मंगळवार 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅट पार्टीचे जो बायडेन यांच्यामध्ये राष्ट्रपतीपदासाठी अतिशय चुरशीची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. याच दिवशी अमेरिकेत इलेक्ट्रॉनिक पोस्टल बॅलेटही (मेल इन व्होट्स) सुरू होईल. नेहमी या बॅलेटद्वारे अमेरिकेचे जवळपास 10-12 टक्के मतदार आपले मतदान करतात.

तथापि, ‘कोरोना’ विषाणूच्या साथीमुळे धास्तावलेले 50 टक्क्यांपेक्षा जास्त अमेरिकन नागरिक यावेळी इलेक्ट्रॉनिक बॅलेटचीच कास धरतील असा अंदाज आहे. बूथवर झालेल्या मतदानानंतरही बराच काळ ही इलेक्ट्रॉनिक मतं येतच असतात. बूथची मोजणी संपली तरी मेल इन मतांची मोजणी पूर्ण झाल्याशिवाय निवडणुकीचा निकाल जाहीर होत नाही. बूथ पोलिंग झाल्यानंतर त्याच्या तथाकथित सर्वेक्षणाचा परिणाम, उशिरा केल्या गेलेल्या मेलइन व्होट्सवर होतो. परिणामी, मतदानाचा आराखडा तर दोलायमान होतोच; पण अंतिम निकालही पूर्णपणे बदलू शकतो. म्हणूनच, या कालखंडात, आपल्याविरुद्ध अपप्रचाराची राळ उडवण्यात येईल आणि त्याची परिणीती सामाजिक दंग्यांमध्ये होऊन मेल इन व्होटर्सची दिशाभूल करण्यात येईल, अशी भीती डोनाल्ड ट्रम्पना वाटते आहे. याचाच पुनरुच्चार त्यांनी कॅलिफोर्नियात झालेल्या पहिल्या राष्ट्रीध्यक्षीय चर्चेमध्येही केला.

या भीतीमागे गेट स्टोन इन्स्टिट्यूटमधील संशोधक ख्रिस फाररेलचा निवडणूकपूर्व अहवाल आहे. या अहवालानुसार काही असंतुष्ट प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि प्रसारमाध्यमांचे बादशहा यांनी ट्रान्झिशन इंटिग्रिटी प्रोजेक्ट (टीआयपी) नावाचा प्रकल्प सुरू केला असून त्यांच्या थिंक टँकनी ऑगस्ट महिन्यात 22 पानांचा एक प्रकल्प तयार केला आहे. टीआयपीच्या मते, बूथ व्होटिंग झाल्यानंतर जर मेल इन व्होटर्सची योग्य प्रमाणात जमवाजमव करता आली तर 2016 मध्ये रशियन सरकारला जे शक्य झाल नाही ते कार्य म्हणजेच डोनाल्ड ट्रम्पचा पराभव आपल्याला करता येईल. ख्रिस फाररेलनुसार टीआयपीला पडद्यामागील सूत्रधार, त्यांचे डेमोक्रॅटिक मित्रमंडळ आणि चीनचा सर्वंकष पाठींबा आहे.

टीआयपीच्या वरील प्रकल्पात मांडलेल्या, चर्चीलेल्या सर्व निवडणूक आराखड्यांचा निष्कर्ष एकच आहे तो म्हणजे सामाजिक-वांशिक दंगे आणि राजकीय कोंडी निर्माण केल्याखेरीज ट्रम्पना मात देणे शक्य नाही. सध्याच्या परिस्थितीत आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ट्रम्पना हरवण्याचा हा एकमेव पर्याय आहे. कारण हीच भावी रणनीती आहे.

ख्रिस फाररेलच अनुमान अचूक आहे. कारण मागील काही दिवसांत अमेरिकेतील प्रसार माध्यमांमध्ये, जनतेत राजकीय संभ्रम व तिरस्कार निर्माण करणारे, तसेच प्रशासनाविरोधी बंडास प्रवृत्त करणारे, आर्थिक, सामाजिक दिशाभूल करणारे आणि वांशिक विखार निर्माण करणारे अनेक लेख प्रसिद्ध केले जात आहेत. ख्रिस फाररेलनुसार, आगामी काळात डेमोक्रॅटिक पक्षाचे बांधील निवडक पत्रकार जनतेत आता दीर्घकालीन संवैधानिक संकटासाठी तयार राहा, ही विचारधारा पसरवतील आणि त्याप्रभावाने लोक रस्त्यांवर उतरून दंगे भडकावून ट्रम्प यांच्या राजीनाम्याची मागणी करतील.

कदाचित जो बायडेन, या टीआयपी विचारधारेचे खुले समर्थक नसतीलही; पण त्यांनी या पडद्यामागील कुटील व सत्तापिपासू सूत्रधारांच्या विरोधात निषेध व्यक्त केल्याचे दिसले नाही. टीआयपीच्या सूत्रधारांना कोणत्याही परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्पना दुसरा डाव खेळू द्यायचा नाहीये. कारण गेल्या चार वर्षांत ट्रम्पनी टीआयपी व त्यांचे समर्थक, चीन, रशिया, अमेरिकन वित्त सम्राट आणि तेथील डाव्या विचारसरणीचे लोक यांच्या आर्थिक हितसंबंधांवर सतत घाला घातला आहे. व्यापारी संबंध रद्द करून त्यांनी चीन व डाव्या अमेरिकनांना हादरवले आहे.

भारताला खुले समर्थन देऊन त्यांनी मुस्लिम मतदारांचा रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा सपशेल पराभव होईपर्यंत हे सर्व जण स्वस्थ बसणार नाहीत. ट्रम्प यांची हार झाल्यास हे लोक आणि टीआयपी त्यांच्यावर राजकीय, आर्थिक आणि वैयक्तिक सूडाची कारवाई करतील, यात शंकाच नाही. याविरुद्ध आपली रणनीती आखण्यासाठी ट्रम्प यांच्याजवळ काही दिवस उरले आहेत. त्यात ट्रम्प यशस्वी झाले नाहीत तर त्यांचा राजकीय, आर्थिक आणि वैयक्तिक र्‍हास अटळ आहे. टीआयपीला अमेरिकन निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचे कुठलेही वैध अधिकार नाहीत.

कुठल्याही सरकारी खात्यांनी या संस्थेची नेमणूक केलेली नाही. ट्रम्प प्रशासन निवडणुकीत काही तरी अफरातफर करेल किंवा निवडणूक प्रक्रियेत गोंधळ माजवेल या संशयाने टीआयपी स्थापन करण्यात आली आहे. निवडणुकीत पराभूत होण्याच्या शक्यता दिसू लागताच ट्रम्प न्यायालयात जाऊन निकालावर स्थगिती आणतील असे त्यांचे म्हणणे आहे. याचसाठी त्यांना सुप्रीम कोर्टात आपला उमदेवार सरन्यायाधीश म्हणून हवा आहे. त्यांनी सुचवलेल्या ऍमी कोने ब्रेट यांच्या सरन्यायाधिश पदासाठीच्या नियुक्तीला अमेरिकन सिनेटने निवडणुकीआधी मंजुरी द्यावी यासाठी ट्रम्प आकाश-पाताळ एक करताहेत असेही टीआयपीच्या जाहीरनाम्यात सांगण्यात आल आहे.

टीआयपीच्या या गृहित प्रमेयाला कुठलाही सर्वेक्षणीय, वैचारिक, संवैधानिक आधार नाही. ट्रम्पना लोकशाही नको आहे आणि ते सदैवच कायद्याला पायदळी तुडवण्याची भाषा करतात हे टीआयपीचे ठाम मत आहे; पण त्यासाठी ते कुठलेही पुरावे सदर करत नाहीत. म्हणूनच अमेरिकेच्या निवडणूक संबंधित कायद्यांमधील त्रुटींचा फायदा घेत अमेरिकन नागरिकांचा तेथील निवडणूक व्यवस्थेवरील विश्वास उडावा आणि ट्रम्पविरोधी वातावरण निर्मिती व्हावी या उद्देशाने ही आघाडी उघडण्यात आली आहे असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही.

ट्रान्झिशन इंटिग्रिटी प्रोजेक्ट ही संस्था आणि त्याची उपशाखा असलेली न्यू अमेरिका या थिंक टँकना आर्थिक मदत करणार्‍यांमध्ये सिलिकॉन व्हॅलीचे बिल गेट्स, एरिक श्मिट, रिड हॉफमन आणि जेफ्री स्कॉल व पियर ओमिड्यार यांसारखे बड्या उद्योगांचे उद्योग पती आहेत. रँकिंग डिजिटल राईट्सवर संशोधन करण्यासाठी न्यू अमेरिका थिंक टँकला स्टेट डिपार्टमेंटने लक्षावधी डॉलर्स दिले आहेत. यापैकी एरिक श्मिट आणि पियर ओमिड्यार यांनी 2016मध्ये हिलरी क्लिटंन निवडून यावी म्हणून आकाशपाताळ एक केले होते. आता यावेळी बर्नी सँडर्सऐवजी जो बायडेन डेमोक्रॅटिक उमेदवार व्हावा यासाठी रिड हॉफमननी जीवतोड मेहनत केली होती. मागील चार वर्षांमध्ये बाह्य देशांमधील अमेरिकन सैनिकांच्या संख्येत कपात करत त्या देशांना देण्यात येणार्‍या आर्थिक मदतीवर चाप लावून आणि अमेरिकन संस्था, संघटनांच्या बाह्य देशांमधील हस्तक्षेपावर बंदी घालून, डोनाल्ड ट्रम्पनी अशा संस्था-संघटनांचे कंबरडे मोडले आहे. म्हणूनच, ट्रम्प निवडणूक जिंकले तर लष्कराने हस्तक्षेप करावा अशी भलावण करणार्‍या ट्रान्झिशन इंटिग्रिटी प्रोजेक्टचा हा ट्रम्प द्वेष.

अमेरिकेतील राजकीय विश्लेषक पॉल क्रेग रॉबर्ट्स यांच्या ‘अमेरिकाज कलर रीव्होल्यूशन’ या पुस्तकानुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे दुखावलेले अमेरिकन धनदांडगे, लष्कर आणि प्रसारमाध्यमे ही ट्रम्प निवडणुकीत गडबड करतील किंवा हरल्यास सत्ता हस्तांतर करणार नाहीत, ही भावना जनतेच्या मनात बिंबवताहेत. निवडणुकीचा निकाल लागून ट्रम्प विजयी झाल्यास, अंतिफा आणि ब्लॅक लाइव्ह्ज या संघटना रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलनांचा हैदोस घालतील आणि ही आंदोलने ट्रम्प यांच्या हुकूमशाही विरोधात आहेत हे अमेरिकन जनता व जगाला पटवून दिले जाईल. अमेरिकेतील लोकशाहीची ही सवंग हत्या, एका हुकूमशहाला पदच्युत करण्यासाठी आवश्यक होती याची दवंडी पिटण्यात येईल.

बूथ व्होटिंग सुरू असतांनाच, इलेक्ट्रॉनिक व्होट्स येण सुरू होईल. त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी, निवडणुकीच्या दिवशी प्रसार माध्यमांनी नेहमी करतात तसे रिर्पोटींग न करता खोट्या असतील तरी ई व्होटर्सना प्रभावित करणार्‍या बातम्याच दिल्या पाहिजेत, असा फतवा टीआयपीनी काढला आहे. ऐन निवडणुकीच्या दिवशी जनतेच्या मतपरिवर्तनासाठी टीआयपीला तरुण स्वयंसेवक हवे आहेत. कारण आधी असलेले साठीहून अधिक वयाचे स्वयंसेवक कोरोनाच्या भयाने बूथ ड्युटीसाठी आलेच नाहीत. या वेळी 03 नोव्हेंबरची रात्र नेहमी होते तशी इलेक्शन नाईट म्हणून साजरी होणार नाही. ‘कोरोना’च्या भीतीमुळे असंख्य मतदार मेल इन बॅलेट सुविधा वापरतील. त्यामुळे संगणकीय मतदान दीर्घकाळ पर्यन्त सुरू राहील. टीआयपीला निवडणूक दीर्घकाळ सुरु राहण्यात स्वारस्य आहे. कारण त्यामुळे जनतेत दुफळी माजेल आणि त्यांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास डळमळीत होईल, असंख्य ठिकाणी दंगे सुरू होतील आणि त्याच्या आडोशात बायडेन कँपला संवैधानिक पद्धतीने हल्ले करून ट्रम्पना पदच्युत करता येईल याचा त्यांना विश्वास आहे.

अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला आता काही दिवस उरले आहेत. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प विजयी होतात की जो बायडेन; पराभूत झालेले जो बायडेन टीआयपीच्या रणनीतींतर्गत ट्रम्पना पदच्युत करण्यात सफल होतात की, प्रशासन विजयी ट्रॅम्पच्या मागे खंबीरपणे उभे राहात लोकशाही विजयी होईल की कारस्थान्यांची चांदी होईल हे येणारा काळच सांगेल.

अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीला आता काही दिवस उरले आहेत. या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी होतात की जो बायडेन याची उत्सुकता जगाला आहे. तथापि, जो बायडेन पराभूत झाल्यास ट्रान्झिशन इंटिग्रिटी प्रोजेक्टच्या (टीआयपी) रणनिती अंतर्गत तो ट्रम्पना पदच्युत करण्यात सफल होतील का? की प्रशासन विजयी ट्रम्प यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिल? लोकशाही विजयी होईल की कारस्थान्यांची चांदी होईल हे येणारा काळच सांगेल. या 'टीआयपी फॅक्टर'ची सध्या जगभर चर्चा आहे. त्याविषयी...
- कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)