सध्या ‘कोरोना’च्या महामारीची भीती आपल्या सर्वांच्या मनात मूळ धरून बसली आहे; परंतु कोणत्याही संकटातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असते ती उमेद. चिमण्या पंंखांच्या नव्हे तर उमेदीच्या साह्याने उडतात असे म्हटले जाते. म्हणूनच ज्या पक्षाची उमेद मोठी त्याची भरारी उंच असते. त्यामुळेच आपल्याला सध्याच्या काळात आपण आपल्याला भीतीकडे नेणार्‍या प्रत्येक गोष्टीपासून दूर राहिले पाहिजे. एकवेळ विषाणूपासून बचाव शक्य आहे; परंतु जी भीती आपल्या मनात खोलवर रुतून बसली आहे, त्यापासून बचाव अशक्य आहे. भीतीपेक्षा धोकादायक विषाणू या जगात कोणताही नाही. प्रत्येक समस्या कमकुवत व्यक्तीसाठी ‘भीती’ आहे तर ज्ञानी माणसासाठी ‘संधी’ आहे. समस्येचे संधीत रूपांतर व्हायचे असेल तर विचार बदलला पाहिजे. विचार बदलण्यासाठी वृत्तवाहिन्यांवरील बातम्या पाहणे-ऐकणे आणि सोशल मीडियावर महामारीच्या संदर्भातील मजकूर वाचणे बंद केले पाहिजे. असा मजकूर सोशल मीडियावर स्वतःसुद्धा टाकू नये. कोणतीही पोस्ट टाकण्यापूर्वी ती माहिती खरी आहे का, याची खातरजमा केली पाहिजे. गुगलकडे असे एक सॉफ्टवेअर आहे, त्याचा लाभ घेतला पाहिजे.
बातम्या ऐकणे किंवा पाहणे अशासाठी थांबविले पाहिजे, की केवळ आपल्या देशातच बातमीदारीचा स्तर अत्यंत उतरलेला आहे. धगधगत्या चिता, खच्चून भरलेली रुग्णालये, रुग्णांचे चिंताक्रांत नातेवाईक हे सारे वास्तव आहे; परंतु ते दाखविलेच पाहिजे असे नाही. अर्धा तासाच्या ‘स्लॉट’मध्ये त्याच त्या बातम्या पुनःपुन्हा दाखविण्यात काय हशील? अखेर या सार्‍यांना साध्य काय करायचे असते? महामारी आहे, ती नियंत्रणाबाहेर आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे. बरे झालेल्या रुग्णांच्या मुलाखती दाखविल्या तर लोकांना दिलासा मिळणार नाही का? ऑक्सिजन सिलिंडर कुठे मिळतो आहे, हे सांगावे. प्लाज्मा दात्यांचा डेटाबेस तयार करावा. कोणत्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत, हे सांगावे. रुग्णवाहिका सेवेचा तपशील द्यावा. ज्या बातम्यांमुळे उमेद वाढेल, अशा बातम्या प्रसारित कराव्यात. लोकांच्या मनात असा विश्वास जागवावा, की कितीही मोठी अंधारी रात्र असली, तरी सकाळ होतेच!
जगण्यासाठी दीर्घायुष्याबरोबरच दुर्दम्य इच्छाशक्तीही हवी. स्टीफन हॉकिंग, जॉर्ज बर्नार्ड शॉ, शरद पवार ही त्याची काही ठळक उदाहरणे आहेत. हॉकिंग एकवीस वर्षांचे असताना डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते की, एका महाभयानक आजारामुळे आता त्यांच्या आयुष्यातील दोनच वर्षे उरली आहेत. डॉक्टरांची भविष्यवाणी खोटी ठरवणार्‍या हॉकिंग यांना पन्नास वर्षांचे आयुष्य लाभले. नोबेल पुरस्कार विजेते जॉर्ड बर्नार्ड शॉ जेव्हा आजारी पडले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते की, अंडी आणि मांस खाल्ले नाही, तर ते बचावणार नाहीत; परंतु ते प्राणिप्रेमी होते. डॉक्टरांच्या सल्ल्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. शरद पवार यांना 2004 मध्ये डॉक्टरांनी सांगितले होते की, जीवनातील अखेरचे सहा महिनेच तुमच्याकडे शिल्लक आहेत. त्यांना कर्करोग झाला होता. शस्त्रक्रियाही झाली. त्यानंतर सतरा वर्षांनीसुद्धा आज ते अत्यंत कृतिशील जीवन जगत आहेत. ही इच्छाशक्ती निर्माण करण्यासाठी विचार बदलणे गरजेचे आहे. 
पुस्तके वाचणे, चित्रपट पाहणे, योगाभ्यास करून एका महिन्यात पंधरा किलो वजन घटविणे आणि चेहर्‍यावर लहान मुलांसारखी टवटवी आणणे शक्य आहे. आवडत्या व्यक्तीशी प्रदीर्घ गप्पा माराव्यात. आपले छंद जोपासावेत. भय आणि गर्दीची मानसिकता सर्वांच्याच लक्षात येत नाही. भीतीदायक कोणत्याही गोष्टीत रस घेऊ नये. सामान्यतः भीतीच्या भावनेतही लोकांना रस असतोच. भीतीमध्ये आनंद मिळत नसता तर भुताखेतांचे चित्रपट पाहायला लोक का गेले असते? भीती हेसुद्धा एकप्रकारचे आत्मसंमोहन आहे. त्यामुळे शरीरात रासायनिक बदल घडून येऊ लागतात. हा बदल कधीकधी इतका विषारी होतो की त्यामुळे प्राणही जाऊ शकतो. घबराट (पॅनिक) ही भारतीयांची खूप जुनी सवय आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर येताच आतील लोकांना उतरू न देता लोक स्वतः आधी आत घुसू लागतात. रेल्वे चुकण्याची भीती त्यांना वाटत असते. रस्त्यावरूनसुद्धा लोक जागा मिळेल तिकडे घुसतात. काही सेकंद कोंडी झाली तरी हॉर्न वाजवू लागतात. जणूकाही थोडा उशीर झाला तर बॉम्बस्फोटच होणार आहे! ‘लॉकडाऊन’ लागणार, अशी बातमी मिळताच बाजारात खरेदीसाठी अशी झुंबड उडते, जणू जीव गेला तर परत मिळेल; पण भाजीपाला परत मिळणार नाही. अशा सवयी असतील तर ‘कोरोना’ला आपण हरवू शकणार नाही. केवळ दोन टक्के लोकांनाच रुग्णालयात ठेवण्याची आणि ऑक्सिजन देण्याची गरज भासते. केवळ पाच टक्के लोकांनाच ‘रेमडिसिवीर’ देण्याची गरज असते. आपण आपल्या सवयी बदलल्या तर आपल्याकडे असणारी यंत्रणा ‘कोरोना’चा मुकाबला करण्यास पुरेशी ठरू शकते. 
इस्राएलने तेथील सामूहिक लसीकरण मोहिमेला यश मिळाल्यानंतर ‘कोरोना’ नियमां मध्ये शिथीलता आणली असून, मास्कमुक्त जीवनास परवानगी दिली आहे. शिक्षण क्षेत्र पूर्ववत सुरू केले आहे. सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी शाळेत परतले आहेत. आरोग्य अधिकार्‍यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची एक वर्षाची आवश्यकता संपुष्टात आणली आहे. तरीही बंदिस्त ठिकाणे आणि सार्वजनिक सभांमध्ये मास्क अजूनही अनिवार्य आहे. इस्राएलमधील लसीकरण मोहीम जगात अव्वल ठरली असून, ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी संपूर्ण लोकसंख्येला या देशाने सज्ज केले आहे. ‘कोरोना’ संसर्गकाळातील बहुतांश निर्बंध उठविण्यात आले आहेत. परदेशी पर्यटकांचे लसीकरण करून त्यांना देशात येण्याची अनुमती मे महिन्यापासून दिली जाईल, असेही जाहीर केले आहे. मास्कची अनिवार्यता रद्द करणे आणि शिक्षण क्षेत्र खुले करणे हे जोखमीचे निर्णय होते; मात्र तिथे सर्वजण आता विनामास्क आनंदाचे जीवन जगू लागले आहेत, हे मात्र निश्चित. 
‘कोरोना’विरुद्ध लढण्यासाठी शरीरात अँटीबॉडीज् तयार झाल्यास या आजारावर विजय मिळविता येतो असे सांगितले जाते; परंतु अँटीबॉडीज् केवळ औषधाच्या दुकानात मिळत नाहीत, तर अन्यत्रही मिळतात. मोबाइल स्क्रीनवर एखाद्याचे नाव पाहून आपल्याला आनंद होतो, तेव्हा अँटीबॉडीज् तयार होतात. संकटकाळी कुणी खांद्यावर हात ठेवला, तरी अँटीबॉडीज् तयार होतात. आपल्या दोस्तीच्या अँटीबॉडीज्मुळे एखाद्याला संजीवनी मिळू शकते. त्यामुळे एक नवीन काम आपण केले पाहिजे. ते म्हणजे स्वतःची आणि इतरांची भीती घालवली पाहिजे. नियम पाळून, एकमेकांच्या संपर्कात राहून एकमेकांना आधार दिला पाहिजे.
योगेश मिश्र, ज्येष्ठ संपादक, विश्लेषक