माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 1991 साली हत्या झाल्यानंतर गेल्या 30 वर्षात गांधी परिवारातील एकही व्यक्ती पंतप्रधान झालेली नाही. सोनिया गांधींना पंतप्रधान होण्याची संधी होती पण त्यांनी ही जबाबदारी घेतली नाही. आता काँग्रेसवासिय राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याकडे त्या अपेक्षेने पहात आहेत. येणार्‍या काळात याबाबत काय घडते हे पहावे लागेल. सोनिया गांधींच्या जाऊ मनेका गांधी या 16 वर्षांपूर्वी भाजपामध्ये सामील झाल्या; पण भाजपामध्ये राहून गांधी परिवारातील कुठलाही सदस्य पंतप्रधान होणार नाही ही काळ्या दगडावरची  रेघ आहे. उत्तर प्रदेशमधील रायबरेली, अमेठी, पिलिभित, सुलतानपूर हे गांधी परिवाराचे मतदारसंघ म्हणून ओळखले जातात. यातील अमेठी मतदारसंघ गांधी परिवाराच्या हातुननिसटला आहे आणि आता पिलिभित मतदारसंघ वाचवण्यासाठी वरूण गांधी यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध सुरू असलेले शेतकरी आंदोलन आणि उत्तर प्रदेशमधील लखिमपूर खेरी येथे झालेल्या दुर्घटनेचा  राजकीय लाभ उठवण्यासाठी भाजपाच्या विरोधकांनी कंबर कसली आहे. त्याचबरोबर वरूण गांधी यांनी वेगळ्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. 
लखिमपूर हिंसाचारात आठ लोक मृत्युमुखी पडले होते आणि केंद्रीय मंत्र्याच्या मुलाचा वाहनताफाशेतकर्‍यांवर घालण्यात आला असा आरोप आहे. लखिमपूरदुर्घटनेसंदर्भात आपल्याच पक्षावर टीका करणारे वरूण हे भाजपाचे एकमेव नेते आहेत. विशेष म्हणजे त्यांनी तीन कृषी कायदनाही सतत विरोध केलेला आहे. उत्तर प्रदेश मधील विधानसभा निवडणुकांना चार महिन्याचा कालावधी उरला आहे त्यामुळे वरुण गांधी यांची गय केली जाणार नाही हे स्पष्ट होते. त्यानुसार खासदार वरूण आणि सुलतानपूरच्या खासदार मनेका यांना भाजपने आपल्या 80 सदस्यांच्या राष्ट्रीय कार्यकारणीमधून तात्काळ डच्यू दिला. एक काळ असा होता की, उत्तरप्रदेशमध्ये सोनिया गांधीना प्रत्युत्तर म्हणून मनेका गांधीना भाजपामध्ये समाविष्ट केल्यानंतर त्यांचे महत्त्व खूप वाढले होते.
गांधी घराण्याच्या वलयामुळे मनेका गांधी प्रारंभी पिलिभितच्या अपक्ष खासदार होत्या. त्यानंतर त्यांनी तेथून भाजपातर्फे तीन वेळा खासदारपद भूषविले. आता त्या सुलतानपूरच्या खासदार आहेत. काँग्रेसने दुर्लक्ष केलेल्या मनेका गांधी यांनी भाजपामध्ये प्रवेश करून आपले सुपुत्र वरूण यांचा राजकीय पाया मात्र व्यवस्थित घातला. म्हणजेच त्यांनी वरूण यांची राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी भाजपाचा उपयोग करून घेतला.
मनेका गांधी 1998 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झाल्या आणि त्यानंतर सहा वर्षांनी त्यांनी आपल्या सुपुत्रा सह भाजपामध्ये औपचारिक प्रवेश केला. तत्पूर्वी 1999 मध्ये निवडणूक प्रचाराच्या दरम्यान मनेकांनी पिलिभितला सर्वप्रथम वरूण यांची ओळख करून दिली. 2009 मध्ये वरुण गांधी हे भाजपातर्फे खासदार म्हणून निवडून आले. या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान वरूण यांनी धर्मांध वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर फिर्याद दाखल करण्यात आली होती, पण त्यामुळे ते फायरब्रँड हिंदू नेते म्हणून प्रसिद्धीला आले.  आता आपली ही प्रतिमा बदलून शेतकर्‍यांना सोयीस्कर अशी आपली प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नाला ते लागले आहेत.
2013 मध्ये तत्कालीन भाजपा अध्यक्ष राजनाथसिंग यांनी वरूण यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्त केले. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधील भाजपाच्या व्यवहाराची सूत्रे त्यांच्याकडे सोपवण्यात आली. तेव्हा पासून ते राजनाथसिंग यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यावेळी ते अवघे 33 वर्षाचे होते. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी वरूण यांनी राजनाथ सिंह यांची अटल बिहारी वाजपेयींशी तुलना केली. एवढेच नव्हे तर राजनाथसिंग यांना देशाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार करावे असा सल्लाही त्यांनी दिला होता, पण पक्षांतर्गत बहुमत हे नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार असावेत असे होते. राजनाथ सिंह यांना वरूण यांनी जो पाठिंबा दिला, त्याचे परिणाम त्यांना नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर भोगावे लागले.
2014 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर जेव्हा अमित शहा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम पक्ष सरचिटणीस पदावरून वरूण यांची गच्छंती केली. त्याचप्रमाणे त्यांच्याकडील पश्चिम बंगालचा भाजपाविषयक व्यवहाराची जबाबदारी काढून घेतली. त्यानंतर दोनच वर्षांनी अलाहाबादमध्ये झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीच्या दरम्यान वरुण  यांच्या समर्थकांनी ‘सीएम 
फेस’ अशा आशयाचे फलक नाचवले होते; पण 2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पहिल्या दोन टप्प्यात वरूण यांचा प्रचारक म्हणून सुद्धा विचार केला गेला नाही.
इतकेच नव्हे तर पहिल्या टर्ममध्ये मनेका गांधी महिला व बालविकास खात्याच्या कॅबिनेट मंत्री होत्या, पण 2019 मध्ये मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर  त्यांचीही गच्छंती झाली होती. तेव्हापासून या माय लेकरांना आता भाजपामध्ये कुणी फारसे विचारत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी मधून हकालपट्टी झाल्यानंतर मीडियाशी बोलताना वरूण गांधी म्हणाले, गेल्या पाच वर्षात राष्ट्रीय कार्यकारिणीच्या एकाही बैठकीला मी उपस्थित राहिलो नाही त्यामुळे या कारवाईचा मला काही फरक पडत नाही. तर मनेका म्हणाल्या, या निर्णयामुळे माझ्या प्रतिमेला धक्का बसण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने या कारवाई विषयी मीडियाशी बोलताना सांगितले की, आमच्या नेत्यांमधील बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, असे वरूणवरील कारवाईद्वारे आम्ही स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सत्तेवर आल्यापासून सतत वादामध्ये सापडलेले आहेत. यांच्या पोलीस दलाने गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी आत्तापर्यंत 3000 एन्काऊंटर केल्याचे सांगितले जात आहे; पण त्यातील खरे किती असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण अलीकडेच दिल्लीहून गोरखपूर येथे आलेल्या आणि एका  हॉटेलमध्ये उतरलेल्या बिल्डरचा उत्तरप्रदेश पोलिसांनी केवळ संशयावरून विनाकारण हत्या केली. त्यातच आता लखिमपूर खेरी येथील हिंसाचारामुळे उत्तर प्रदेश मधील योगी सरकारच्या कार्यक्षमतेबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. या सर्व घडामोडींचा आगामी विधानसभा निवडणुकीत योगी सरकारला फटका बसू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. लखीमपूर खेरी हिंसाचारास संदर्भात वरूण यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहिले होते.त्यावेळी योगी आदित्यनाथ लखीमपूर येथील परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी मग्न होते; पण वरूण यांचे पत्र मिळताच तीनच दिवसात वरूण यांची राष्ट्रीय कार्यकारणी मधून हकालपट्टी झाली. राज्य विधानसभा निवडणूक जवळ येत चालली असतानाच वरुण गांधी जाहीर मंचावरून आपल्याच पक्षाच्या सरकारवर सतत ताशेरे ओढत आहेत. त्याचप्रमाणे भाजपाच्या संघटनात्मक कार्यक्रमांपासून आणि राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठका पासून त्यानी स्वतःला दूर ठेवले आहे.
पक्षामध्ये आपल्याला मिळत असलेली दुय्यम वागणूक त्यांना सलत आहे हे झाले एक कारण आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या मतदार संघाच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी आपल्याच पक्षावर टीका करण्यास सुरुवात केलेली आहे, अशी चर्चा आहे. वरुण गांधी यांच्या पीलीभीत मतदार संघाच्या जवळच लखिमपूर-खेरी आहे आणि एकूणच या भागात शेतकरी बहुसंख्य आहेत, त्यामुळे वरूण यांना असा पवित्रा घेणे भाग पडले आहे. या सार्‍या घडामोडींमुळे मनेका आणि त्यांचे सुपुत्र वरूण हे भविष्यामध्ये भाजपामध्येच राहणार की वेगळा मार्ग पत्करणार हे चित्र स्पष्ट होणार आहे.
प्रसाद वि. प्रभू, ज्येष्ठ पत्रकार, बेळगांव