देशात सध्या ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावर मोठी चर्चा सुरू आहे. वल्लभगड येथील निकिता हत्याकांडानंतर उत्तर प्रदेश, हरियाना आणि मध्य प्रदेश यांसारख्या काही राज्यांनी तर याविरोधात कायदा करण्याची तयारी केली आहे. याच घटनाक्रमांमध्ये काही दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एकल पीठाने दिलेला एक निर्णय लक्ष वेधून घेणारा आहे. या निर्णयात धर्मपरिवर्तन करून लग्न करणार्‍या जोडप्याची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. या प्रकरणात एका हिंदू मुलाशी विवाह करण्यासाठी जन्माने मुस्लिम असलेल्या तरुणीने हिंदू धर्माचा स्वीकार केला होता.

न्यायालयाने आपल्या निकालात 2014 च्या नूरजहाँ प्रेम प्रकरणाचा उल्लेख करून म्हटले आहे की, केवळ विवाह करण्याच्या उद्देशाने केले गेलेले धर्मांतर स्वीकारार्ह नाही. वस्तुतः नूरजहाँ यांच्या प्रकरणासोबत आलेल्या वेगवेगळ्या पाच जोडप्यांच्या याचिका फेटाळून न्यायालयाने ही टिप्पणी केली होती. या सर्व जोडप्यांनी संरक्षणाची मागणी केली होती. प्रत्येक प्रकरणात मुले मुस्लिम होती तर मुली हिंदू होत्या. या मुलींनी लग्न करण्यासाठी इस्लामचा स्वीकार केला होता. केवळ विवाह करण्यासाठी धर्म बदलणे अस्वीकारार्ह आहे, असे न्यायालयाने म्हटले होतेत्यावेळी न्यायालयाने एका गोष्टीबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. ती म्हणजे, ज्या धर्माची अजिबात माहिती नाही, त्याचा स्वीकार अखेर का केला जातो? न्यायालयाने असेही स्पष्ट केले होते की, कोणतीही सज्ञान व्यक्ती श्रद्धेच्या आधारावर धर्म परिवर्तन करू शकते.

मात्र, तिचा अल्लाह आणि कुराणवर विश्वास असला पाहिजे आणि तिचे हृदयपरिवर्तन झालेले असले पाहिजे. श्रद्धा आणि विश्वास या बाबतीत परिवर्तन झालेले असल्याखेरीज धर्म परिवर्तन मान्य करता येणार नाही. त्यामुळेच केवळ विवाहासाठी केलेले धर्म परिवर्तन ‘शून्य’ मानले जाईल, असे न्यायालयाने म्हटले होते.अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, धर्म परिवर्तनाचा अर्थ असा की, धर्माची प्रत्येक व्यवस्था आणि सिद्धांत स्वीकारले जाणे. या निकालामुळे देशात एका सामाजिक मंथनाला सुरुवात झाली आहे. या चर्चेचे दोन महत्त्वाचे भाग आहेत.

पहिला असा की, एखाद्या धर्माबद्दल श्रद्धा असल्याखेरीज तो स्वीकारणे योग्य आहे का? धर्माचा असा स्वीकार सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या उचित ठरतो का? दुसरा मुद्दा असा की, जिथे दोन वेगवेगळे धर्म मानणारे प्रेमिक सर्व सामाजिक संकेतांना तिलांजली देण्यास तयार होतात, तिथे धर्म परिवर्तनाचा प्रश्नच कसा निर्माण होतो? अशा धर्मांतराचे औचित्य काय? तसे पाहायला गेल्यास सनातन संस्कृतीत धर्माचा मूळ अर्थ आपल्या जबाबदार्‍यांचे पालन करणे हा आहे; परंतु या ठिकाणी आपण धर्माच्या अशा अर्थाची चर्चा करीत आहोत, ज्याला सामाजिक आणि संवैधानिक अशा दोन्ही स्तरांवर स्वीकृती आहे. कोणत्या तरी अलौकिक शक्तीवर श्रद्धा असणे असे धर्माच्या या अर्थानुसार मानले जाते. ही अलौकिक शक्ती तर्काच्या पलीकडची आहे; मात्र विश्वासाच्या आधारभूमीवर संपूर्ण विश्वात दृढतेने उभी आहे. या शक्तीवर माणूस इतक्या टोकाला जाऊन विश्वास ठेवतो, की आपल्या जीवनात घडणार्‍या घटनांचा कर्ता-धर्ता हीच शक्ती आहे, असे तो मानतो. हाच विश्वास त्याला जीवनातील सर्व संघर्षांमध्ये खंबीरपणे उभे राहण्याचे साहस देतो.

धर्म हा समाजरचनेचा महत्त्वाचा घटक आहेच; शिवाय व्यक्तीच्या मानसिकतेवरही तो बर्‍याच अंशी प्रभाव पाडतो. स्वतःच्या बाहेर एखाद्या अप्रकट शक्तीवर विश्वास ठेवण्याने व्यक्तीला मानसिक बळ मिळते. जो नास्तिक असतो किंवा जो कोणताही धर्म मानत नाही, तो कमजोर असतो असा याचा अर्थ बिलकूल नाही. प्रत्येक धर्माच्या स्वतंत्र मान्यता असतात, विश्वास आणि श्रद्धा प्रकट करण्याचे वेगवेगळे मार्ग असतात. हे सर्व घटक व्यक्तीच्या मनात लहानपणापासूनच हळूहळू पेरले जात असतात. अंतिमतः ते इतके दृढ होतात की, या घटकांपासून स्वतःला अलग करणे शक्यच राहत नाही. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचे धार्मिक विचार आणि भावना यात अचानक एवढे परिवर्तन कसे काय होते, हा प्रश्न उभा राहणे स्वाभाविक आहे. त्याहून महत्त्वाचा प्रश्न असा की, एखाद्याच्या भावना स्वार्थामुळे बदलत असतील, तर ते कसे स्वीकारायचे?

अलाहाबाद उच्च न्यायालयाने या मुद्द्यावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी 2000 पानांच्या एका आदेशाचा उल्लेख केला आहे. या आदेशात म्हटले होते की, गैरमुस्लिम व्यक्तीचे धर्मांतर इस्लाममध्ये विश्वास असल्याखेरीज केवळ लग्नाच्या उद्देशाने करणे निरर्थक आहे. एखाद्या मुलीची इस्लामवर श्रद्धा नसेल, तर ती उत्पन्न होईपर्यंत तिच्याशी लग्न करू नये तसेच आपल्या मुलींचे विवाह श्रद्धा असल्याखेरीज इतर धर्मीयांशी करू नयेत, असे कुरानमध्ये म्हटले आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, केवळ लग्नासाठी मुस्लिम किंवा अन्य कोणताही धर्म स्वीकारणे उचित ठरेल का? सर्वांत महत्त्वाचा प्रश्न यापुढेच उपस्थित होतो. तो असा की, जर लग्नासाठी धर्म बदलला असेल, तर त्या लग्नाला ‘आंतरधर्मीय’ कसे म्हणता येईल? 2017 मध्ये उत्तराखंड उच्च न्यायालयाने विवाहाच्या उद्देशाने धर्म परिवर्तन करण्याची प्रथा बंद करण्याचा सल्ला राज्य सरकारला दिला होता.

विचार करण्याजोगा अन्य एक मुद्दा असा की, विविध धर्मांचे अनुसरण करणारे दोन प्रेमिक जेव्हा विवाहाचा निर्णय घेतात, तेव्हा या निर्णयाच्या केंद्रस्थानी केवळ प्रेम असते. मग वेगवेगळ्या धर्मांचे अनुसरण दोघांनी करीत राहिले, तर प्रेम संपुष्टात येणार आहे का? विश्वास, त्याग आणि समर्पण या गोष्टी प्रेमासाठी आधारभूत असतात. केवळ विवाहबंधनात बांधले जाण्यासाठी आपल्या श्रद्धेचा त्याग करणे आत्मद्रोह केल्यासारखेच आहे. भावनात्मक दबाव निर्माण करून जोपर्यंत प्रेमाचे वास्तविक स्वरूप बदलण्यास विवश केले जात नाही, तोपर्यंतच प्रेम टिकते. अशा प्रकारे दबाव आणलाच तर प्रेमाचा परीघच संकोचतो आणि ते व्यक्तीचे अस्तित्वच संपुष्टात आणल्यासारखे आहे. स्वतःचेच अस्तित्व दाबून टाकणारे नाते कधीच चिरकाल टिकत नाही.

भारतासारख्या लोकशाहीवादी देशात ना प्रेम वर्ज्य आहे आणि ना प्रेमविवाह. त्यामुळेच देशात विशेष विवाह अधिनियम 1954 हा कायदा वेगवेगळ्या धर्मांचे अनुसरण करणार्‍या दोन व्यक्तींना आपापल्या धार्मिक श्रद्धा कायम ठेवून विवाहाची अनुमती देतो. मग असे असताना केवळ विवाहासाठी धर्मांतर करण्याची आवश्यकताच काय उरते?

‘लव्ह जिहाद’चा मुद्दा सध्या चर्चेत आहे. केवळ लग्नासाठी धर्मांतर हा चर्चेचा मुख्य मुद्दा आहे. वास्तविक, एखाद्या धर्मावर श्रद्धा नसताना केवळ लग्नाच्या हेतूने केलेले धर्मांतर निरर्थकच ठरते. शिवाय आपल्या देशात प्रेम आणि प्रेमविवाह यांना बंदी नाही. विशेष विवाह अधिनियम 1954 नुसार विभिन्न धर्म मानणार्‍या दोन व्यक्ती धर्म कायम ठेवून लग्न करू शकतात. मग केवळ लग्नासाठी धर्मांतराची आवश्यकताच काय उरते? शिवाय धर्मांतर करून लग्न केल्यास त्याला आंतरधर्मीय विवाह म्हणता येईल का?
- डॉ. ऋतू सारस्वत, समाजशास्र अभ्यासक