मुलींना आपले विचार मुक्तपणे मांडता येण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म गेल्या काही वर्षांपासून उपयुक्त मंच ठरत आहेत. परंतु वास्तविक जगाप्रमाणेच या आभासी जगातही त्यांना अवमान सहन करावा लागत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ऑनलाइन गलिच्छ भाषा आणि अवमानकारक शब्द यामुळे अनेक मुलींना सोशल मीडिया सोडून देणेही भाग पडले आहे. ब्राझील, भारत, नाइजेरिया, स्पेन, थायलंड आणि अमेरिकेसह 22 देशांमधील मुलींशी संवाद साधून सोशल मीडियासंदर्भात केलेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, 58 टक्क्यांहून अधिक मुलींना सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या रूपाने अवमान सहन करावा लागला आहे.

प्लान इंटरनॅशनलने केलेल्या या सर्वेक्षणात 15 ते 25 वर्षे वयोगटातील 14 हजार मुलींचा अभिप्राय समाविष्ट करण्यात आला होता. ऑनलाइन दुनियेत अभद्रतेच्या बाबतीत फेसबुकची परिस्थिती सर्वाधिक वाईट आहे. अवमानकारक शब्दांनी एखाद्या मुलीवर हल्ला चढविण्याच्या सर्वाधिक घटना फेसबुकवर घडतात. 39 टक्के महिलांच्या मते, त्यांना फेसबुकवर अवमान सहन करावा लागला आहे. त्याच वेळी इन्स्टाग्रामवर 23 टक्के, व्हॉटसअपवर 14 टक्के, स्नॅपचॅटवर 10 टक्के आणि ट्विटरवर 9 टक्के महिलांना अशा अभद्र व्यवहाराला सामोरे जावे लागले.

या अभद्र व्यवहारामुळे पाचपैकी एका मुलीने सोशल मीडिया साइटवर जाणे एकतर बंद केले आहे किंवा खूपच मर्यादित ठेवले आहे. एवढेच नव्हे तर अनेक मुलींनी आपली मते खुलेपणाने मांडणेही बंद केले आहे. या सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की, ट्रोलिंग किंवा असभ्य भाषेत केलेला अवमान सहन केल्यानंतर 10 पैकी एका मुलीने सोशल मीडियावर स्वतःला व्यक्त करण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. 41 टक्के मुलींच्या म्हणण्यानुसार, आभासी दुनियेत केवळ अपमानजनक भाषा आणि शिवीगाळच नव्हे तर लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन हेतुपुरस्सर केले जाते. बॉडी शेमिंग आणि लैंगिक हिंसा, जातीय अल्पसंख्यकांवर हल्ले, वर्णद्वेषी व्यवहार आणि एलजीबीटी समुदायाशी निगडित मुलींशी गैरवर्तन होण्याचे प्रकार मुलींना प्रामुख्याने पाहायला मिळतात. एवढेच नव्हे तर आपल्याला आणि आपल्या मैत्रिणींना शारीरिक हल्ल्याचीही भीती वाटत असल्याचे 22 टक्के मुलींनी नमूद केले आहे.

सायबरच्या या मायावी जगात स्क्रीनच्या आड लपलेल्या विकृत मानसिकतेच्या पुरुषाच्या वाईट व्यवहारामुळे महिलांची मनःशांती हरवली आहे, हे खरोखर दुःखद आहे. विचार मनोकळेपणाने मांडण्यासाठी असलेल्या या मंचांवर मुलींना विनाकारण भावनिकदृष्ट्या त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासामुळे एकतर त्यांना व्यक्त होणे बंद करावे लागत आहे किंवा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून व्यक्त व्हावे लागत आहे. परिणामी, आभासी मंचांचा दुरुपयोग तर सुरूच राहतो; शिवाय महिलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोका निर्माण होतो. ऑनलाइन विकृतीचा बळी ठरलेल्या मुलींपैकी निम्म्या मुलींना शारीरिक किंवा लैंगिक हिंसाचाराची धमकी दिली जाते, असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. अशा विकृत वर्तनामुळे आपल्याला मानसिक धक्का बसल्याचे सर्वच मुलींनी सांगितले तर एक चतुर्थांश मुलींना शारीरिकदृष्ट्या आपण असुरक्षित आहोत, असे वाटू लागले.

या पार्श्वभूमीवर, हे व्हर्च्युअल शोषण महिलांची मानसिक स्थिती किती मोठ्या प्रमाणात बिघडत असेल, याची सहज कल्पना करता येते. एखाद्या विचारपूर्वक केलेल्या पोस्टवरसुद्धा धमक्या, अपशब्द, अभद्र टिप्पणी आणि अन्य अनेक प्रकारच्या नकारात्मक बाबी प्रतिक्रिया म्हणून पाहायला मिळतात, हे अत्यंत पीडादायक आहे. सायबर विश्वात संचार करणार्‍या सर्वच वयोगटातील महिलांना या समस्येचा मुकाबला करावा लागत आहे. शाळेत जाणार्‍या मुलींपासून प्रौढ महिलांपर्यंत, व्यवसायापासून राजकारणाशी संबंधित महिलांपर्यंत, सिनेमाशी संबंधित महिलांपासून सर्वसामान्य गृहिणींपर्यंत सर्वांनाच या सायबर विकृतीचा सामना करावा लागतो आहे. गेल्या काही दिवसांत असे दिसून आले आहे की, ऑनलाइन विकृतीला कोणतीही सीमाच राहिलेली नाही. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचा परफॉर्मन्स सातत्याने खराब राहिला. त्यानंतर क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या टीकाटिप्पणीला कोणताही स्तर किंवा दर्जा नव्हता.

एका सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या मुलीविषयी केली गेलेली टिप्पणी अत्यंत विचित्र आणि संतापजनक होती. सोशल मीडियावर ट्रोलर मंडळींनी सभ्यपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आणि पाच वर्षांच्या त्या चिमुकलीवर अत्याचार करण्याचीही धमकी दिली. धोनीच्या मुलीबद्दल अशा प्रकारची धमकी देणार्‍या व्यक्तीची मानसिक स्थिती किती विचित्र असेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. एका कोवळ्या मुलीकडे अशा नजरेतून पाहून इतकी भीतीदायक धमकी देण्याचे धारिष्ट्य या मंडळींना होतेच कसे? विचार करण्याची शक्ती गमावून केल्या जाणार्‍या अशा बीभत्स कमेन्ट सोशल मीडियावर सातत्याने सुरूच आहेत. इंटरनेटचा वाढता प्रसार आणि डिजिटल क्रांतीमुळे सोशल मीडियावर प्रत्येक वयोगटातील लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सध्याच्या काळात यूजर्स आपला बराचसा वेळ व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर व्यतीत करतात. परंतु राजकीय चर्चा, व्यक्तिगत अपडेट्स, अनेक विषयांवर केले जाणारे मतप्रदर्शन आणि उपयुक्त विचारविनिमय याऐवजी हा घाणेरडा कोलाहलच अधिक प्रमाणात बघायला मिळतो.

माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी उपलब्ध असलेले हे मंच सध्या महिलांच्या मानसिक छळणुकीचे अड्डे बनले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ट्रोलिंग असो किंवा असहमती दर्शविण्याचा असभ्य मार्ग असो, डिजिटल छळणुकीच्या या दुनियेत महिलांना जाणूनबुजून लक्ष्य करण्यात येते. कधी अत्याचार करण्याची धमकी तर कधी शिवीगाळ, कधी फोटोमध्ये हवे तसे आपत्तीजनक बदल करून बदनामी तर कधी महिलांच्या कामाच्या क्षेत्राशी संबंधित अभद्र टीकाटिप्पणी... या मायावी सायबर दुनियेत स्क्रीनच्या पलीकडे लपलेला विकृत पुरुष महिलांची शांतता आणि सुरक्षिततेला धोकादायक ठरतो आहे. ऑनलाइन माध्यम या नात्याने महिलांना व्यक्त होण्यासाठी हा मीडिया सशक्त माध्यम उपलब्ध करून देत आहे हे खरे; परंतु महिलांच्या सुरक्षिततेला धोका असणारे सोशल मीडियाचे अनेक पैलू आता दररोज समोर येत आहेत.

सोशल नेटवर्किंगच्या साइट्स या एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी आणि नवनवीन विचार तसेच माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मंच आहेत. परंतु काही लोक दुर्दैवाने या मंचाचा गैरफायदा घेत आहेत. या माध्यमाद्वारे दोस्ती करून फसवणुकीची प्रकरणे, गैरव्यवहार, वाईट वर्तन, फोटोंचा दुरुपयोग आणि ट्रोलिंग असे धोके महिलांसाठी अधिक खतरनाक ठरले आहेत. याच कारणामुळे काही दिवसांपूर्वी मनेका गांधी यांनी ऑनलाइन बिहेविअर संहिता बनविण्याचा विषय लोकांसमोर आणून महिलांच्या सोशल मीडिया ट्रायलचा मुद्दा गुन्ह्यांच्या वर्गवारीत आणण्याची मागणी केली होती. कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक, अभद्रता, अश्लीलता सहन न करण्याचा मुद्दा या मागणीत अंतर्भूत होता. वास्तव दुनियेत असुरक्षितता आणि अपमान हे स्त्रियांच्या वाट्याला नेहमी येतच असतात. परंतु ऑनलाइन दुनियेतसुद्धा ट्रोलिंग, शिवीगाळ, धमकावण्याचे प्रकार आणि वाईट व्यवहार यामुळे महिला तणावाखाली येऊन त्यांना असुरक्षित वाटू लागते आणि अनेक महिला तर मानसिक आजारांनाही बळी पडतात. आत्मनियमन आणि सकारात्मक संवाद यांची समज सर्वांनाच असणे गरजेचे आहे. त्यासाठी एक निर्धारित मार्गदर्शक नियमावली (गाइडलाइन) तयार करणे आत्यंतिक गरजेचे आणि तातडीचे बनले आहे.

सुमारे 58 टक्क्यांहून अधिक मुलींनी सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या रूपाने अवमान सहन केला आहे, असे भारत, ब्राझील, नाइजेरिया, स्पेन, थायलंड आणि अमेरिकेसह 22 देशांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. ऑनलाइन दुनियेत अभद्रतेच्या बाबतीत फेसबुकची परिस्थिती सर्वाधिक वाईट आहे. सायबरच्या या मायावी जगात स्क्रीनच्या आड लपलेल्या विकृत मानसिकतेच्या पुरुषाच्या वाईट व्यवहारामुळे महिलांची मनःशांती हरवली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलांना तणावरहित राहता आले पाहिजे.
- प्रा. शुभांगी कुलकर्णी