललेले जाळे या कारणांमुळे प्रदूषणाचा स्तर वाढत चालला आहे. वाहनांच्या धुरातून शिसे, कार्बन मोनॉक्साइड तसेच नायट्रोजन ऑक्साइडचे कण बाहेर पडतात. हे दूषित कण माणसाच्या शरीरात अनेक प्रकारचे आजार उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ, सल्फर डाय ऑक्साइडमुळे फुफ्फुसाचे आजार होतात. कॅडमियमसारख्या घातक पदार्थांमुळे हृदयरोग, तसेच कार्बन मोनॉक्साइडमुळे कर्करोग आणि श्वसनाचे आजार जडतात. कारखाने आणि वीजनिर्मिती केंद्रांच्या चिमण्यांमधून तसेच स्वयंचलित वाहनांमधून वेगवेगळ्या इंधनांचे पूर्ण किंवा अपूर्ण ज्वलन झाल्यामुळे प्रदूषण वाढते. वायू प्रदूषणामुळे केवळ मानवी समाजाचीच नव्हे तर पर्यावरणाचीही अपरिमित हानी होते. प्रदूषित वातावरणातून जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा पावसाच्या पाण्याबरोबर प्रदूषित घटक नदीनाल्यांमध्ये, तलाव आणि जलाशयांमध्ये मिसळतात. त्याचप्रमाणे मातीही प्रदूषित करतात. आम्लयुक्त पावसामुळे जंगलांचे
मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. आपल्या पृथ्वीचे अतिनील किरणांपासून रक्षण करणारे ओझोनचे कवच वातावरणातील दूषित
वायूंमुळे क्षीण होते. या कवचाचे आतापर्यंत प्रदूषणामुळे बरेच नुकसान झालेले आहे. एका संशोधनाची आकडेवारी असे सांगते की, आपल्या देशातील लोकांचे सरासरी आयुर्मान 1.7 वर्षांनी कमी झाले आहे. बहुतांश मृत्यू प्रदूषणामुळे निर्माण होणार्‍या आजारांनी होत आहेत. फुफ्फुसांचा कर्करोग, हृदयविकार अशा अनेक जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. आकडेवारीनुसार, प्रति एक लाख मृत्यूंमागील 89.9 टक्के मृत्यू वायू प्रदूषणामुळे होतात. हे सर्व विवेचन विचारात घेता दिवाळीच्या प्रकाशपर्वात आपण दिवे उजळणे आणि फटाक्यांपासून दूरच राहणे इष्ट ठरेल.
प्रा. रंगनाथ कोकणे