अखेरपर्यंत अटीतटीच्या ठरलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली. अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वाधिक खर्चिक निवडणूक ठरली. याखेरीज निवडणूक जाहीर झाल्यापासून अमेरिकेत शस्त्रास्त्रांची विक्री प्रचंड प्रमाणात झाल्यामुळे निवडणुकीनंतर वातावरण तंग होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली होती. या बहुचर्चित निवडणुकीत बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला असला, तरी इथून पुढे त्यांची लढाई खर्‍या अर्थाने सुरू होत आहे. कारण त्यांना एक अस्ताव्यस्त देश मिळाला असून, अमेरिकेची घडी पुन्हा बसविण्यापासून नाजूक आंतरराष्ट्रीय परिस्थितीपर्यंत अनेक आव्हाने त्यांच्यासमोर उभी आहेत.

राष्ट्रपती म्हणून त्यांची आता नवीन लढाई सुरू होत आहे. कोरोनाचे संकट अद्याप संपुष्टात आलेले नाही. उलट, अनेक पाश्‍चात्य देशांमध्ये या आजाराची दुसरी लाट आली असून, ती पहिल्या लाटेपेक्षा भयावह असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळेच डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी अमेरिकी जनतेची नाराजी वाढली होती, असे मानले जाते. निवडणुकीच्या प्रचारातसुद्धा जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर सर्वाधिक हल्ले कोरोनाच्या विषयावरूनच चढविले होते. त्यामुळे आता सत्तेवर आल्यानंतर कोरोनाच्या साथीचा यशस्वीपणे मुकाबला करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आपण ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक सक्षम आहोत, हे दाखवून द्यावे लागेल.

कोरोनाच्या संकटानेच अमेरिकेसह संपूर्ण जगात लॉकडाउनचे संकटही लादले. त्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड बेरोजगारीचे आव्हान बायडेन यांच्यासमोर असेल. एका अहवालानुसार, कोरोनाच्या संकटकाळात अमेरिकेत केवळ एप्रिल महिन्यातच 66 लाख लोकांनी बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज केले होते. अमेरिकेच्या श्रम मंत्रालयाने ही आकडेवारी जारी केली होती. अमेरिकेत कोरोनामुळे असंख्य लोकांनी नोकर्‍या गमावल्या असून, ही प्रचंड बेरोजगारी अराजकाला निमंत्रण देणारी ठरू शकते, असे इशारे दिले गेले आहेत. ज्या लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत, त्यांना पुन्हा एकदा रोजगार उपलब्ध करून देण्याचे आव्हान बायडेन यांच्यासमोर असणार आहे. मुळात त्यासाठी अर्थव्यवस्था सुधारण्याची गरज आहे. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने अर्थव्यवस्था सुधारण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आश्‍वासन दिले होते. या आघाडीवर बायडेन किती आणि कसे काम करतात, याकडेही अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष असेल. कारण अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. ट्रम्प यांनी कोरोनाच्या संकटकाळातसुद्धा अर्थव्यवस्थेची फिकीर अधिक केल्यामुळेच अनेकदा लॉकडाउनची शक्यता निर्माण होऊनसुद्धा तसा निर्णय टाळला होता; परंतु कोरोनाचे संकट वाढल्यास लॉकडाऊन जाहीर केला तर अर्थव्यवस्थेची पीछेहाट आणि लॉकडाउन टाळल्यास प्राणहानी अधिक होण्याची धास्ती, अशा दुहेरी संकटांचा सामना करावा लागणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे जगाची चीनविषयी नाराजी आहे. या नाराजीचे उत्तर चीनने आक्रमकता वाढवून देण्याचे ठरविलेले दिसते. चीनच्या कुरापती सर्वत्र वाढत चाललेल्या दिसत आहेत. ट्रम्प यांनी चीनविषयी अत्यंत कठोर दृष्टिकोन स्वीकारला होता आणि त्यामुळे अमेरिका-चीनदरम्यान व्यापार युद्धालाही तोंड फुटले होते. चीनविषयीचे हेच धोरण बायडेन कायम ठेवतात की चीनशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारतात, याकडेही जगाचे लक्ष असेल. कारण अनेक देशांची पुढील वाटचाल त्यावर अवलंबून असेल. भारतासारख्या देशावर तर अमेरिकेच्या चीनविषयक धोरणाचा मोठा परिणाम होऊ शकतो.

भारताला चीनच्या आक्रमकतेची आणि विस्तारवादी धोरणांची झळ बसत आहे. अशा काळात ट्रम्प यांनी चीनविषयी अत्यंत कडक धोरण अवलंबिले होते आणि ते भारताच्या दृष्टीने फायद्याचे होते. अमेरिका आणि चीनमधील संबंधही सध्या प्रचंड ताणले गेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर जो बायडेन यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तणाव निवळण्यासाठी ते काय करतात आणि चीनविषयी किती कडक धोरण अवलंबितात, हे पाहावे लागेल. चीन आणि अमेरिकेदरम्यान जे व्यापारयुद्ध सुरू आहे, ते बायडेन संपुष्टात आणतात की ट्रम्प यांच्याप्रमाणेच कडक धोरण स्वीकारून विस्तारवादाला उघड विरोध करतात, याकडे जगाचे लक्ष आहे. हा अत्यंत कळीचा मुद्दा असून, संपूर्ण जगाला चीनच्या आक्रमक धोरणाची चिंता असल्यामुळे बायडेन यांच्या निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व असणार आहे.

कोरोनाशी लढाई, अर्थव्यवस्थेची पीछेहाट आणि चीनचा विस्तारवाद याबरोबरच बायडेन यांच्यासमोर आणखीही काही आव्हाने असणार आहेत. गेल्या काही महिन्यांत ‘ब्लॅक लाइव्ज मॅटर’ नावाची एक चळवळ संपूर्ण अमेरिकेत सुरू आहे. एवढेच नव्हे तर तिचे लोण जगभर पसरले आहे. एका कृष्णवर्णीयाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर तेथील वंशवाद उफाळून आला असून, तो शांत करण्याचे आव्हान बायडेन यांच्यासमोर असणार आहे. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न ट्रम्प यांना निवडणुकीत भोवला असे स्पष्टपणे सांगितले जाते. अमेरिकी किंवा बिगर अमेरिकी या वादाबरोबरच धार्मिक आणि वांशिक आधारावरही अमेरिकेत दर्‍या जाणवत आहेत. या निवडणुकीनंतर जी हिंसाचाराची भीती लोकांना वाटत होती, त्याचे एक कारण हेही आहे. अशा स्थितीत अमेरिकेला ‘सबका साथ, सबका विकास’ या मार्गावर नेण्याचे आव्हान बायडेन यांच्यासमोर आहे. मिनेसोटा येथील एका सभेत बायडेन यांनी सांगितले होते, “आणखी चार वर्षांसाठी ट्रम्प यांना राष्ट्रपतिपदी अमेरिका सहन करू शकणार नाही.

अमेरिकेतील एकतेला सुरुंग जगात केवळ अमेरिकाच लावू शकते आणि ट्रम्प यांनी सुरुवातीपासून तेच केले. त्यांची कार्यपद्धती मनामनात विभक्तपणा आणणारी आहे. वंश, जाती आणि राष्ट्रीयत्वाच्या नावाखाली अमेरिकी लोकांना विभक्त करून त्यांनी एकमेकांच्या विरोधात उभे केले आहे; परंतु आम्ही असे नाही. डोनाल्ड ट्रम्प कोण आहेत, हे सर्वांना कळून चुकले आहे. आता आम्ही कोण आहोत हे त्यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे.” या वक्तव्याच्या पार्श्‍वभूमीवर आता बायडेन यांना खरोखर आपले धोरण लोकांना एकत्र आणण्याचेच आहे, हे दाखवून द्यावे लागणार आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक स्वरूपात विस्कळीत झालेली, अस्ताव्यस्त झालेली, नोकर्‍या गमावलेल्या असंख्य तरुणांमुळे नाराज असलेली, आंतरराष्ट्रीय आव्हानांमुळे थकलेली अमेरिका बायडेन यांच्या हातात आली आहे. आता अमेरिकेला पुन्हा एकदा वैभवाचे दिवस दाखविण्याचे आणि अंतर्गत तसेच बाह्य परिस्थिती अनुकूल करण्याचे आव्हान बायडेन यांच्यासमोर आहे.

‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक स्वरूपात विस्कळीत झालेली, अस्ताव्यस्त झालेली, नोकर्‍या गमावलेल्या असंख्य तरुणांमुळे नाराज असलेली, आंतरराष्ट्रीय आव्हानांमुळे थकलेली अमेरिका बायडेन यांच्या हातात आली आहे. आता अमेरिकेला पुन्हा एकदा वैभवाचे दिवस दाखविण्याचे आणि अंतर्गत तसेच बाह्य परिस्थिती अनुकूल करण्याचे आव्हान बायडेन यांच्यासमोर आहे. देशात वेगवेगळ्या स्तरांवर निर्माण झालेली दुफळी कमी करून समाजात एकजिनसीपणा आणण्याचे कामही त्यांना करावे लागणार आहे.
- अमोल पवार, कॅलिफोर्निया