पुस्तक परिक्षण 1960 नंतर दलित (आंबेडकरी) अस्मिता व्यक्त होऊ लागली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून अण्णाभाऊ साठे, श्री. म. माटे, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, दया पवार, प्र. ई. सोनकांबळे, वामन निंबाळकर, योगीराज वाघमारे, अविनाश डोळस, प्रा. दत्ता भगत, प्रा.रविचंद्र हडसनकर या आणि अनेक दलित (आंबेडकरी) लेखकांनी संवेदना शब्द हे शस्त्र समजून मांडणी केली. अन्याय,  अत्याचार, विद्रोह शब्दक्रांतीतून पेरला. ही शब्दक्रांती पुढे समतेचा विचार करु लागली. एकता, समानता, मानवता शब्दक्रांती घडवून आणू लागली. ही समतेची पाऊल वाट घेऊन स्तंभलेखक उत्तम कानिंदे व कवी रमेश मुनेश्वर यांचा ‘शब्दक्रांती’ हा संपादित प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.


विश्वरत्न, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन करुन मुंबई येथे सिध्दार्थ महाविद्यालय, तर औरंगाबाद येथे मिलिंद 
महाविद्यालय सुरु केले. यामुळे बहुजन, दलित (आता आंबेडकरी म्हणू या), मागासलेल्या समाजाला शिक्षणाचे द्वार खुले झाले. सर्वंजन आत्मविश्वासाने शिकुन पुढे जाऊ लागले. शिक्षणामुळे आत्मभान जागे झाले. प्रस्थापिकांच्या विषमतावादी, वर्णव्यवस्था, जातीयवादी प्रवृती विरोधात नकारात्मक भूमिका साहित्यातून मांडू लागले. इ.स.1960 नंतर दलित (आंबेडकरी) अस्मिता व्यक्त होऊ लागली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून अण्णाभाऊ साठे, श्री. म. माटे, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, दया पवार, प्र.  ई. सोनकांबळे, वामन निंबाळकर, योगीराज वाघमारे, अविनाश डोळस, प्रा. दत्ता भगत, प्रा.रविचंद्र हडसनकर या आणि अनेक दलित (आंबेडकरी) लेखकांनी संवेदना शब्द हे शस्त्र समजून मांडणी केली. अन्याय,अत्याचार विद्रोह शब्दक्रांतीतून पेरला. ही शब्दक्रांती पुढे समतेचा विचार करु लागली. एकता, समानता, मानवता शब्दक्रांती घडवून आणू लागली. ही समतेची पाऊल वाट घेऊन स्तंभलेखक उत्तम कानिंदे व कवी रमेश मुनेश्वर यांचा ‘शब्दक्रांती’ हा संपादित प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. या काव्यसंग्रहास प्रसिद्ध कवी तथा गीतकार प्रा.रविचंद्र हडसनकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आहे. दंभस्फोटकार तथा समिक्षक प्रा. डॉ.प्रकाश मोगले यांनी पाठराखन केली आहे. हा काव्यसंग्रह ‘क्रांतीसूर्य प्रकाशन’, किनवटने प्रकाशनास आणला आहे. जागतिक स्तरावर पोहचलेला चित्रकार रणजीत वर्मा माहूर यांनी सुरेख मुखपृष्ठ रेखाटले आहे. मानवांच्या संवेदना लेखनीतून मांडून धम्मचक्र गतीमान करणारे सूचक मुखपृष्ठ आहे.
या काव्यसंग्रहात एकुण चाळीस नामवंत कविंच्या कविता आहेत. ‘शब्दक्रांती’या काव्यसंग्रहातून विश्वाला शांतीचा, करुणेचा संदेश देणारे महाकरुणीक तथागत सम्यक सम्बुध्द यांचा प्रज्ञा, शील, करुणा, अत् दीप भवचा संदेश दिली. महात्मा कबीर, महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची पेरणी केली आहे. ज्येष्ठ कवी रामजी कांबळे यांनी ‘वेमुला’ या कवितेतून आज आंबेडकरी समाज शिकुन प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. ही शैक्षणिक क्रांती पाहून मनुवादी वृत्तीचे जळत आहेत; परंतु बाबासाहेबांचे ग्रंथ जो वाचतो तो समतेचा वाहकच बनतो. वेमुला अगदी असाच घडत गेला. हा समतेचा संदेश दिला आहे. ‘ऍट्रासिटी’ या कवितेतून  ‘ऍट्रासिटी’ कायद्याविषयी समज गैरसमज व महाराष्ट्राचा पूर्व इतिहास, जातीय महत्त्व नोंदविले आहे.
गझलकार, विद्रोही कवी मधू बावलकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र गतीमान केले आहे. वैज्ञानिक बुद्ध धम्म आपणास दिला आहे. वर्णव्यवस्था संपूण समता निर्माण करुन दिली आहे.
दीनाचा प्रगती पथदर्शक होता
दीनाची झोपडी टिकवीत होता
अस्मिता फुलवित होता
धम्मदान सर्वांना देत होता.
असा सर्वांना जीवदान देणारा 
माझा भीमराव होता 
हा विचार व्यक्त झाला आहे.
महापुरुष कोण्या एका जाती, धर्मांचे नसतात. ते मानवाच्या कल्याणाचा विचार करतात. हेच ज्येष्ठ कवी अ‍ॅड. के. के. साबळे यांनी ‘सर्व बाबांची मुले’ या कवितेतून व्यक्त केले.
सर्व जाती, जमाती मानती बाबाला,
बाबामुळेच त्यांचे जीवनी प्रकाश आला 
प्रसिद्ध नाटककार, कवी, प्रा. डॉ. अंबादास कांबळे ‘विचार’ या कवितेतून सर्वांनाच   विचारात टाकुन गेले.
शब्दात शब्दाला गुंफणे
आता काही जमत नाही!
वादळात अडकला जीव,
थांबण्या शिवाय पर्याय नाही! 
ही उदासिनता त्यांनी व्यक्तविली. डोळ्यांचा शोध! या कवितेत बाप व मुलांचे नांते व्यक्त केले आहे.
भीमशाहीर चंद्रकांत धोटे यांनी ‘विहारी गेले पाहिजे’ या कवितेतून वास्तव चित्रण केले. किमान दर रविवारी तरी विहारात गेले पाहिजे. सर्वाना वंदना आली पाहिजे. ते धम्म जनप्रबोधनाचा संदेश देतात.
विहारी गेले पाहिजे
मला ही नेले पाहिजे
उपासिका धम्माची
झाली पाहिजे
मामी तुमच्या पोरीला
वंदना आली पाहिजे 
आज ही परिस्थिती सर्वत्र आढळते. धम्माची उपासिका होऊन धम्मसंस्कार रुजविले पाहिजे असे तळमळीने ते सांगतात.
गीतकार सुरेश शेंडे यांनी बुध्द धम्माची कास धरावी, दुबळयाना साथ द्यावी, प्रज्ञेचे काजवे बनून पारदर्शक कार्य करा असा सल्ला दिला आहे.
प्रज्ञेचे काजवे बना आणि
त्या काजव्याची आरास व्हा.
कवी रुपेश मुनेश्वर यांनी ‘जोतीबा’ या कवितेतून-
सनातन्याच्या छाताडावर
तुच घाव घातले घनाचे
जोतीबा तुझ्या ज्योतीने
जीवन उजळले बहुजनाचे 
शब्दक्रांतीसाठी अत्यंत विद्रोहाची चीड व्यक्तविली आहे.
प्रसिद्ध कवी रमेश मुनेश्वर यांनी ‘चवदार पाणी’ या कवितेतून, मनुवादी प्रवृतीच्या विचाराने माणसाचा विटाळ मानायचे, सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्य समजून येऊ देत नव्हते. पाणी निसर्गाची देणगी असून ते पाणी पिण्यासाठी मनाई होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन दलितांना हक्क मिळवून दिला.
‘तू,
हात लावलास
आणि पेटले पाणी! 
अशी क्रांती बा भीमाने केली
स्वाभिमान मिळून दिला 
तर, प्रसिध्द कवी प्रा.डॉ.गजानन सोनोने यांनी लोकशाही ही आमची आहे. शासन तुमचे असले तरी आम्ही मुक्त आहोत. आम्ही व्यवस्थेचे गुलाम नाही. भारतीय संविधानाने आम्हाला लोकशाही दिली आहे.
शासन जरी तुमचं असलं
तरी मतदान आमचं आहे
पेशवाई जरी तुमची असली
तरी लोकशाही आमची आहे.
अशी मनातील धग  व्यक्त केली. पुढे कविता ही महापुरुषांची विचारधारा पेरण्यासाठी क्रांतीची मशाल असते.
कविता असते
चवदार तळयाचे पाणी
काळ्या मंदिराची कहानी
मनुस्मृतीची जाळणी
ही क्रांतीची मशाल शब्दातून पेटवली आहे. प्रसिद्ध कवयित्री सुजाता पोपलवार यांनीही क्रांतीची गाणी गात आपल्या पूर्वजांच्या जाचांचा, छळांचा अनुभव व्यक्त करीत महापुरुषांच्या अथांग 
परिश्रमातून काळावर मात करुन, जुना इतिहास पुरून नवीन क्रांतीची सुरुवात झाली.
शाहू, फूले, आंबेडकर याच्यामुळे 
जीवनात उजेड आला 
उजेडाच्या राशीच राशी अंगणी 
फुलला फुल्यांचा मळा गं
विषमतावादी व्यवस्थेवर प्रहार केला आहे.
डॉ. किरण पाईकराव यांनी आपल्या कवितेतून एकतेचा संदेश दिला आहे. जात मोडीत काढण्यासाठी अन्याय विरुद्ध पेटूनी उठा, माणुसकीच्या रक्षणासाठी बुद्धविचार स्वीकारा-
पेटूनी उठा आता
जाती अन्याया विरुद्ध 
असा मोलाचा संदेश ‘धम्ममानव’ कवितेतून दिला आहे. तर ‘पर्यावरण रक्षण’ कवितेतून स्वःताच्या स्वार्थासाठी, आपण निसर्गाची लुट केली. तरी मानवाची भुक मिटली नाही. मानवी स्वार्थी स्वभावाचे दर्शन ....
स्वतःच्या स्वार्थासाठी
केली निसर्गाची लूट
अजून नाही भागली
या मानवाची भूक 
ही स्पष्ट व वास्तव परिस्थितीची जाणीव करून दिली आहे.
कवी महेंद्र नरवाडे यांनी ‘बोधीपथ’ या कवितेतून तथागत बुद्धाने सांगितलेला ‘अत्त दीप भव’ हा सिद्धांत व ‘प्रज्ञा, शील करुणा’ ही शिकवण जीवनात उपयोगात आणावे.
दोषयुक्त हे आपले जीवन
मुक्तीमार्ग तो सांगू लागला
काया-वाचा मलिन मनाला
चित्तशुध्दी तो सांगू लागला.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आमचे दोषयुक्त जीवन भारतीय संविधानातून मुक्त केले. स्वाभिमानाचे जीवन दिले. धम्म संस्काराने जीवन उजाळून निघाले. जीवनात बुध्दप्रकाश निर्माण झाला असा संस्कार कवितेतून केला आहे़.
गोड गळ्याचे गायक, कवी, प्राचार्य सुरेश पाटील यांनी ‘वामनदादा’या कवितेतून, लोककवी वामनदादा कर्डक यांनी बुध्द, फुले, आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार जनसामान्यात पेरुन समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. एकता, समानता निर्माण करण्यासाठी वामनदादानी समाजवास्तव आपल्या गीतातून 
मांडले. किमान दहा हजार भीमगीते वामन दादानी लिहिले.
झिजवून लेखनी अन् वाणी
सोसून ऊन, वारा पाणी
वामन फिरला अनवाणी
गात भीमाची गाणी
ही रचना सादर केली.
कवी माणिक भवरे यांनी ‘महात्मे’ ही  विद्रोही कविता मांडली.
पहाता- पहाता
सारे महात्मे
मनुस्मृतीने गुलाम केले
आज या वैचारिक विचाराचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढे चालावे लागेल. बौध्दाचार्य, कवी अनिल उमरे यांची ‘आरक्षण’ ही कविता वास्तवतेची जाणिव करुन देते.
एवढीशी झोपडी आमची
तुमचा माळ्यावर माळा
फक्त आरक्षण आहे आमच्याकडे
त्याच्यावरही तुमचा डोळा
 प्रा. विनोद कांबळे यांनी ‘जयभीम’ या कवितेतून आमच्या पूर्वजांनी जे जीवन जगले, भोगले ते आमच्या वाट्याला आले नाही. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी कार्यातून आज आमच्या जीवनास अर्थ प्राप्त झाला आहे. जयभीम हेच आमुच्या जीवनाचा अर्थ आहे.
हाल अपेष्टा भोगल्या किती अन् कशा
पशू पेक्षाही बत्तर ठरली इथे नरदशा
क्रांतीसूर्याच्या तेजाने उजाळल्या दाही दिशा
संविधानामुळे सन्मानाने लागलो जगाला 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातून आमच्या जीवनाचे सोनं केले आहे. याची जाणीव कवी व्यक्त करतात. या काव्यसंग्रहातील प्रा.एस.डी. वाठोरे यांची ‘ज्योती’ प्रा. आनंद सरतापे यांनी ‘असहिष्णुता’ भारतध्वज सर्पे यांची ‘मुक्तीपथ’, ‘रुजवण’, राजा तामगाडगे यांची ‘आतातरी जागा हो’, वंदना तामगाडगे यांची कविता ‘हिरमुसले’, ‘जगण्याचं सोंग’, युवा कवी राजेश पाटील यांच्या ‘भीमराव नोटांवर’, ‘बुद्धिस्ट’ ह्या कविता शब्द क्रांती घडविणार्‍या आहेत. अभियंता मनीष गवई-‘कठीण आहे’, बाबा, 
मारोती काळबाडे-‘शाहू छत्रपती, बदलुन गेलं गाव’, सीमा पाटील-‘देशाची इच्छा’, ‘स्टेजवर चढू देता का?’, सुमेध घुगरे-‘जयभीम नारा’, ‘संविधान लयभारी’, प्रतिक्षा ठमके-‘आई मला जन्म दे’, ‘जीवनदाता’, प्रा.सुबोध सर्पे-‘दुःखीतांची गाणी’, ‘सामर्थ्य एकतेचे’, धनराज हलवले-‘निर्धार’, ‘
फुटलेला चष्मा’, डॉ. राजू मोतेराव -‘निर्धार’, राजू कांबळे -‘भीम शोधतो मी’, ‘धडे एकतेचे’, शांता राके -‘क्रांतीसूर्य’, ‘भावना’, रितीक जोगदंडे-‘चळवळीची दिशा’, ‘जात नाही अशी जात’, शेषराव पाटील- ‘अडाणी आई’, ‘भिकारी’, सोमा पाटील -‘गौरव संविधानाचा’, ‘मी असा घडलो’, नंदा नगारे-‘जीवन’, ‘नोटाबंदी’,  परमेश्वर सुर्वे- ‘गांडूळाची औलाद’, ‘ज्ञानाचे प्रतिक’, चंचलकुमार मुनेश्वर- ‘समाज मन’, ‘निर्धार’वरील सर्व प्रसिद्ध कविंनी या काव्यसंग्रहातील शब्दक्रांतीला सामाजिक क्रांतीचा लढा बनवून समतेचा विचार पेरला आहे.
0 शब्दक्रांती ः  प्रातिनिधिक काव्यसंग्रह
0 संपादकः  उत्तम कानिंदे, रमेश मुनेश्वर
0 पृष्ठ संख्या- 76, किंमत -100
-  प्रा. डॉ. पंजाब लक्ष्मणराव शेरे, मराठी विभागप्रमुख, बळीराम पाटील कला, 
वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किनवट. 9767623069