राजकारणात ज्याला राजकीय हवामानाचा अचूक अंदाज येतो त्याला ‘चाणाक्ष नेता’ म्हणून ओळखले जाते. अनेकांना हा अंदाज येतो; परंतु त्याआधारे मोर्चेबांधणी करता येत नाही; पण शरद पवार हे देशाच्या राजकारणातील कदाचित एकमेव असे व्यक्तिमत्त्व आहे ज्यांना एखाद्या वातक्कुकुटाप्रमाणे राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहात आहेत याचा अंदाजही येतो आणि त्यानुसार व्यूहरचनांची आखणी करुन ते बाजीही मारण्यात यशस्वी होतात. पवारांच्या या ‘बाजीगर’पणाचे दर्शन महाराष्ट्रासह देशाला गतवर्षी ‘नव्याने’ घडले.

2019 च्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 54 जागा मिळवत तिसर्‍या स्थानावर गेला होता. वास्तविक, निवडणुकांमध्ये पवारांच्या करिष्म्याची, झंझावाताची, पावसातील सभेची प्रचंड चर्चा होती. भाजपाच्या ईडी कार्डला पवारांनी ज्यापद्धतीने हाताळले त्यामुळे मराठी माणूस दिल्लीविरुद्ध म्हणजेच भाजपाविरुद्ध उभा ठाकेल अशी अटकळ होती; परंतु राज्यातील मतदारांनी भाजपा-शिवसेनेला 105 आणि 56 जागांवर विजयी करत काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारले होते. निकालांचे आकडे स्पष्ट झाल्यानंतर माध्यमांसमोर बोलताना शरद पवारांनीही ‘जनतेने आम्हाला विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिला आहे’ असे सातत्याने सांगत होते.

मात्र पडद्यामागे सत्तास्थापनेसाठीच्या हालचाली सुरु होत्या. भाजपा आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरुन पेटलेला संघर्ष जसजसा विकोपाला जात होता तसतसे पवारांचे भाजपाला सत्तेबाहेर बसवण्यासाठीचे डावपेच वेगाने पुढे जात होते. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी करुन त्यांना मास्टरस्ट्रोक लगावण्याचा प्रयत्नही केला; परंतु पवारांनी आपली सर्व शक्तीपणाला लावून या दोघांनाही झेलबाद केले. केवळ तेवढे करुन न थांबता संजय राऊतांच्या साथीने पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा सारीपाट बदलणारी मोट बांधली आणि काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना व मित्र पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार प्रस्थापित केले. ‘जो जीता वोही सिकंदर’ असा ओरडा करत राहणार्‍या भाजपा नेत्यांना ‘हार कर जीतने वाले को बाजीगर कहते है’ हे पवारांनी दाखवून दिले.

पवारांच्या या खेळीने ‘पुलोद’ची आठवण सर्वांनाच झाली. 1978 मध्ये पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच शरद पवार 40 आमदार घेऊन वसंतदादा पाटील यांच्या सरकारमधून बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्याबरोबर सुशीलकुमार शिंदे, सुंदरराव सोळंके आणि दत्ता मेघे असे नेते होते. बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली आणि जनता पक्षाबरोबरही संधान बांधले. एस. एम. जोशी, आबासाहेब कुलकर्णी, किसन वीर यासारख्या जनता पक्षाच्या नेत्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला. पवार यांची समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष यांची आघाडी तयार झाली, हीच ‘पुलोद’ किंवा पुरोगामी लोकशाही आघाडी. ‘पुलोद’मुळे अवघ्या 38 व्या वर्षी शरद पवार मुख्यमंत्री झाले. ‘पुलोद’मुळे शरद पवार यांची तरूण आणि बंडखोर नेता म्हणून प्रतिमा निर्माण झाली. पुढील पाच-सहा वर्षांत ते पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले. दिल्लीत त्यांचे वजनही वाढले.

एक अतिशय महत्वाचे काँग्रेस नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. राजकारणात धाडसी आणि अचंबित करणारे प्रयोग करण्यासाठी आवश्यक असणा -री मुत्सद्देगिरी, संयम, धूर्तपणा, चाणाक्षपणा, समन्वयाची भूमिका आदी सर्व गुणवैशिष्टे शरद पवारांकडे असल्यानेच ते महाराष्ट्रात आगळीवेगळी आघाडी उभी करु शकले. देशाच्या राजकारणात आघाड्या-युत्यांचे नाविन्य नाही. नव्वदीनंतरच्या कालखंडात तर देशाने आघाड्यांचीच सरकारे पाहिली आहेत. ही सरकारे कशा प्रकारे अडखळत चालतात आणि अल्पायुषी असतात याचीही अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच पवारांनी जन्माला घातलेली ही महाविकास आघाडीही अल्पजीवी असेल असे भाकित भाजपासह अनेकांनी केले होते; परंतु पाहता पाहता या सरकारने वर्षपूर्ती केली आहे. हा 365 दिवसांचा प्रवास पाहिला असता सत्तेतील हे तीन प्रमुख पक्ष वर्षानुवर्षांचे मित्रपक्ष आहेत, असे वाटल्यास नवल नाही. इतक्या एकरुपतेने हे सत्ताधीश विरोधकांवर तुटून पडताना दिसतात. याचा अर्थ सारं काही आलबेल आहे असे नाही; परंतु महाविकास आघाडी सरकारमध्ये जेव्हा जेव्हा अडचणीचे प्रसंग आले, कुरबुरी झाल्यास, निर्णयक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित झाले तेव्हा तेव्हा या आघाडीचे पालकत्त्व असलेल्या पवारांनी वडिलकीच्या नात्याने त्यातून मार्ग काढला आणि पुन्हा ‘हम होंगे कामयाब’च्या दिशेने सरकारला घेऊन गेले.

‘कोरोना’सारख्या ऐतिहासिक आपत्तीमुळे निर्माण झालेले संकट असो, अभूतपूर्व अतिवृष्टी असो किंवा शेतीसंबंधीचे प्रश्न असोत, पवारांनी नेहमीच उत्कृष्ट मार्गदर्शकाची भूमिका पार पाडलेली दिसून आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नेहमीच ‘घराबाहेर पडा’ अशी टीका केली गेली. त्याचवेळी शरद पवार मात्र पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे राज्यभरात दौरे करत राहिले. माध्यमांनी आणि विरोधकांनी याबाबत विचारले असता कधी ‘मुख्यमंत्री कॅप्टन आहेत, मुंबईत बसून ते राज्यभरातील सर्व प्रशासकीय स्तरावरील आढावा घेतात आणि तातडीने निर्णय घेतात’ असे सांगून पवारांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली. यातून पवारांनी सरकार चालवण्यासाठी आवश्यक असणारा मनाचा मोठेपणाही दाखवून दिला. मध्यंतरी, कंगना राणावतच्या माध्यमातून भाजपाने महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न चालवला होता. त्यावेळीही पवारांनी राज्यासमोरील इतर प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला आघाडीतील सर्वांनाच दिला होता.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या माध्यमातूनही आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्याबद्दलचा रागही पवारांनी पत्राच्या माध्यमातून व्यक्त करत सरकारची बाजू उचलून धरली. महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे अनेक प्रसंग गेल्या वर्षभरात घडले. त्या-त्यावेळी पवारांनी भक्कमपणाने बाजू मांडत विरोधकांचा सामना केला. त्यांच्या या आधारामुळे आघाडी सरकारमधील परस्पर संबंध दिवसेंदिवस बळकट होत गेल्याचे दिसते. आघाड्यांच्या सरकारमध्ये सत्तास्थापनेनंतर खातेवाटप हा कळीचा मुद्दा असतो. बरेचदा मंत्रीपदांवरुनच आघाड्यांमधील धुसफूस सुरु होते. याबाबतही पवारांनी अत्यंत सामंजस्य दाखवलेले दिसले. तथापि, हे सामंजस्य दाखवत असताना पवारांनी आपली दूरदृष्टी कायम ठेवली. मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे सोपवताना वजनदार मंत्रीपदे आपल्याकडे ठेवली. त्या माध्यमातून सरकारवरील आपली पकड कायम ठेवलीच; पण ही मंत्रीपदे आपल्या पक्षाचे स्थान जिथे काहीसे कमकुवत आहे अशा भागातील नेत्यांना देऊ केली. या माध्यमातून आपला पक्षविस्ताराचा कार्यक्रमही त्यांनी सुरु ठेवला. तसेच पुढची फळी तयार करण्यासाठीची तयारीही सुरु केली.
बेरजेचे राजकारण हे पवारांच्या राजकारणाचे एक प्रमुख वैशिष्ट राहिले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात आणि त्यापूर्वी भाजपाच्या अश्वमेधाला भुलून अनेक जुन्या-जाणत्या नेत्यांनी पवारांची साथ सोडली. त्याबाबतची खंत पवारांनी प्रसंगी जाहीरपणानेही बोलून दाखवली होती. सत्तेची चावी हातात आल्यानंतर या सर्वांना खडे बोल सुनावण्यासही त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे तर संपूर्ण राजकारणच जणू पवारविरोधावर आधारित होते. पवारांनी मागील काळात त्यांच्यावर जातीवाचक टीकाही केली होती; मात्र याच राजू शेट्टींना पवारांनी आपल्या गोटात आणून विधान परिषदेसाठी त्यांच्या नावाची शिफारस राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. शेट्टींप्रमाणेच एकनाथ खडसे यांच्यासारख्या भाजपातील तालेवार, दिग्गज नेत्याला आपल्या पक्षात, आपल्या अटींवर घेऊन पवारांनी राजकारणातील आपल्या ताकदीचा प्रत्यय आणून दिला आहे. त्यांनाही विधान परिषदेसाठी उमेदवारी देऊ केली आहे.

अशा प्रकारच्या खेळ्यांमधून पवारांनी आपल्याला सोडून गेलेल्यांना योग्य तो संदेश दिला आहे. नाथाभाऊंच्या पक्षप्रवेशाच्या वेळी जयंत पाटील यांनी शरद पवारांबाबत ‘टायगर अभी जिंदा है...’ असे म्हटले होते. हे विधान अनेकार्थांनी सूचक होते; तसेच निवडणुकीतील जय-पराजयाच्या निकषांवरुन शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा, अनुभवसंपन्नतेचा उपमर्द करणार्‍यांना दिलेले ते प्रत्युत्तर होते. महाविकास आघाडीने जर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला तर 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळचे चित्र अनेकार्थांनी वेगळे असू शकते.

विधानसभा निवडणुकीत अवघ्या 54 जागा मिळवूनही आपल्या राजकीय महाकौशल्याने आणि चाणाक्षपणाने शरद पवारांनी महाविकास आघाडीची मोटबांधणी केली आणि राज्याच्या इतिहासाचा सारीपाट बदलून टाकला. ‘हार कर जीतने वाले को बाजीगर कहते है’ हा फिल्मी डायलॉग पवारांनी सत्यात उतरवून दाखवला. इतकेच नव्हे तर काही महिन्यांत हे सरकार कोसळेल या भविष्यवाण्या खोट्या ठरवत सरकारची वर्षपूर्तीही झाली. आज या सरकारमधील मित्रपक्ष ज्या हिरीरीने आणि एकजुटीने खिंड लढवत आहेत त्याचे मूळ पवारांच्या पालकत्त्वात आहे, हे नाकारता येणार नाही. आघाड्यांच्या सरकारमध्ये असा समन्वयक आणि खमका आधारस्तंभ किती महत्त्वाचा असतो, याचा आदर्श सबंध देशाने घ्यावयास हवा.
- प्रा. पोपट नाईकनवरे, राज्यशास्र अभ्यासक