दर महिन्याला पौर्णिमा असते आणि प्रत्येक पौर्णिमेला भाविक पूजा करत असतात; परंतु शरद किंवा कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व अन्य पौर्णिमेपेक्षा अधिक आणि वेगळे आहे. वास्तविक कोजागिरी पौर्णिमेपासून अभ्यंगस्नान आणि उपवास सुरू होतात. कार्तिक महिन्यातील या 
पौर्णिमेपासून कार्तिक उपवास देखील सुरू होतात. आई आपल्या मुलांच्या मंगल कामनासाठी कोजागिरी पौर्णिमेला देवी-देवतांचे पूजन करतात. त्याचवेळी गरीब व्यक्ती देखील धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीचे पूजन करून इच्छापूर्तीची कामना करतात. याप्रमाणे विवाह झाल्यानंतर पौर्णिमेचे उपवास कोजागिरी पौर्णिमेपासूनच सुरू करावेत, असे सांगितले जाते. 
अनेक देशांत शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमेच्या नावाने ओळखले जाते. आपल्या महाराष्ट्रातही प्रामुख्याने हा दिवस ‘कोजागिरी’ नावाने साजरा केला जातो. कोजागिरीचा सण हा पश्‍चिम बंगाल, ओडिशा, आसाम या ठिकाणी भाविक 
मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. कोजागिरीला लक्ष्मी मातेबरोबरच भगवान विष्णूची देखील पूजा केली जाते. पश्‍चिम बंगाल आणि ओडिशात देखील हा सण साजरा होतो. गुजरातमध्ये शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी विधिपूर्वक पूजा केल्याने व्यक्तीला आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धीत वाढ होते, अशी धारणा आहे. 
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शिव पार्वती आणि कार्तिकेयचीही पूजा केली जाते. हिंदु धर्मशास्त्रात सांगितलेल्या कथांनुसार देवी देवतांचे सर्वात आवडते पुष्प म्हणजे ब्रह्मकमळ हे केवळ याच रात्री फुलते. अश्‍विन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा तसेच रास पौर्णिमा देखील म्हणतात. काही ठिकाणी या उपवासाला कौमुदी पौर्णिमा देखील म्हणतात. कौमुदीचा अर्थ चंद्रप्रकाश. या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी पूर्णत्व प्राप्त करतो. 
कोजागिरी पौर्णिमेला एक धार्मिक 
मान्यता मिळाली असून त्यानुसार या दिवशी उपवास करून लक्ष्मीनारायणाची पूजा करावी आणि खीर तयार करून ती रात्री मोकळ्या आकाशात ठेवावी, असे म्हटले आहे. चंद्राचा प्रकाश खिरीत पडावा हा यामागचा उद्देश आहे.. दुसर्‍या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर खिरीचा प्रसाद आपल्या घरातील मंदिरातील देवाला दाखवावा आणि किमान तीन ब्राह्मणांना कुटुंबासह खिरीचा नैवैद्य द्यावा. या प्रसादाचे सेवन केल्याने अनेक आजारापासून सुटका होते. याचे वैज्ञानिक तथ्य पहिल्यास दूधात लॅक्टिक अ‍ॅसिड आणि अमृत तत्त्व देखील असते. हे तत्त्व चंद्र किरणातून अधिक प्रमाणात शक्ती शोषून घेते. तांदळात स्टार्च असल्याने ही प्रक्रिया सुलभ होते. रात्री दहा ते 12 वाजेपर्यंत प्रत्येकाने 
मोकळ्या आकाशात किमान अर्धा तास बसणे आवश्यक आहे. 
डोळ्याची शक्ती वाढवण्यासाठी दसर्‍यापासून ते कोजागिरीपर्यंत दररोज रात्री पंधरा ते वीस मिनिटे चंद्राकडे एकटक पाहावे, असे सांगितले जाते. शिथिल झालेल्या डोळ्यांच्या इंद्रियांंना बळकटी आणण्यासाठी चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर खाणे फायदेशीर आहे. कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या किरणातून अमृत पडते, असे म्हटले जाते. ही किरणे आरोग्याला फायद्याचे आहेत. धर्मग्रंथानुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी श्रीकृष्णाने गोपिकांबरोबर रासलीला केली होती. त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी रात्रीच्या वेळी भ्रमण करते. त्यामुळे जी मंडळी या काळात जागरण करतात, त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा राहते आणि त्यांच्या घरातून लक्ष्मी कधीही जात नाही, असे म्हटले जाते. 
कोजागिरी पौर्णिमेला जर शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले तर, या दिवसांपासून ऋतू बदलतो आणि हिवाळा सुरू होतो. आता थंडी सुरू झाली आहे. या दिवशी खीर खाण्याचा अर्थ म्हणजे थंडीचा मोसम सुरू झाला आहे, असे मानले जाते. त्यामुळे गरम पदार्थाचे सेवन सुरू करण्यास हरकत नाही आणि या कृतीने शरिराला ऊर्जा मिळते, असे समजण्यात येते. कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र हा आरोग्यासाठी लाभदायी आहे. या प्रकाशामुळे पित्त, तहान आणि अग्नि दूर होतो. या रात्री वैद्य औषधीवनस्पतीतून औषधे तयार करतात. संशोधकांच्या मते, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी औषधी तत्त्व हे अधिक परिणामकारक असतात. याशिवाय चंद्र हा पृथ्वीच्या जवळ येतो आणि यामुळे शरीर आणि मन दोन्हींना आरोग्य प्रदान होते.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून आराध्य देवांना सुंदर वस्त्रांनी सुभोषित करून आवाहन करावे. गंध, अक्षता, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, सुपारी, दक्षिणा आदींनी देवतांचे पूजन करावे. रात्रीच्या वेळी गायीच्या दूधापासून तयार केलेल्या खिरीत तूप आणि साखरचे मिश्रण करून मध्यरात्रीला देवाला नैवैद्य दाखवावा. संपूर्ण चंद्र आकाशात मध्यभागी आल्यानंतर त्याची पूजा करावी. तसेच रात्रीच्या वेळी खिरीने भरलेले भांडे मोकळ्या आकाशात ठेवावे. चंद्राचा शीतल प्रकाश खिरीवर येऊ द्यावा. त्यानंतर दुसर्‍या दिवशी भोजन करावे आणि त्याचा प्रसाद सर्वांना द्यावा. तसेच महिला वर्गांनी उपवास करून कथा ऐकावी, असेही सांगण्यात आले आहे. कथा ऐकण्यापूर्वी एका तांब्यात पाणी तसेच ग्लासात गहू आणि विड्याची पाने चोहोबाजूंनी ठेवून कलशपूजन करावे. तेथे दक्षिणा ठेवावी. त्यानंतर कुंकू लावून गव्हाचे 13 दाणे हातात घेऊन कथा ऐकावी. कथा संपल्यानंतर ताब्यातील पाणी चंद्राला अर्ध्य देऊन आशीर्वाद घ्यावा, असे सांगितले जाते. 
अवंती कारखानीस