ऑलिंपिक स्पर्धेत केवळ प्रवेश मिळणे हीच कोणत्याही खेळाडूसाठी अत्यंत अभिमानाची बाब असते. एखादे पदक मिळविणे हे तर जग जिंकण्यासारखेच असते. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपद पटकावून जग जिंकल्याचाच आनंद देशवासियांना दिला. नीरज वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा एकमेव दुसरा भारतीय ठरला. 
भालाफेकीच्या अंतिम फेरीत नीरजने सुवर्णपदकासह भारताच्या अ‍ॅथलेटिक्स पदकाची 121 वर्षांची प्रतीक्षा देखील संपुष्टात आणली. हेही खरेच की, यंदाची टोकियो ऑलिम्पक स्पर्धा भारतासाठी भाग्याचीच ठरली. या ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांसह एकूण सात पदके जिंकत भारताने यंदा इतिहासच रचला. टोकियो ऑलिम्पिकच्या दुसर्‍याच दिवशी भारताला पहिले पदक मिळाले. वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजनी गटात मीराबाई चानूने देशाला पहिले पदक मिळवून दिले. मीराबाईने एकूण 202 किलो वजन उचलले. या प्रकारात चीनच्या होउ झिहुईने सुवर्णपदक, तर इंडोनेशियाच्या विंडी असाहने कांस्य पदक जिंकले. त्यानंतर पी.व्ही. सिंधूने कांस्य पदकाच्या लढतीत चीनच्या बिंग जिआओ हिचा पराभव करत देशाला दुसरे पदक जिंकून दिले.  याआधी तिने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते, अशी कामगिरी करणारी ती पहिली बॅडमिंटनपटू ठरली. देशाला तिसरे पदक मिळवून देण्याचा मान युवा बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनने मिळवला. उपांत्य फेरीत तिला तुर्कीच्या वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू बुसानाजने पराभूत केल्याने तिचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले. त्यामुळे तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या पुरुष हॉकी संघानेही यावेळी विजयाचा रंग उधळला. जर्मनीचा पराभव करून 41 वर्षानंतर पदक पटकावले. भारताचे हे ऑलिम्पिकमधील हॉकीचे 12 वे पदक ठरले. याआधी भारतीय पुरुष हॉकी संघाने 1928 ते 1980 च्या ऑलिम्पिकपर्यंत आठ सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदके जिंकल्याचा इतिहास आहे. पदकांच्या इतिहासात यंदा कुस्तीपटू रवीकुमार दहियाने रौप्यपदक जिंकून नाव नोंदवले. टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे रौप्यपदक ठरले. फ्रीस्टाइल 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या झावूर युगूएवने रवीकुमारचा पराभव केला. तर, कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो गटात देशाला कांस्य पदक जिंकून दिले. कांस्य पदकाच्या लढतीत 
बजरंगसमोर कझाकिस्तानच्या दौलत नियाजबेकोव्हचे आव्हान होते. बजरंगने दौलतवर 8-2 असा विजय मिळवत कुस्तीत यंदाचे दुसरे पदक जिंकले. आतापर्यंत भारताने कुस्तीत सात पदके जिंकली आहेत. खाशाबा जाधव यांनी 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये, कांस्य पदक जिंकत कुस्तीचे पहिले पदक जिंकले होते. त्यानंतर सुशीलकुमार (2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक आणि 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक), योगेश्वर दत्त 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक), साक्षी मलिक (2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक), रवीकुमार दहिया (2020 टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक) यांनी पदके जिंकली आहेत. जिंकणे म्हणजे काय असते, हे यावेळी नीरज चोप्राने जगाला दाखवून दिले. 
भालाफेकपटू नीरज चोप्राने 87.58 मीटर भाला 
फेकत सुवर्णपदक पटकावले. यासह भारताला 13 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळाले.  यापूर्वी नेमबाजपटू अभिनव बिंद्राने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकण्याची भारतीयांची इच्छा नीरजने पूर्ण केली. यासह अ‍ॅथलिटिक्समध्ये पहिलेवहिले पदकही त्याने मिळवून दिले. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात वैयक्तिक दुसरे सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला. नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकल्यानंतर तो कोण, कुठला, असा प्रश्‍न 
एकमेकांना विचारला गेला. तेव्हा तो ‘रोड मराठा’ 
समुदायापैकी असल्याचा दावा काहींनी केला. त्याच्या एका जुन्या मुलाखतीचा संदर्भही त्यासाठी दिला. इतिहासकार सांगतात की, 257 वर्षांपूर्वी  सध्याच्या हरियाणातल्या पानिपत येथे सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य अफगाणिस्तानचा राजा अहमद शाह अब्दालीच्या सैन्याशी लढले. मात्र, 14 जानेवारी 1761 ला झालेल्या या युद्धात मराठा सैन्य पराभूत झाले. त्यानंतर जगलेले मराठे महाराष्ट्रात परतले. मात्र, त्यातील जवळपास 250 कुटुंबं कुरुक्षेत्र आणि करनालच्या जंगलात मागे राहिली. आजही हरियाणात या समाजाची संख्या सहा ते आठ लाख असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. 
भालाफेकीत सुवर्णपदक पटकावण्याची किमया करणारा नीरज चोप्राही याच समाजाचा असल्याची चर्चा सुरु झाल्याने महाराष्ट्राला त्याचा विशेष 
अभिमान वाटतो. महाराष्ट्रालाच नव्हेतर अवघ्या देशाला अभिमान वाटावे असेच नीरजने शौर्य गाजवले आहे. त्याच्या खालोखाल बाकी खेळाडूंनीही देशाची मान उंचावली आहे. जगभरातील सुमारे 205 देशांतील जवळपास अकरा हजार खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते. त्यापैकी 85 देशांनी किमान एका पदकाची कमाई केली. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिका 36 सुवर्ण आणि एकूण 108 पदकांसह अव्वलस्थानी, तर चीन 38 सुवर्ण आणि 87 पदकांसह दुसर्‍या स्थानी राहिला आहे.