विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपूर, मुंबई तसेच सावरगाव घाट (ता. पाटोदा) अशा तीन ठिकाणी तीन नेत्यांच्या सभा झाल्या. पहिली सरसंघचालक मोहन भागवत यांची, दुसरी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर, तिसरी पंकजा मुंडे यांची. विचारांचे सोने लुटण्याची ही दरसालचीच परंपरा आहे. ती या तिन्ही नेत्यांनी मनोभावे पाळली. पैकी मोहन भागवत हे प्रत्यक्ष राजकीय नेते नाहीत, तर सरसंघचालक आहेत. ते आपली विचारभूमिका मांडत राजकारण्यांना धडे देत असतात. तसा तो धडा यंदाही त्यांनी दिला. हे खरेच की, यंदा ‘कोरोना’च्या कारणामुळे या तिन्ही नेत्यांच्या सभा ‘ऑनलाईन’ झाल्या; पण त्यांनी मांडलेले विचार प्रसारमाध्यमांनी तमाम जनतेपर्यंत पोहचविले.

त्या-त्या नेत्यांच्या विचारांनी ते-ते लोक प्रभावितही झाले. पैकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राजकारण्यांना धडा दिला की, ‘राजकारण म्हणजे शत्रूमधील युद्ध नव्हे. विवेक पाळा!’ खरेच आहे. बहुतेक राजकारणी विवेकाला सोयीस्करपणे बगल देत वागत, बोलत असल्यानेच आज राजकीय क्षेत्राला मासळी बाजाराचे स्वरूप आले. राजकारणात कोण कधी काय बोलेल, याचा नेमच राहिलेला नाही. राजकारण्यांचे बोल देशहिताला, जनहिताला धरून असतील, तर त्याचे स्वागतच होते; पण असे बोल आवर्जून बोलले जात नाहीत. राजकीय लोक बोलतात ते एकमेकांची निंदा-नालस्ती करण्यासाठी. एकमेकांची ऊणीदुणी काढून घरातील धुणी रस्त्यावर धुणारे हरएक पक्षात सापडतात.

नवलाईची आणि तेवढीच धक्कादायक बाब अशी की, पक्षीय नेतेच नव्हे, तर घटनात्मक पदावर असलेले काही महोदयही ही उठाठेव करू लागले! मागील काही दिवसांत महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना नेते यांच्यात बर्‍याच शाब्दिक चकमकी झाल्या. म्हणूनच काल बोलताना शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ओघवत्या भाषणात बोलताना सरसंघचालक भागवत यांच्या विचारांचा आधार घेत ‘एकमेकांना नुसत्या टोप्या घालू नका. काळ्या टोपी खाली डोकं असेल आणि त्यात मेंदू असेल तर सरसंघचालक मोहन भागवत यांना हिंदुत्वाचा अर्थ विचारा!’ अशा कानपिचक्या सर्वसंबंधितांना दिल्या. उद्धव ठाकरे यांनी यावेळी थेट कोणाचे नाव घेतले नसले, तरी आपला रोख नेमका कोणाकडे आहे, हेदेखील लपवले नाही. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री झाल्यानंतरचे विजयादशमीच्या मुहूर्तावरचे हे पहिलेच भाषण असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष होते. त्यांनी आपल्या भाषणातून अपेक्षेप्रमाणेच विरोधकांचे, टिकाकारांचे वाभाडे काढले.

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असोत की नारायण राणे आणि त्यांचे दोन पुत्र असोत मुख्यमंत्र्यांनी आपल्या ‘ठाकरी भाषेत’ त्यांचा चांगलाच समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक आसूड ओढण्याची उद्धव ठाकरे यांच्यावर आजवर वेळ आलेली नव्हती; पण सत्तेच्या भरल्या ताटावरून उठावे लागल्याने मागील काही दिवसांत देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे बगलबच्चे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचत आहेत. शिवसेनेला हटकून अंगावर घेण्याचा प्रयत्न होत आहे. म्हणूनच की काय, काल दसरा मेळाव्याचे निमित्त साधून उद्धव ठाकरे यांनी भाजपतील बोलघेवड्यांना चांगलेच शिंगावर घेतले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस, राणे पिता-पुत्रच नव्हेतर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही चांगलेच धारेवर धरले. दानवे यांच्या ‘लग्न तुम्ही केलं आणि पैसे मात्र बापाकडे मागत आहात,’ या वक्तव्याचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, ‘दानवे,.. ते तुमचे बाप असतील, माझा बाप इथं माझ्यासोबत आहे. तुमचे भाडोत्री बाप तुम्हाला लखलाभ!’ उद्धव ठाकरे यांच्या या भाषेवर दानवे यांची लागलीच प्रतिक्रिया आली नाही; पण राणेपुत्रांनी आपापली प्रतिक्रिया दिली आहे.

मुळात शाब्दिक वाद घालण्यात, वाढविण्यात नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांनी जणू ‘पीचएचडी’ मिळविली आहे. तेव्हा पुढच्या काळात शिवसेना आणि राणे पिता-पुत्र यांच्यातील शाब्दिक चकमकी वाढतच जातील. देवेंद्र फडणवीस हेही उद्धव ठाकरे यांना ठरवून उत्तर देतील; पण दुसर्‍याच्या काठीने साप कसा मारता येईल, हेही ते पाहतील. फडणवीस यांनी मागील काही दिवसांपासून राणे पिता-पुत्रांच्या हाती अशी काठी दिल्याचे बोलले जाते आणि ते काही खोटेही नाही.

असो; पण काल उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याच्या निमित्ताने जे शब्दबाण सोडले, त्यामुळेच देवेंद्र फडणवीस, राणे पिता-पुत्र, रावसाहेब दानवे, अभिनेत्री कंगना रनौत तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महोदयच नव्हे तर, पंतप्रधान मोदी महोदयही घायाळ झाले असतील. नवल असे की, एकीकडे उद्धव ठाकरे आपल्या विरोधकांवर असे शब्दबाण सोडत असतानाच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांचा ’भाऊ’ म्हणून उल्लेख केला; त्यांची स्तुती केली, त्यांचे अभिनंदन केले! काही गर्भीत इशारेही दिले. यंदाच्या विजयादशमीच्या विचारमंथनाचे हेही एक खास वैशिष्ट्य मानले जाईल, हे खरे.