राजकारणातील सुसंस्कृतपणा कधीचाच नाहीसा झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राडा वाढतच चाललेला आहे. सत्ताधार्‍यांच्या कुठल्याही एका गोष्टीवर सहमती दाखवायची नाही, ही विरोधकांची जणू रितच बनली आहे. हा अनुभव असतानाच आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकर यांचे नाव पुढे आले आणि मग विरोधक आणि सत्ताधार्‍यांमध्ये पुन्हा जुंपल्याचे पाहायला मिळाले. विशेषत: भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन रुपाली चाकणकर यांच्यावर शाब्दिक घणाघात केल्याने वादाचे वादळ उठले. ‘महिला आयोगाचा अध्यक्ष लवकर नेमावा, पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल, तर किमान रावणाला मदत करणारी ’शुर्पणखा’ बसवू नका!’ असा सरकारला सल्ला देत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर शाब्दिक हल्ला केला म्हणे. या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. असो; पण एक खरे की, भाजप नेते मागील काही काळात बेताल बोलत आहेत. त्यात महिला नेत्यांही पुढे सरसावल्या असतील तर ते नवलाईचे ठरत नाही. शेवटी राजकारणात जो अधिकचा बोलतो, विरोधकांवर अधिकाधिक तोंडसुख घेतो, तोच पक्ष पातळीवरही श्रेष्ठ ठरवला जातो. त्यामुळेच की काय, विविध पक्षांच्या नेत्यांची बालीश बडबड वाढली आहे. असो; पण भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही हाच कित्ता गिरवावा, हे सुसंस्कृत म्हणवल्या जाणार्‍यांना शोभणारे नाही. रुपाली चाकणकर यांच्याविषयी म्हणाल तर, त्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. दौंडमधील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रुपाली चाकणकर यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा राहिला आहे. लग्नानंतर त्या चाकणकर कुटुंबाच्या सदस्य झाल्या आणि चाकणकर कुटुंबाला राजकीय पर्श्वभूमी असल्याने राजकारणात उतरत त्यांनी यशही मिळवले. रुपाली चाकणकर आपल्या आक्रमक भाषणशैलीने ओळखल्या जातात. त्यांनी राज्यभरात राष्ट्रवादी महिला संघटन मंजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या त्याच कामाची पावती म्हणून पक्षाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव पुढे केले असावे. 
महामंडळ वाटपात राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद मिळावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह होताच. राष्ट्रवादी काँग्रेसने या पदासाठी रुपाली चाकणकर, विद्या चव्हाण आणि चंद्रा अय्यगार या तीन नावांचा विचार केला आणि त्यातून आक्रमक नेत्या अशी ओळख असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येते. रुपाली चाकणकर यांच्या नियुक्तीबीबत महाविकास आघाडीतही एकमत असल्याचे बोलले जाते. असो; पण हे पद मागील दोन वर्षापासून रिक्त राहिल्याने  राज्य सरकारची अनास्था आणि उदासीनताच त्यातून दिसून आली. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचा सध्या जणूकाही पूरच आला आहे आणि अशा स्थितीत महिला आयोगाला अध्यक्षच नाही!  तत्कालीन अध्यक्ष विजया रहाटकर यांनी 4 फेब्रुवारी 2020 रोजी पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंधरा दिवस किंवा जास्तीत जास्त एका महिन्याच्या आत नव्या अध्यक्षांची नियुक्ती होणे आवश्यक होते; परंतु अशा महत्त्वाच्या विषयात सरकार जराही गंभीर असल्याचे दिसले नाही. महिला आयोगाचे अध्यक्षपद हे काही किरकोळ पद नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा प्राप्त असून, त्यांच्याकडे अर्धन्यायिक शक्तीही असते. महिलांच्या सर्वाधिक तक्रारी घरगुती हिंसाचाराबद्दल असतात. याव्यतिरिक्त अत्याचार, पतीकडून फसवणूक, हुंड्यासाठी छळ, कामाच्या ठिकाणी गैरवर्तन, तसेच पगारातील असमानता, लैंगिक भेदभाव, लैंगिक शोषण अशा अनेक समस्या आहेत. महिला आपल्या तक्रारी घेऊन आयोगाकडे थेट जाऊ शकतात आणि त्यांना न्याय मिळण्याचा मार्ग सुकर होतो, हीच महिला आयोगाची प्रमुख उपयुक्तता आहे. महिला आयोगाकडून जेव्हा एखादी तक्रार प्रकाशात आणली जाते आणि त्यावरील कार्यवाही गतिमान केली जाते तेव्हा सरकारी यंत्रणेलाही सतर्क आणि सक्रिय व्हावेच लागते. दुर्दैव असे की, मागील काही काळात महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. याबाबत सातत्याने कठोर कायद्यांची मागणी समाजातून होत आली आहे. ‘निर्भया’ प्रकरणानंतर केंद्रीय स्तरावरुन कायद्यांमध्ये काही बदल करण्यात आले. त्यामध्ये कठोरता आणण्यात आली; परंतु तरीही समाजातील विकृत नराधमांकडून, विकृत पुरुषी मानसिकतेतून स्रियांवरील अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण पुरेसे कमी झालेले दिसले नाही. याचे कारण ज्याप्रमाणात या गुन्ह्यांची संख्या आहे, त्याप्रमाणात दोषींना होणार्‍या शिक्षेचे प्रमाण पाहिल्यास ते अत्यल्प असल्याचे दिसून येते. परिणामी, अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍यांवर कसलाच वचक राहात नाही. या एकूण पार्श्‍वभूमीवर राज्य महिला आयोगावर लवकरात लवकर महिला अध्यक्षांची नियुक्ती करावी, अशी मागणी रेटली जात होती. आता उशिराने का होईना, पण याबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घेत रुपाली चाकणकर यांचे नाव पुढे केले आहे. तेव्हा त्यांना शुभेच्छा देतानाच त्यांच्याकडून अपेक्षाही बाळगल्या जात आहेत. अपेक्षा हीच की, त्यांनी दुर्गेचे रुप घेत दुर्जनावर धाक बसवावा आणि महिलांवर होणार्‍या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडावी; महिलांना कुटुंबात आणि समाजात सन्मानाने जगता यावे, अशी परिस्थिती निर्माण करावी.