शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आनंदाचे... जडणघडणीचे मुख्य ठिकाण.... पालकांचे आधारस्थान... रिक्षा, व्हॅन, स्कूल बस चालकांचे उत्पन्नाचे (पोटपाण्याचे) साधन... संस्थाचालकांचे कृतीशीलता व नियोजनाचे ठिकाण व समाजविकासाचे केंद्र आहे. आता ती 4 ऑक्टोबरपासून सुरू झालेली आहे आणि संपूर्ण समाजात आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. लगेच समोर येणारे सजीव घटक म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, पालक व सेवक आणि निर्जीव घटक म्हणजे पाठ्यपुस्तके, वह्या, बाक, दफ्तरे, वाहने, प्रश्‍नपत्रिका, उत्तर पत्रिका, पायाभूत सुविधा असे आहेत. या सर्व घटकांची खरी कसरत आणि कसोटी आता आहे. त्यांच्यासमोर एक आव्हान आहे. करोना अजून पूर्णत्वाने गेलेला नाही. तो वातावरणातून कधीही जाणारही नाही. त्यामुळे त्यापासून पूर्वप्रतिरक्षा कशी करायची तसेच त्याच्यामुळे मुलांच्या मनात निर्माण झालेली भीती किंवा पालकांवर असलेली दहशत कमी कशी करायची आणि आपले कार्य व्यवस्थितपणे कसे सुरू ठेवायचे हे आव्हान शाळांना आता पेलायचे आहे. यामुळे घाबरुन अथवा निराश होण्याचे कारण नाही. कारण पृथ्वीतलावरी बुद्धीमान जीव म्हणून माणसाचा उल्लेख केला जातो. आपण हे आव्हान घेऊया, झेलूया आणि पेलूया. काय करावे लागेल यासाठी? कोणती काळजी घ्यावी लागेल? नियोजनात काय करायला हवे? कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे लागेल? किती वेळ द्यावा लागेल? अशा अनेक दृष्टिकोनातून आपल्याला यासंबंधी सखोल विचार करणे गरजेचे आहे. 
शाळेसमोर पहिले आव्हान आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे. शाळा सुरू झालेल्या आहेत; परंतु बहुतांश शाळांमध्ये 10 ते 20 टक्केच विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली आहे. ही उपस्थिती वाढवण्यासाठी सर्वांत प्रथम शाळेतील सर्व घटकांनी म्हणजेच मुख्याध्यापक, शिक्षक, सेवक यांनी सर्वेक्षण करण्याची गरज आहे. जे विद्यार्थी अनुपस्थित आहेत, त्यांचे नेमके प्रश्‍न काय आहेत हे त्यांच्या पालकांशी समन्वय साधून माहीत करुन घेऊन त्यावर तोडगा काढणे आणि विद्यार्थी शाळेमध्ये कसे येतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहरांमधून वाहतूक, दळणवळण ही पहिली समस्या आहे. यासाठी रिक्षा, व्हॅन, स्कूलबस यांच्याशी मुख्याध्यापकांनी-शिक्षकांनी सातत्याने चर्चा करुन विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासंबंधी त्यांना प्रवृत्त केले पाहिजे. त्यांच्या मनात सकारात्मक विचार रुजवले पाहिजेत. अनेक विद्यार्थ्यांमध्ये कंटाळा किंवा आळस निर्माण झाला असण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. तो दूर कसा करायचा याचा विचार मुख्याध्यापक व शिक्षकांनी करणे गरजेचे आहे. त्यामुळे सुरुवातीच्या 8-10 दिवसांमध्ये शाळांमधून विद्यार्थ्यांची उपस्थिती 100 टक्के कशी होईल हे साध्य करावे. अर्थात हे साध्य करायचे असेल तर शाळेमध्ये काही गोष्टी नव्याने कराव्या लागतील. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आल्यावर आनंद वाटेल, त्यांचे मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल असे काही उपक्रम शाळांनी आयोजित केले पाहिजेत. उदाहरणार्थ, विनोदी कथाकथन, उत्तम प्रकारच्या सीडी दाखवणे, युट्युबवर असणारे चांगले कार्यक्रम एलसीडीच्या माध्यमातून स्क्रिनवरुन विद्यार्थ्यांना दाखवणे, वर्गात घेता येतील असे मानसशास्रीय खेळ घेणे, छोटे छोटे संगीताचे कार्यक्रम आयोजित करणे, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त बोलण्याची संधी देणे अशा गोष्टींचं नियोजन करुन शाळेचे वातावरण जर हलकंफुलकं ठेवले तर विद्यार्थी पटसंंख्या व उपस्थिती वाढवण्यास याची निश्‍चितच मदत होईल. 
विद्यार्थी शाळेत का येतो किंवा पालक विद्यार्थ्याांन शाळेत का घालतात याचे मुख्य कारण आहे त्या विद्यार्थ्याला विविध विषयांचे ज्ञान मिळणे, विद्यार्थ्याची भाषा, गणित, समाजशास्र, विज्ञान या विषांवर प्रभुत्त्व मिळवणे यांसाठी विद्यार्थी शाळेमध्ये येतो. हा पालकांचा मुख्य दृष्टिकोन लक्षात घेऊन आपल्याला जेवढा वेळ दिला आहे त्या-त्या वर्गावर जाऊन खणखणीत पद्धतीने शिकवले पाहिजे. विद्यार्थी शिक्षकांकडून शिकण्यासाठी आसुसलेले आहेत. विद्यार्थी शिक्षकांशी चर्चा करण्यासाठी खूप उद्युक्‍त झालेले आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून खूप संबोध समजलेले नाहीत. कोणतीही संकल्पना किंवा घटना कानांनी ऐकून नुसते समजते. त्यापेक्षा डोळ्यांनी पाहून जास्त समजते आणि प्रत्यक्ष कृतीतून किंवा सहभागातून सर्वांत चांगली समजते, हे शिक्षणाचे मुलभूत तत्त्व आहे. ऑनलाईनच्या माध्यमामुळे विद्यार्थी या मुलभूत तत्त्वापासून दीड वर्षे वंचित आहेत. त्यामुळे वर्गात शिक्षकांनी शिकवताना काही कृती करणे, विद्यार्थ्यांचा सहभाग घेणे, काही प्रयोग करुन दाखवणे, शैक्षणिक साधनांचा वापर करणे, आपल्या पाठामध्ये रंजकता कशी आणता येईल  याचा विचार करणे हे पूर्वनियोजन अत्यंत आवश्यक आहे. शिक्षकांचे शिकवणे जर प्रभावी, कल्पक, परिणामकारक आणि रंजक असेल तर विद्यार्थी आपोआप, नकळत शिक्षणाकडे आकर्षित होणार आहे. त्यामुळे नव्याने सुरू झालेल्या शालेय जीवनामध्ये शिक्षक हा कणा असणार आहे. 
विषयज्ञान मिळवण्याबरोबरच विद्यार्थी शाळेमध्ये शारीरिक तंदुरुस्तीसाठीही आलेले असतात किंवा करोनाने आपल्याला कोणता धडा दिलेला आहे हे जर आपण समजून घेतले तर या नव्याने सुरू झालेल्या शाळांमध्ये वेळापत्रकात आमूलाग्र बदल करुन विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कसे प्राधान्य देता येईल, यासाठी वेळापत्रकात कसा वेळ देता येईल याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे. विद्यार्थी शाळेमध्ये आल्यानंतर तिथे त्यांची प्रतिकारशक्‍ती वाढवायची असेल, विशेषतः करोनावर मात करायची असेल तर योग, मुद्रा, ध्यान आणि विविध प्रकारचे प्राणायाम हे घटक रोज विद्यार्थ्यांकडून करुन घेतले पाहिजेत. पूर्वप्रतिरक्षा म्हणून याची नितांत आवश्यकता आहे. विद्यार्थ्याला गणित, विज्ञान, इंग्रजी कमी प्रमाणात आले तरी एकवेळ चालेल; परंतु त्याचे आरोग्य किंवा तब्येत मात्र 100 टक्के उत्तमच असले पाहिजे, हा विचार आपल्या मनात सदैव असला पाहिजे. महात्मा गांधींनीसुद्धा जीवन-शिक्षण म्हणजेच आधी जीवन मग शिक्षण असा संदेश दिलेला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांची तब्येत उत्तम राहण्यासाठी त्यांना आहारसवयी, आरोग्यसवयी यासंदर्भात योग्य त्या तज्ज्ञ व्यक्‍तींची किंवा डॉक्टरांची व्याख्याने आयोजित करुन मार्गदर्शन करणे ही आजची खरी गरज आहे. शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता उत्तम प्रतीची असली पाहिजे. यासाठी शाळांना समुपदेशनाचा आधारही घ्यावा लागेल. वैयक्‍तिक समुप -देशन न करता सामूहिक समुपदेशनाचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना नकळत सल्ले दिले गेले पाहिजेत. विद्यार्थी काहीवेडे नाहीत. फक्‍त कोविडमुळे त्यांच्या मानसिकतेचे खच्चीकरण काही प्रमाणात झाले आहे ते आपल्याला उंचवायचे आहे. 
ऑनलाईनच्या पार्श्‍वभूमीवरुन विद्यार्थ्यांना आता ऑफलाईन शिक्षण मिळणार आहे. ऑफलाईन शिक्षणामध्ये शिक्षकांनी मुलभूत संबोधावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. उदाहरणार्थ, करोनाकाळात सर्वत्र काही चर्चा ऐकिवात आल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थी घरी असल्यामुळे त्यांची लेखनक्षमता कमी झालेली आहे. याचा आपल्याला विचार करता येईल का आणि वर्गात रोज विद्यार्थ्यांचे लेखन घेता येईल का हे पहावे लागेल. सर्व भाषांचे डिक्टेशन विद्यार्थ्यांना देऊन एक महिनाभर ही अनुभूती द्यावी. यामधून नेमकं कोणत्या विद्यार्थ्याचं लेखन कसं आहे हे शोधून काढावे. ज्याचे लेखन उत्तम आहे त्याच्या लेखनाचा वेग वाढवावा. असे लेखनाचे विविध पैलू आपल्याला अध्यापनातून घ्यावे लागतील. लेखनाबरोबरच विद्यार्थ्यांची वाचनक्षमता व गणनक्षमता (कॅलक्युलेशन अ‍ॅबिलिटी) कितपत आहे याचाही अंदाज घ्यावा. या जर तीन गोष्टी विद्यार्थ्यांना उत्तम आल्या तर त्यांना सर्व विषय वाचून समजणार आहेत. फक्‍त गणित आणि भौतिकशास्र याबाबतीतच आपल्याला अधिक कष्ट घ्यावे लागतील. ऑफलाईन शिक्षण पद्धतीमध्ये ऑनलाईनचा आजिबातच समावेश करणार नाही असा अट्टाहास शिक्षकांनी धरु नये. कारण इथून पुढील काळामध्ये ऑनलाईन + ऑफलाईन अशी संमिश्र शिक्षणपद्धती सुरु राहणार आहे. ऑनलाईन शिक्षण ही एक आपल्याला मिळालेली पर्वणी आहे. या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरचे ज्ञान देऊ शकतो, असा विचार शिक्षकांनी करुन त्या-त्या वयोगटानुरुप काय काय शिकवता येईल याचा अभ्यास केला पाहिजे. त्याचे पूर्वनियोजन करुन, हे भाग डाऊनलोड करुन ते विद्यार्थ्यांना पाठवले पाहिजेत. प्रत्यक्ष वर्गाध्यापन करत असताना मल्टिमीडिया, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन, इंटरनेट याचा वापर केला पाहिजे. तसेच गृहपाठाच्या वह्या करण्याऐवजी विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून वस्तुनिष्ठ प्रश्‍नांच्या प्रश्‍नपेढ्या देता येतील आणि त्यांची उत्तरेही ऑनलाईन माध्यमातून मागवता येतील. अर्थात, हे सर्व करण्यासाठी शिक्षकांना शाळेव्यतिरिक्‍त काही वेळ खर्ची घालावा लागेल. शिक्षकांशिवाय काहीही होणार नाही, हे शिक्षणक्षेत्रातले मुलभूत, गाभाभूत तत्त्व आहे हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. 
दीड वर्षांनंतर शाळा सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय गोष्टींतून काही कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतील. कदाचित हे निर्णय शिक्षण क्षेत्रातल्या घटकांना पटणार नाहीत. पण त्यावर विचार करण्याची गरज आहे. यातील पहिला निर्णय म्हणजे सुट्टयांची संख्या कमी करणे. नुकतीच शाळा सुरू झालेली आहे. दिवाळीची सुटी जी 18 दिवस असते ती फक्‍त एक आठवडा केली तर 11 दिवस शिक्षणाचे मिळू शकतील. याप्रमाणे नाताळची सुटी, मे महिन्याची सुटी कमी करुन आपल्याला विद्यार्थ्यांना न्याय देता येईल का, याचा विचार शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी करण्याची आज गरज आहे. प्रशासकीय दृष्टिकोनातून विचार केल्यास मूल्यमापन हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण आजपर्यंत मूल्यमापनाची परीक्षा ही एकमेव पद्धत वापरत आहोत. त्या परीक्षा नावाच्या घटकासाठी  शाळेच्या शैक्षणिक वर्षातील जवळपास 80 दिवस खर्ची पडतात. आपल्याला ही पद्धत बंद करुन काही वेगळ्या पद्धती आणता येतील का, याचा विचार शासनाने करण्याऐवजी प्रत्येक शाळेने करावा. कारण प्रत्येक शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांची भौगोलिक स्थिती, मानसिक स्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेने आपली स्वतःची मूल्यमापन पद्धती विकसित करावी. ज्यामध्ये परीक्षा शब्द हद्दपार करुन त्यासाठी  लागणारे 80 दिवस वाया न घालवता ते शिकवण्यासाठी कसे वापरता येतील यावर विचार व्हावा. मूल्यमापनासाठी वर्षाखेरीस एखादी परीक्षा ठेवावी. प्रशासकीय गोष्टीतील पुढचा मुद्दा म्हणजे आपल्या शाळेच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवणे. लोकसहभागामधून प्रत्यक्ष विविध कला असणारे कलाकार शाळेत बोलवावेत. मनुष्यबळाचा वापर करावा, उपक्रमांसाठी निधी समाजातून उभा करावा, सीएसआर फंडांचा जास्तीत जास्त सदुपयोग व्हावा या सर्व प्रशासकीय गोष्टींवर आता शाळांनीच प्रयत्न केले पाहिजेत. या नवीन कालावधीमध्ये शासनावर फार अवलंबून राहू नये. आपल्या शाळेतून आपल्या विद्यार्थ्यांचा विकास, जडणघडण करायची असेल तर प्रत्येक गोष्ट शासनाने द्यावी किंवा प्रत्येक निर्णय शासनाने सांगेल तसा अमलात आणावा असा दृष्टिकोन न ठेवता शाळेने स्वतःचा आराखडा तयार करावा आणि तो अमलात आणावा. ही कोविडने आपल्याला दिलेली शिकवण आहे. 
डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ