गुजरातमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने (डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स -डीआरआय) अंमली पदार्थांच्या तस्करीची नुकतीच एक खूप मोठी कारवाई केली आहे. डीआरआयने जगातील सर्वांत मोठ्या ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश केला असून, कच्छ येथील मुंद्रा बंदरावर झालेल्या या कारवाईत एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तीन हजार किलो हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या हेरॉइनची किंमत सुमारे 9 हजार कोटी रुपये एवढी प्रचंड आहे. या कारवाईत आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या तस्करीशी संबंधित काही अफगाणी नागरिकांचाही शोध जारी आहे. या छाप्यानंतर दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, गांधीधाम, मांडवी येथेही छापेमारी आणि तपास सुरू आहे. मुद्रा बंदराची मालकी ‘अदानी पोर्ट’ यांच्याकडे आहे. ‘अदानी पोर्ट’ ही प्रथितयश उद्योजक गौतम अदानी यांची कंपनी आहे. ‘डीआरआय’ आणि सीमा शुल्क विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणावर हेरॉइन जप्त करण्यात यश आले. पाच दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरू होते. या कारवाईदरम्यान मुद्रा बंदरातील दोन कंटेनरची तपासणी केली असता 9 हजार कोटींचे हेरॉइन जप्त करण्यात आले. या ड्रग्ज तस्करीत खूप मोठे रॅकेट कार्यान्वित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज, तेही अदानी समूहाच्या ताब्यात असणार्‍या बंदरावर सापडल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारला विरोधी पक्षांनी लक्ष्य केले आहे. हेरॉइनचे हे मोठे घबाड अफगाणिस्तानातून पाठविण्यात आले होते आणि ते ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात येणार होते, असा दावा केला जात आहे. या घटनेमागे तालिबानचा हात असल्याचेही बोलले जात आहे. अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा झाल्यानंतर अंमली पदार्थांची तस्करी जगभरात वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाला हेरॉइन भारतामार्गे का पाठविण्यात आली, तसेच संपूर्ण जगभरात हेरॉइनचे नेटवर्क कसे काम करते, हे जाणून घेणे आवश्यक आहे. अफगाणिस्तान हा जगातील सर्वांत मोठा हेरॉइन उत्पादक देश आहे. जगभरात जेवढी हेरॉइन तयार होते, त्यातील 80 टक्के उत्पादन अफगाणिस्तानातच होते. इराण, पाकिस्तान या शेजारी देशांच्या मार्गाने जगभरात त्याची तस्करी केली जाते. गांजा आणि हशीशचे उत्पादनही अफगाणिस्तानातच सर्वाधिक होते. वास्तविक ओपियम पॉपी नावाच्या रोपाच्या फुलापासून मिळणार्‍या लॅटेक्समधून हेरॉइन तयार केले जाते. एका      फुलापासून सुमारे 30 ग्रॅम लॅटेक्स मिळतो. तो सुकवून ओपियम म्हणजेच अफीम तयार केले जाते. ओपियममध्ये 12 टक्के अल्कोलाइड मॉर्फिन असते. हेच मॉर्फिन अन्य रसायनांमध्ये मिसळून हेरॉइन तयार केले जाते. 

अफगाणिस्तानातून हेरॉइन भारतात पाठविण्याचे दोनच मार्ग आहेत. पहिला मार्ग रस्त्याचा तर दुसरा सागरी मार्ग आहे. रस्त्यावरून पाठविण्यासाठी हेरॉइन आधी पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भीगातून पाठविले जाते. तेथून पंजाब आणि राजस्थानमार्गे हेरॉइन भारतात येते. अर्थात पंजाबमार्गे येणार्‍या हेरॉइनचे जास्तीत जास्त प्रमाण 500 किलो एवढेच असते. दुसरीकडे समुद्रमार्गे हेरॉइन भारतात पाठविण्यासाठीही पाकिस्तान हेच प्रमुख माध्यम ठरते. यामार्गे पाठविताना हेरॉइन आधी पाकिस्तानातून मोजांबिकला पाठविले जाते. तेथून ते दक्षिण भारताच्या किनारी प्रदेशात उतरविले जाते. याच मार्गाचा वापर हेरॉइन ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचविण्यासाठीही केला जातो. सर्वांत महत्त्वाची बाब अशी की, अफगाणिस्तानमार्गे अंमली पदार्थ संपूर्ण जगभरात पोहोचविण्यासाठी फक्त तीन मार्गांचाच वापर केला जातो. यातील पहिला म्हणजे ‘बाल्कन रूट’ होय. या मार्गे संपूर्ण युरोपात पुरवठा केला जातो. त्यानंतर नॉर्दर्न रूट म्हणजे उत्तरेकडील रस्त्याचा दुसरा क्रमांक लागतो. या मार्गे अमेरिकेपर्यंतच्या देशांना अंमली पदार्थांचा पुरवठा केला जातो. तिसरा रस्ता दक्षिणेकडील मार्ग असून, त्या मार्गाने ऑस्ट्रेलियापर्यंत ड्रग्ज पोहोचविले जातात. अफगाणिस्तानातील 34 प्रांतांपैकी 22 प्रांतांत ओपियमची शेती केली जाते. त्यातही 98 टक्के शेती फराह, हेलमंद, कंधार, निमरोज, उरुजगान आणि जाबुलमध्ये होते. त्यानंतर भारत, पाकिस्तान आणि चीनपासून रशिया, अमेरिका, कॅनडापर्यंत अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. याखेरीज पश्‍चिम, मध्य आणि आग्नेय युरोपपासून आग्नेय आशिया, आखाती देश, तुर्की, इराण, आफ्रिकेपर्यंत हेरॉइन आणि अफीम अफगाणिस्तानातून पोहोचविले जाते.

1994 मध्ये अफगाणिस्तानातील 70 हजार हेक्टर क्षेत्रावर अफीमचे उत्पादन करण्यात आले होते. 2020 पर्यंत हा आकडा वाढतच गेला आणि तो 2 लाख 20 हजार हेक्टरवर पोहोचला. संयुक्त राष्ट्रसंघाकडून जारी करण्यात आलेल्या एका अहवाला नुसार, एक किलो हेरॉइनच्या उत्पादनावर सुमारे एक कोटी रुपये एवढा खर्च येतो; परंतु तस्करीमुळे त्याची किंमत तब्बल सातपट वाढते. याच कारणामुळे भारतीय बाजारात हेरॉइनची किंमत सात कोटी रुपये प्रतिकिलो एवढी प्रचंड असल्याचे सांगितले जाते. अफगाणिस्तानप्रमाणेच म्यानमारमध्येही जगातील एकूण उत्पादनापैकी 25 टक्के हेरॉइनचे उत्पादन होते. अफगाणिस्तानातील हेलमंद प्रांतात तेथील उत्पादनापैकी दोन तृतीयांश उत्पादन होते. येथे ओपियमच्या शेतीचे महत्त्व किती आहे, याचा अंदाज लावायचा असेल तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती अशी, की हेलमंद प्रांतात हेरॉइनला ‘चौथी बिवी’ हा दर्जा दिला जातो. वस्तुतः अफगाणिस्तानात चौथा विवाह करतेवेळी माणूस वयाच्या ज्या टप्प्यावर पोहोचलेला असतो, त्यावेळी मेहेरची प्रचंड रक्कम चुकती करण्यासाठी ओपियमची शेतीच त्याला मोठा आधार देते. 

बॉलिवूडमध्ये ‘किंग खान’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या शाहरूख खानचा पुत्र आर्यन हा नुकताच एका क्रूज बोटीवरील रेव्ह पार्टीत ड्रग्ज सेवन केल्याच्या आरोपाखाली अकटेत आहे. तो केवळ शाहरूखचा मुलगा आहे म्हणून नव्हे तर त्याचे वय अत्यंत कमी असल्यामुळे ही बातमी महत्त्वाची बनली. भालाफेकीत देशाला सुवर्णपदक मिळवून देणारा 23 वर्षांचा नीरज चोपडा आणि आर्यन खान यांचे वय एकसारखेच आहे. त्यामुळे विशेषतः तरुण पिढीची चिंता वाटावी, असे हे वृत्त आहे. ड्रग्जच्या विळख्यात तरुण पिढी सापडली आहे आणि या दोन्ही घटनांच्या पार्श्‍वभूमीवर या युवा पिढीची चिंता भारताने प्रामुख्याने करायला हवी. 35 वर्षांपेक्षा कमी वय असलेली लोकसंख्या भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 65 टक्के आहे. म्हणूनच भारताला ‘तरुणांचा देश’ मानले गेले आहे आणि या युवाशक्तीच्या बळावर भारत प्रगतीच्या दिशेने मोठी मजल मारू शकतो, असे वारंवार सांगितले जाते; परंतु देशाच्या याच आघाडीवरच्या मजबूत फळीला अंमली पदार्थांसह अन्य व्यसने अक्षरशः कुरतडत आहेत. चाइल्ड लाइन इंडिया फाउंडेशनच्या 2014 च्या सर्वेक्षणानुसार देशातील युवा पिढी मोठ्या प्रमाणावर नशेच्या आहारी गेली आहे. यात अंमली पदार्थांच्या नशाखोरीचाही समावेश आहे. सरकारी आकडेवारी पाहिल्यास देशातील सुमारे 50 लाख तरुण हेरॉइनसारख्या अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकले आहेत.

हेरॉइन आणि अन्य अंमली पदार्थांबरोबरच विविध औषधांचाही नशेसाठी वापर करण्याचे प्रमाण भारतात वाढत आहे. एका आकडेवारीनुसार, देशातील 90 ते 95 लाख लोक दररोज भांगेची नशा करतात. 1992 ते 2012 पर्यंत अवघ्या वीस वर्षांत आपल्या देशात दारूच्या सेवनात 55 टक्क्यांनी वाढ झाली. 1992 मध्ये 300 लोकांमधील एकाला दारूचे व्यसन होते, तर 2012 मध्ये 20 पैकी एकजण दारूचे सेवन करतो, असे आढळून आले होते. आज परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. त्यातच अंमली पदार्थांच्या नशेचा राक्षस देशाला कुरतडू लागला आहे. याखेरीज तंबाखू, गुटखा, सिगारेट, विडी या व्यसनांमुळेही दरवर्षी लाखो लोक प्राण गमावतात. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे जगभरात दरवर्षी 54 लाख लोकांचा मृत्यू होतो आणि त्यापैकी 9 लाख लोक आपल्या देशातील असतात, हे दुर्दैव आहे. तरुण पिढीला वाचवायचे असेल आणि त्यांच्या मदतीने एक सशक्त भारत उभा राहावा असे वाटत असेल, तर पहिल्यांदा आपल्याला ही व्यसने आणि सर्व प्रकारच्या नशेखोरीला चाप लावावा लागेल.  
डॉ. जयदेवी पवार