(संग्रहित छायाचिञ)
वैद्यकीय कचरा म्हणजे ‘बायो-मेडिकल वेस्ट’ हे जगभरातील वैद्यकीय क्षेत्रासमोरील चिंतेचे प्रमुख कारण ठरले आहे. त्यामुळेच सुविधा अंदाजपत्रकातील (फॅसिलिटी बजेट) सुमारे 10 ते 20 टक्के भाग दरवर्षी मेडिकल वेस्ट निर्मूलनावर खर्च केला जातो. वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत जेवढा कचरा तयार होतो, त्यातील सर्वच्या सर्व धोकादायक असतो असे नाही. त्यातील काही टक्के भाग मात्र मानवी आरोग्य आणि पर्यावरणासाठी आत्यंतिक घातक असतो. ‘डब्ल्यूएचओ’ने दिलेल्या माहितीनुसार मेडिकल वेस्टमधील जवळजवळ 85 टक्के भाग हानिकारक नसतो, तर उर्वरित 15 टक्के हिस्सा मात्र धोकादायक असतो. हा 15 टक्के हिस्सा संसर्गजन्य, विषारी तसेच किरणोत्सर्गी असतो. या धोकादायक वैद्यकीय कचर्‍याचे व्यवस्थापन, जोखीम आणि आव्हाने यासंदर्भात गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. कारण या कचर्‍याचे भस्मीकरण करण्याचा म्हणजे तो खुल्यावर जाळण्याचा पर्याय स्वीकारल्यास कार्बन डाय ऑक्साइड आणि फ्यूरन यांसारख्या धोकादायक वायूंचे उत्सर्जन होते. ही अत्यंत धोकादायक प्रदूषके आहेत. मेडिकल वेस्टच्या याच धोकादायक परिणामांपासून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी त्यांची सुरक्षितपणे विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
धोकादायक जैवकचर्‍यात हानिकारक सूक्ष्मजीव आढळतात. ते संसर्गाचे कारण ठरू शकतात. रुग्णालयातील कर्मचारी, तेथे येणारे रुग्ण आणि आरोग्य कर्मचार्‍यांना या कचर्‍याच्या सर्वाधिक संपर्कात यावे लागते. अर्थात, कचर्‍याचा धोका अन्य सामान्य नागरिकांनाही असतोच. जर या कचर्‍याची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावता मर्क्युरी, किंवा डायऑक्साइड यांसारखी औषधी उत्पादने  खुल्यावर जाळली, तर त्याच्या संपर्कात येणार्‍या नागरिकांना केमिकल बर्न, वायू प्रदूषण, रेडिएशन बर्न अशा समस्यांना सामोरे जावे लागते. एवढेच नव्हे तर या विषारी पदार्थांच्या संपर्कात येण्यामुळे आपल्याही आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. सुया किंवा सिरींजसारख्या कचर्‍याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली नाही तर आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. एका अंदाजानुसार, सुया आणि सिरींज यांची योग्य विल्हेवाट न लावल्याबद्दल जगभरात दरवर्षी कोट्यवधी तक्रारी दाखल होतात. दुर्दैवाने इंजेक्शन दिल्यानंतर मोठ्या संख्येने इंजेक्शन सिरींज आणि सुया बराच काळ उघड्यावरच राहतात. यापैकी खूप कमी कचर्‍याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जाते. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका असतो. अजाणतेपणी या सुयांचा दुसर्‍यांदा वापर होऊ शकतो. अर्थात गेल्या काही वर्षांत हा धोका कमी झाला असला तरी सुयांची सुरक्षितरीत्या विल्हेवाट न लावल्यामुळे एचआयव्ही, हिपेटायटिस-बी आणि हिपेटायटिस-सी झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. 
वैद्यकीय प्रदूषकांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली नाही तर पिण्याच्या पाण्याचे साठे आणि भूजल दोन्हीचे प्रदूषण होते. या कचर्‍यातील रासायनिक पदार्थ मुक्त होऊन हवेत पसरतात. अपूर्ण भस्मीकरण केल्यास या घटकांपासून अत्यंत खतरनाक रासायनिक प्रदूषके वातावरणात मिसळू शकतात. डायऑक्साइड आणि फ्यूरेनसारखे  धोकादायक वायू निर्माण होऊ शकतात. हे पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात आणि प्रसंगी कर्करोगालाही निमंत्रण देऊ शकतात. दुसरीकडे, धातूंच्या ज्वलनामुळे वातावरणात विषारी धातू व्यापून राहण्याची शक्यता कायम असतेच. वैद्यकीय कचर्‍याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी कार्यस्थळीच जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. रुग्ण आणि आरोग्य कर्मचार्‍यांसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी संसर्ग नियंत्रण आणि वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाच्या (इन्फेक्शन कंट्रोल अँड क्लीनिकल वेस्ट मॅनेजमेन्ट) क्षेत्रात प्रशिक्षण घेणेही खूप महत्त्वाचा उपाय आहे. संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी स्वच्छता खूपच आवश्यक असते. हानिकारक वैद्यकीय कचर्‍याच्या शुद्धीकरणासाठी सुरक्षित मार्ग आणि तंत्रज्ञान विकसित व्हायला हवे. जेणेकरून हा कचरा जाळण्यापासून उद्भवणार्‍या धोक्यापासून आपल्याला आपला बचाव करता येईल. मायक्रोवेव्हिंग, ऑक्टोक्लेविंग असे भस्मीकरणाचे आधुनिक मार्गही वातावरणात प्रदूषके कमी प्रमाणात मिसळतील याची काळजी घेतात. वैद्यकीय कचर्‍याचे पृथःकरण करण्यासाठी जागतिक रणनीती आणि प्रणाली विकसित करणे अत्यावश्यक आहे. अशा प्रकारच्या उपायांमुळे आरोग्य कर्मचार्‍यांना असलेला वैद्यकीय कचर्‍याचा धोका कमी करता येईल. 
‘कोविड-19’ च्या महामारीमुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) मार्च 2020 मध्ये सर्वप्रथम दिशादर्शक सूचना जारी केल्या. त्यानंतर या निर्देशांचे एप्रिल आणि जून 2020 मध्ये असे दोन वेळा अद्ययावतीकरण करण्यात आले. आयसोलेशन वॉर्डसाठी, रुग्णांचे नमुने घेण्याच्या केंद्रांवर आणि प्रयोगशाळांमध्ये तसेच क्वारंटाइन सेंटर  आणि होम केअर सुविधांपर्यंत सर्वच ठिकाणी मेडिकल वेस्टबाबत अंमलात आणण्याचे नियम देण्यात आले. कोरोनाच्या प्रसारकाळात वैद्यकीय कचर्‍यात 25 टक्के वाढ झाली असल्याने हा प्रश्न गंभीरपणे चर्चिला जात आहे. आरोग्य देखभाल केंद्रे, रुग्णालये आदी ठिकाणचा वैद्यकीय कचरा खूपच वाढला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबर 2020 मध्ये कोविड-19 शी संबंधित दररोज सरासरी 162 टन वैद्यकीय कचरा निर्माण झाला. एरवी रोज सरासरी 610 टन वैद्यकीय कचरा तयार होतो. कोरोनामुळे निर्माण झालेला कचरा त्यात अधिक केल्यास दररोज सुमारे 772 टन कचरा तयार झाला. गेल्या जूनपासून नोव्हेंबरपर्यंत म्हणजे सहा महिन्यांच्या कालावधीत भारतात केवळ कोविड-19 शी संबंधित 28,468.85 टन वैद्यकीय कचरा तयार झाला.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक नियमांचे पालन करण्यात सर्वांत मोठी अडचण आहे ती वैद्यकीय कचर्‍याच्या प्रचंड प्रमाणाची. कोविड कालावधीत तर हे प्रमाण नाट्यमयरीत्या प्रचंड वाढले. रुग्णालये आणि हेल्थकेअर सेंटरमध्ये कचर्‍याचे पृथःकरण करण्याशी संबंधित माहिती आणि यंत्रणाही आहे. या संस्थांचे जिल्हाधिकार्‍यांशी वैद्यकीय कचर्‍याच्या विल्हेवाटीसंदर्भा करारही आहेत;परंतु जी अनौपचारिक क्वारंटाइन केंद्रे आहेत; त्यांच्याकडे वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग असेलच असे नाही. होम क्वारंटाइन असलेल्या ठिकाणी तर बहुतांश ‘यलो वेस्ट’ नगरपालिकांच्या घनकचर्‍यातच फेकून देण्यात आले. त्यामुळे पालिकांच्या कर्मचार्‍यांना धोका निर्माण झाला आणि संसर्ग पसरण्याची शक्यताही वाढली. याउलट काही ठिकाणी पालिकांच्या साध्या घनकचर्‍यावर चुकून ‘यलो लेबल’ लावल्याने ताण वाढल्याचेही दिसून आले. भस्मीकरणाच्या प्रक्रियेवर मुळातच प्रचंड ताण आहे, तो यामुळे वाढला. 30 जुलै 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सर्व नगरपालिका, महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांसाठी ‘कोविड-19’ बीडब्ल्यूएम अ‍ॅपचा वापर करणे बंधनकारक केले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला सर्व वैद्यकीय कचर्‍यावर नजर ठेवण्याची तसेच तो प्रक्रियेसाठी पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, यावर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले. याखेरीज न्यायालयाने सीपीसीबीला रियल टाइम ऑनलाइन कंटीन्यूअस एमिशन मॉनिटरिंग सिस्टिममधील डेटावर दैनंदिन देखरेख करण्याचेही निर्देश दिले. त्याची माहिती केंद्रीय मंडळाने राज्य मंडळांना द्यायची आहे. नगरपालिका, महापालिकांना वैद्यकीय कचर्‍याचे पृथःकरण करण्यासंबंधी जनजागृती करण्याच्या सूचना तसेच वैद्यकीय कचरा अन्य कचर्‍यात मिसळू नये अशा सूचना दिल्या; परंतु एकंदरीने ‘कोरोना’च्या कालावधीत वैद्यकीय-जैव कचर्‍याचे प्रमाण आणि समस्या वाढली असून, त्याकडे वेळेवर लक्ष न दिल्यास सर्वांनाच धोका उद्भवू शकतो.
प्रा. रंगनाथ कोकणे