पंजाबच्या राजकारणात कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अमरिंदर सिंग यांनी नव्या पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. हे अपेक्षितच होते. हेही खरेच की, काँग्रेसला फुटीचा शाप जन्मजातच आहे. 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाल्यापासून पहिल्या महायुद्धापूर्वीच्या प्रांतीय निवडणुका होईपर्यंत काँग्रेस एक चळवळ होती. 1929 मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर काँग्रेसमध्ये संपूर्ण स्वराज्याचा पहिला ठराव संमत झाला आणि काँग्रेसने खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य लढा सुरु केला. या लढ्यात विजय मिळाल्यानंतर अर्थात स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे विसर्जन करण्याची महात्मा गांधी यांची सूचना मानली गेली नाही. स्वातंत्र्य आंदोलनातील लोकप्रियतेचा फायदा घेत काँग्रेस देशातील सर्वात मोठा, प्रमुख पक्ष झाला. मात्र, आणीबाणीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विरोधक केंद्रात सत्तारुढ झाले आणि काँग्रेस लोकसभेत पहिल्यांदा विरोधी पक्ष बनला. दरम्यान काँग्रेस फुटली आणि इंदिरा गांधी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेस पक्ष खरा ठरला. इंदिरा गांधी यांच्या काळात विशेषतः 1980 नंतर ताकदीच्या नेत्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचे राजकारण सुरु झाले. राज्या-राज्यांतील नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याच्या डावपेचामुळे प्रादेशिक नेत्यांनी प्रादेशिक पातळीवर पक्ष काढले. नवल म्हणजे,  माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ‘राष्ट्रीय काँग्रेस’ या नावाने स्वतंत्र पक्ष काढला; परंतु या पक्षाची डाळ काही शिजली नाही. यथावकाश ते पुन्हा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये परत आले. ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे यांनीसुद्धा काँग्रेसच्या बाहेर पडून ‘मध्यप्रदेश विकास काँग्रेस’ हा पक्ष काढला होता. यशावकाश त्यांनी तो पक्ष काँग्रेसमध्ये विलीनही केला. दरम्यान नरसिंह राव यांच्यावर नाराज होऊन अनेकांनी आपली वेगळी चूल मांडली होती. अर्जुन सिंग हे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रीही होते आणि केंद्रीय मंत्रीमंडळातही दीर्घकाळ मंत्री होते. सोनिया गांधी यांना नरसिंह राव पुढे येऊ देणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर नारायण दत्त तिवारी आणि अर्जूनसिंग या दोन सोनिया समर्थकांनी काँग्रेसमधून बाहेर पडून एक स्वतंत्र वेगळ्या काँग्रेस पक्षाची स्थापना केली, त्याला ‘सोनिया काँग्रेस’ असे म्हटले जायचे. नरसिंह राव यांच्या हातून सत्ता गेल्यानंतर हे दोघे थंडोबा होत पुन्हा मूळ काँग्रेसमध्ये विलीन झाले. महाराष्ट्रात शंकरराव चव्हाण यांनीही ‘महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस’ हा पक्ष स्थापन केला होता. या पक्षात बाळासाहेब विखे पाटील आणि रायभान जाधव हे नेते होते. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना शरद पवार त्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते; पण पुढे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘पुलोद’ सरकार स्थापन झाले. ‘पुलोद’ सरकार अस्तित्वात होते तोपर्यंत शंकरराव चव्हाण यांचा ‘महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस’ कायम होता. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलिन केला आणि केंद्रात ते शिक्षणमंत्री झाले. सुरेश कलमाडी या पुण्याच्या नेत्यानेही एक पक्ष काढला होता, तोही नंतर काँग्रेसमध्ये विलिन केला. बॅरिस्टर अ. र. अंतुले  यांनी 1987-88 यांनीही स्वतःचा काँग्रेस पक्ष काढला आणि तो कालांतराने विलीनही केला. असे अनेक काँग्रेस पक्ष  निघाले आणि पुन्हा विलिनही झाले. मात्र, काही जणांचे बंड यशस्वी झाले. त्यांचे पक्ष काँग्रेसमध्ये विलिन झालेले नाहीत. यामध्ये ममता बॅनर्जी यांचे उदाहरण प्रामुख्याने घेता येईल. ममता बॅनर्जी यांच्या आधी अजय घोष या काँग्रेसच्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी बंडाचा झेंडा उभारत एक काँग्रेस स्थापन केला होता; पण ते बंड यशस्वी झाले नाही. ममता बॅनर्जी  1997 साली काँग्रेसमधून बाहेर पडल्या आणि त्यांनी ‘तृणमूल काँग्रेस’ हा पक्ष स्थापन केला. आजतागायत तरी ममता बॅनर्जी काही थंडोबा झालेल्या नाहीत. उलट त्यांच्या तृणमूल काँग्रेसने तिथला काँग्रेस पक्ष जवळजवळ संपवलेला आहे. दुसरे यशस्वी झालेले बंड म्हणजे जगनमोहन रेड्डी यांचे. वडिलांच्या जागी आपल्याला मुख्यमंत्री करावे, अशी इच्छा बाळगून असलेल्या जगमोहन यांना सोनिया गांधी यांनी डावलले. तसेच ते पुढे जाऊन शिरजोर होऊ नयेत यासाठी अनेक चौकशा लावल्या; पण त्यांनी संघर्ष करून ‘वायएसआर’ नावाची वेगळी काँग्रेस स्थापन केली आणि प्रचंड बहुमताने विजय मिळवत आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपद पटकावले. याखेरीज  जुन्या काळात करूणाकरन, बिजू पटनायक यांनी केलेले बंड यशस्वी झाले. महाराष्ट्रात शरद पवार यांनीही काँग्रेसमध्ये बंड करून 1999 मध्ये ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ची स्थापना केली. अद्याप तरी त्यांनी काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन केलेला नसला तरी  ते पुन्हा काँग्रेसबरोबरच राजकारण करत आहेत. अजूनतरी त्यांना ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी यांच्याप्रमाणे काँग्रेसला डावलून सरकार स्थापन करता आलेले नाही. असो. मुद्दा हाच की, बहुतांश नेते वरिष्ठांच्या विचार-भूमिकेला वैतागून काँग्रेसमधून बाहेर पडतात. सत्ता मिळाली नाही, पद मिळाले नाही, पदावरून पायउतार होण्यास सांगितले की ते बाहेर पडतात आणि यथावकाश आपले पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये विलिन करतात. शरद पवार, ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी यांच्यासारखे हाताच्या बोटावर मोजता येतील असेच नेते आणि त्यांचे पक्ष मात्र त्याला अपवाद ठरले आहेत. आता पुन्हा एकदा काँग्रेसमधून नेत्यांच्या बाहेर पडण्याचे सत्र सुरू आहे. अर्थात काँग्रेसमध्ये जे घडते त्याचे पीक इतर राजकीय पक्षांतही येते. सर्वच पक्षांची संस्कृती एकाच प्रकारची बनली आहे. हा अनुभव असतानाच आता अमरिंदर सिंग यांनी पंजाबमध्ये नव्या राजकीय पक्षाची स्थापना करणार असल्याचे घोषित केले आहे. त्यांच्या या घोषणेचे बाकी कोणी नसले तरी भाजपने मनापासून स्वागत केले आहे.  पंजाबमधील काँग्रेस फुटीचा लाभ भाजप, आम आदमी पक्ष, अकाली दल, बसपला मिळू शकतो, हे खरेच; पण बंडखोर कॅप्टन अमरिंदर सिंग यांचेे राजकीय भवितव्य काय असेल, हे येणारा काळच ठरवेल.