अलीकडील काळात जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाच्या ऑपरेशन्स -मुळे आणि अत्यंत कडक टेहळणीमुळे दहशतवाद्यांची कोंडी झालेली पाहायला मिळाली. मात्र अफगाणिस्तानात तालिबानी राजवट प्रस्थापित झाल्यापासून पाकिस्तानचे मनोबल उंचावले आहे. तसेच पाकपुरस्कृत संघटनांही नव्याने सक्रिय झाल्या आहेत. गेल्या काही आठवड्यातील जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सामान्य माणसाला लक्ष्य करण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. यामागची कारणे शोधताना सर्वप्रथम काश्मीरचे दोन भाग लक्षात घ्यायला हवेत. एक म्हणजे काश्मीर खोरे  आणि दुसरा म्हणजे पीर पंजाब या पहाडीमागील भाग. या दुसर्‍या भागामध्ये जम्मू, उधमपूर, पूँछ, राजौरी, सुरणकोट यांचा समावेश होतो. काश्मीर खोर्‍याचा विचार करता गेल्या दोन आठवड्यात तेथे 17 स्थलांतरित मजुरांना दहशतवाद्यांनी लक्ष्य करुन त्यांना ठार करण्यात आले आहे. त्यामुळे काश्मीर खोर्‍यात राहणार्‍या काश्मीरबाह्य मजुरांनी परतीचा मार्ग पत्करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे भारतीय लष्कराचे दहशतवादविरोधी अभियान सुरू असताना आणि त्यात त्यांना चांगले यश येत असताना ही घटना घडली आहे. गेल्या 4 दिवसांत लष्कराने 13 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यापैकी 12 दहशतवादी हे स्थानिक काश्मिरी दहशतवादी होते. म्हणजेच स्थानिक काश्मिरी दहशतवाद्यांनी बाहेरच्या राज्यातून काश्मीरमध्ये आलेल्या भारतीयांची हत्या केली आहे. दहशतवादाची ही बदललेली मोडस ऑपरेंडी किंवा पद्धती लक्षात घेतली पाहिजे. काश्मीरमधील दहशतवाद्यांची भारतीय सैन्याशी लढण्याची हिंमत नाहीये. त्यामुळे त्यांनी आता सॉफ्ट टार्गेटची निवड करत परप्रांतियांना लक्ष्य केले आहे. यामध्ये विविध प्रकारच्या रोजगारासाठी बिहारसारख्या राज्यातून काश्मीरला गेलेल्यांचा समावेश आहे. यात कुणी सुतारकाम करणारे आहे, तर कुणी गवंडी कामासाठी गेले आहे; तर कुणी पाणीपुरी विक्रून आपला उदरनिर्वाह करणारे आहेत. काश्मीरमधील दहशतवाद्यांनी या सर्वांचे जगणे दुष्कर केले आहे. 

गेल्या दोन वर्षांत काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होऊ लागली होती. परिणामी, तेथे पर्यटनव्यवसाय बहरु लागला होता. उद्योगधंद्यांची पहाट उजाडू लागली होती. त्यामुळेच देशाच्या इतर राज्यातील गरीब लोक तेथे येऊन रोजगार मिळवत होते. याला आता मोठा धक्‍का बसला आहे.  

आता प्रश्‍न उरतो तो स्थानिक दहशतवादी डोके का वर काढत आहेत? या दहशतवाद्यांना पिस्तुल आणि अन्य शस्रांचा पुरवठा सीमेपलीकडून ड्रोनच्या साहाय्याने केला जात आहे. आजही काश्मीर खोर्‍यात या दहशतवाद्यांना मदत करणारे स्थानिक मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळेच परप्रांतियांचा आणि काश्मिरमधील पंडितांचा, मुस्लिमेतर धर्मियांचा संहार मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. 1980 च्या किंवा 90 च्या दशकात जशी परिस्थिती काश्मीरमध्ये निर्माण झाली होती तसेच वातावरण सध्या निर्माण झाले आहे. 

असे असले तरी येणार्‍या दिवसांमध्ये भारतीय लष्कर आपले दहशतवादविरोधी अभियान अधिक गतीशील करेल आणि या नंदनवनाला रक्‍तरंजित करण्याच्या हेतूने आलेल्या दहशतवाद्यांचा आणि त्यांना रसद पुरवणार्‍यांचा बंदोबस्त करेल, याची मला खात्री आहे. 

जम्मूबरोबरच काश्मीरच्या दुसर्‍या भागातही दहशतवादी हिंसाचाराने डोके वर काढले आहे. उपलब्ध माहितीनुसार गेल्या आठवड्यामध्ये आपण या भागात दोन जेसीओ आणि 7 जवान दहशतवाद विरोधी अभियानादरम्यान हुतात्मा झाले आहेत. घुसखोरी करुन आलेल्या गटाचा पूर्ण खात्मा करण्यात अद्याप यश आलेले नाही. 

वस्तुतः, गेल्या दोन वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरच्या खालच्या भागात एकही दहशतवादी कृत्य झालेले नव्हते. त्यामुळे काश्मीरमधील दहशतवाद हा केवळ खोर्‍यापुरताचा सीमित आहे, असे म्हटले जात होते. मात्र गेल्या आठवड्यात याला एक मोठा धक्‍का बसला. काही दिवसांपूर्वी तेथे एका जहाल दहशतवादी गटाने घुसखोरी केली आहे. ते अत्यंत कडवे दहशतवादी असल्याचे समजते. त्यामध्ये तालिबानी दहशतवादी तसेच पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल फोर्सेसच्या सैनिकांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे. अन्यथा आपले इतके रक्‍त कधीच सांडले नसते. आपल्या ज्या सैनिकांनी बलिदान दिले, ते अत्यंत प्रशिक्षित, शूर, जाँबाज आणि  घातक अशा प्‍लॅटूनचे जवान होते. अशा जवानांचा जर मृत्यू झाला असेल तर आत घुसून आलेेले दहशतवादी हे अत्यंत कडवे आहेत. 

एक गोष्ट उघड आहे ती म्हणजे अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता ही पूर्णतः पाकिस्तानच्या पाठबळावर आली आहे. आता पाकिस्तानला   तालिबानी दहशतवाद्यांना भारतात काश्मीरमध्ये घुसवण्यासाठी धडपडत आहे. त्यामुळेच ज्या भागामध्ये आजवर कधीच दहशतवाद पाहायला मिळाला नाही अशा भागात आता दहशतवादी कृत्ये घडताना दिसून येत आहेत. तालिबानचे दहशतवादी हे अत्यंत कडवे आहेत; मात्र भारतीय जाँबाज जवान त्यांना मारण्यात यशस्वी होतील, यात शंका नाही. पण त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागू शकते. 

काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचारातील सर्वांत वाईट बाब म्हणजे यामध्ये परप्रांतियांना, हिंदू-शीख धर्मियांना मारुन दहशतवाद्यांनी एक संदेश दिला आहे. तो म्हणजे काश्मीरमध्ये रोजगारासाठी, विकास कामात सहभागी होण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी कोणी आलात तर तुमची गय केली जाणार नाही. वास्तविक, या बाहेरुन येणार्‍या मजुरांची, कुशल-अकुशल कामगारांचा काश्मीरलाही गरज आहे. कारण काश्मीरमध्ये धनाढ्यांची, श्रीमंतांची संख्या भरपूर आहे. साहजिकच, अशी कामे करण्यासाठी त्यांना बाहेरुन येणार्‍या मजुरांची गरज भासतच असते. अशा वेळी या मजुरांना जर मारण्यात येऊ लागले तर त्यातून होणारे नुकसान हे अंतिमतः काश्मीरचेच असणार आहे. तसेच नव्याने अंकुर फुटू लागलेल्या पर्यटनालाही यामुळे मोठा फटका बसू शकतो. पाकिस्तान आणि चीन या भारताच्या शत्रू राष्ट्रांना नेमके हेच हवे आहे. काश्मीरची प्रगती होता कामा नये, काश्मीरमध्ये उद्योगधंदे वाढता कामा नयेत, तेथे सतत हिंसाचार सुरू राहावा याच कुटिल हेतूने ही दोन्ही राष्ट्रे सदोदित प्रयत्नशील असतात. दुर्दैवाने, बाहेरच्या राज्यातून काश्मीरमध्ये येणार्‍यांची संख्या खूप मोठी असल्याने त्या सर्वच्या सर्व नागरिकांचे रक्षण करणे हे जवळपास अशक्य असते. सध्याच्या परिस्थितीनंतर अशा कर्मचार्‍यांना आता पोलिसांच्या आणि लष्कराच्या छावण्यांजवळ हलवण्यात येत आहे; पण तिथे राहून त्यांना आपले काम करता येणार नाही. तसेच भयमुक्‍त वातावरणात ते कसे टिकू शकतील? त्यामुळे स्थानिक दहशतवाद्यांचा शोध घेणे, त्यासाठी आपली गुप्तचर यंत्रणा अधिक सक्रिय करणे हे आपल्या सुरक्षाव्यवस्थेपुढील एक मोठे आव्हान बनले आहे. 

पाकिस्तानची डोकेदुखी भारताला नवी नाही. गेली पाच दशके आपण ती सहन करतो आहोत. पण आता त्याला केवळ पारंपरिक पद्धतीने उत्तर न देता जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे. पारंपरिकरित्या करावयाच्या उपाययोजनांमध्ये आक्रमक मुत्सद्देगिरीपासून, सीमेवर सैन्य आणून आक्रमक पवित्रा घेण्यापासून, तोफखान्यांचा वापर करणे,  धडक कार्यवाही (हॉट पर्स्यूट) करणे आणि अतिरेकी प्रशिक्षण शिबिरांवर छापे व हल्ले चढवणे यांचा समावेश होतो. तो जरुर करावाच; पण त्याजोडीला असंख्य समस्यांनी ग्रासलेल्या पाकिस्तानच्या मर्मस्थळांवर घाव घालण्यासही  आता सुरुवात केली पाहिजे.  सिंध, पाकव्याप्त काश्मीर, एनडब्ल्यूएफपी , बलुच या भागातील खदखद आपल्याला नवी नाही. पाकिस्तानातील या फुटीरवादाला चालना देणे,  ‘आयएसआय’ला लक्ष्य करण्यासाठी ‘सीआयए’, ‘मोसाद’ यांसारख्या मित्रपक्षी गुप्तवार्ता संकलन संस्थांचा वापर करणे गरजेचे आहे. थोडक्यात, पाकिस्तानमधल्या अंतर्गत असंतोषाला सक्रिय पाठिंबा देऊन भारत पाकिस्तानचा डाव उलटवू शकतो. यासाठी दहशतवाद संपवण्यासाठी एक सर्वसमावेशक आणि दीर्घकालीन योजना तयार करणे जरुरी आहे. 

काश्मीरमध्ये सध्या 1980 -90 च्या दशकासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंसाचार किंवा दहशतवादी कारवाया या काश्मीरसाठी नव्या नाहीत; मात्र आता दहशतवाद्यांनी आपली रणनीती बदलली आहे. सैन्याच्या कठोर आणि आक्रमक पवित्र्यामुळे दहशतवाद्यांनी परप्रांतियांचा आणि काश्मिरमधील पंडितांचा, मुस्लिमेतर धर्मीयांचा संहार सुरू केला आहे.  पूर्वी ज्या भागात दहशतवादी कारवाया होत नसत तिथेही आता दहशतवादी कृत्ये घडत आहेत. या परिस्थितीला भारतीय लष्कर सक्षमपणाने तोंड देईलच; पण पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आता दीर्घकालीन रणनीती आखलीच पाहिजे. 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)