आज शनिवारपासून घटस्थापनेने नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. ‘कोरोना’चा काळ असल्याने यंदा नवरात्रौत्सव साजरा करण्यास काहीशा मर्यादा आल्या असल्यातरी देवीविषयीचा मनामनातील भक्तीभाव अमर्याद असाच आहे. विविध नावाने ओळखल्या जाणार्‍या जगन्मातेचा नऊ दिवसांचा हा उत्सव आनंद, स्फूर्ती, चैतन्य देणाराच खरा. हे संपूर्ण विश्‍व हे शक्तीचे दृश्यस्वरुप आहे, असे काही प्राचीन हिंदू तत्वज्ञानांनी म्हटलेले आहे. त्या तत्वज्ञानानुसार या शक्तीची दोन रूपे आहेत. एक पुल्लिंगी आणि एक स्त्रिलिंगी. शिव व शक्ती या दोन्ही शक्तींचा मिलाप होऊनच या विश्‍वाची निर्मिती झाल्याचे मानले जाते.

म्हणूनच कवी कुलगुरू कालिदासाने आपल्या प्रसिध्द ‘रघुवंश’ या महाकाव्याचा प्रारंभ करताना ‘जगत: पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्‍वरौ’ असे या विश्‍वाच्या माता-पित्यांना प्रथम वंदन केले असावे. आपण जाणतोच की, वैदिक व हिंदू धर्मात अनेक देवदेवता आहेत. विविध स्तरात या देवदेवतांची अनेक नावे आहेत; पण त्या सर्वांचे मूळ हे शिव व शक्ती यांचे दृश्यरूप आहे, असे मानले जाते. हिंदू देव हा एकटा पुल्लिंगी असा देव नाही. शंकर-पार्वती, विष्णू-लक्ष्मी, राम-सीता, राधा-कृष्ण, विठ्ठल-रूक्मिणी, खंडोबा-म्हाळसा अशा जोडीने या विश्‍वाच्या माता-पित्यांना मानले जाते. अपवाद वगळता हिंदू मंदिरात या दोन्ही देव-देवतांच्या मूर्ती जोडीनेच असतात.

थोडक्यात हिंदू अध्यात्म हे जगाचा निर्माता व निर्मिती अशा दोन्ही एकत्र संकल्पनेतूनच ईश्‍वराचे अस्तित्व मानते. हिंदू तत्वज्ञानात अशा प्रकारे पुरूष व स्त्री, पिता व माता, पती व पत्नी अशी परमेश्‍वराची संकल्पना केली जाण्यामागेही जगातील नैसर्गिक वैभवाने नटलेली ही भारतभूमी आहे. बंकिमचंद्राच्या शब्दात सांगायचे झाले, तर ‘सुजलाम, सुफलाम, मलयज, शीतलाम, शस्यशामलाम, शुभ्र जोत्सां, पुलकित यामिनीम, फुल्ल कुसुमित, द्रुमदल शोभिनीम’ अशी भारतभूमी आहे. या भारतभूमीत वैदिक व हिंदू तत्वज्ञानाचा जन्म झाला. हे तत्वज्ञान सांगते की, हे संपूर्ण विश्‍व मूलभूत शक्तींच्या संगमातून निर्माण झाले आहे. दोन शक्ती एकत्र आल्याशिवाय विश्‍वात कसलीही निर्मिती होऊ शकत नाही.

अध्यात्मवाद्यांनी याच दोन शक्तींना शिव व शक्ती असे नाव दिले. त्यातूनच हिंदू देवदेवींचा जन्म झाल्याचा विचार पुढे आला. भौतिक जगाचा अनुभव त्याच विचार कल्पनेला पुष्टी देणारा होता. आपला स्वत:चाच जन्म माता-पित्याशिवाय होत नाही, हा सार्वत्रिक अनुभव त्यांच्यापुढे होताच. आता सद्यकाळात विकसित झालेले विज्ञान तरी काय सांगते? विजेचा आविष्कार धन व ऋण विद्युत प्रवाहांचे मिलन झाल्यावरच होतो. चुंबकीय शक्ती उत्तर व दक्षिण ध्रुव अशा रूपातच व्यक्त होते. म्हणूनच शिव व शक्ती, शंकर-पार्वती, विष्णू-लक्ष्मी आदी जगन्माता, जगत्पिता स्वरूपात परमेश्‍वराची वैदिक व हिंदू तत्वज्ञानाने केलेली संकल्पना ही विश्‍वाच्या रचनेविषयीच्या वैज्ञानिक कल्पनेशी अधिक जवळची आहे.

येथे एक महत्वाची बाब नोंदवावी लागते, ती म्हणजे प्राचीन वैदिक समाजात पुरूषांच्या बरोबरीने स्त्रीला समान हक्क व समान दर्जा होता. गार्गी व मैत्रेयी या वेदशास्त्रसंपन्न विदुषी या देशात होऊन गेल्या. स्त्रियांना कोणतेही शिक्षण घेण्यास पुरूषांइतकेच स्वांतत्र्य होते. समाजात त्यांना एकवेळतर मातृसत्ताक पध्दतीने पुरूषांपेक्षा वरचे स्थान बहाल केल्याचे दिसते; पण काळ बदलताना सारेच काही बदलले. विद्यमान स्थितीचा विचार करता भारतीय स्त्रियांची स्थिती फार चांगली आहे, असे म्हणता येत नाही. मध्यंतरी जागतिक स्तरावर एक सर्वेक्षण झाले. स्त्रियांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा आढावा घेण्यासाठी इंटरनॅशनल कन्सल्टिंग अँड मॅनेजमेंट फर्म बूझ अँड कंपनीने जगातील 128 देशांमधील स्त्रियांचा आर्थिक आढावा घेतला होता. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया अग्रस्थानी राहिला. त्यापाठोपाठ नॉर्वे, स्वीडन आणि फिनलँड आदी देशांचा क्रम लागला. तर भारताचे स्थान चक्क 115 व्या क्रमांकावर राहिले.

स्त्रियांच्या सर्वंकष विकासाच्या गावगप्पा मारणार्‍या, नारीला ‘नारायणी’ मानणार्‍या भारतीय स्त्रियांची आर्थिक स्थिती अशी दयनीय राहावी, हे भारतासाठी शोभनीय नक्कीच नाही. अर्थात आपल्याकडील स्त्रियांच्या आर्थिक सबलीकरणासाठी प्रयत्न झालेच नाहीत, असे नाही. प्रयत्न जरूर झाले; पण ते नेटाने आणि नेकीने झालेले नाहीत, हेही तितके खरे. मूलत: आर्थिक सक्षमीकरण हे व्यक्तीच्या शिक्षणाशी, बुद्धीशी आणि श्रमाशी जोडले गेलेले असते. सन्मार्गाने पैसा कमवायचा असेल, तर त्या-त्या व्यक्तीकडे असे हे मूलभूत गुण असायलाच हवेत. त्या पार्श्‍वभूमीवर भारतीय शिक्षणाच्या वाटा अलीकडच्या काळात अधिक धोपट झाल्या असल्या तरी स्त्रियांच्या शिक्षणाच्या वाटेत अजूनही काटेच पेरल्याचे दिसतील. भारतीय समाज ज्या ग्रामीण भागात बहुसंख्येने राहतो, तेथील स्त्रियांच्या शिक्षणाची हेळसांड अधिकची आहे. शाळेत पिण्यायोग्य पाणी, स्वच्छतागृहे नसल्याने काही मुलींवर शाळा सोडण्याची वेळ येते, यावरूनच ग्रामीण भारतातील मुलींच्या शिक्षणाचा अंदाज बांधता येईल. शेवटी शिक्षण, ज्ञान हेच व्यक्तिविकासाचे लक्षण असते. स्त्रियांच्या आर्थिक सक्षमीकरणाचीही तीच पहिली अट ठरते; पण ज्या मुली, स्त्रिया शिक्षित होतात, पदवी, पदव्युत्तर शिक्षण संपादन करतात, त्या सर्वांनाच नोकरीच्या संधी मिळतात, असेही नाही.

स्त्रियांनी नोकरी करून कुटुंब चालवावे, ही मानसिकता आपल्याकडे अजूनही सर्रास रूढ झालेली नाही. अलीकडच्या काळात एक अपरिहार्यता म्हणून शहरी मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्रियांना नोकरीचा मार्ग पत्करण्यास संमती दिली जाते खरे; पण त्या नोकरी करणार्‍या स्त्रियांनाही आपापले कार्यकर्तृत्व सिद्ध करण्यामध्ये नाना अडचणी येतात. कामाच्या ठिकाणी भेदभाव, काही ठिकाणी पगारामध्ये तफावत ठेवली जात असतानाच शारीरिक, मानसिक शोषणालाही स्त्रियांना सामोरे जावे लागते. अगदी उच्च पदस्थ म्हणून काम करणार्‍या स्त्रियांच्या वाटेतही पुरुषी विकाराचे काटे पेरलेले असतात. शहरी बुद्धीवादी स्त्रियांचा हा अनुभव असेल, तर ग्रामीण कष्टकरी स्त्रियांंच्या वाट्याला काय भोग येत असतील? ग्रामीण कष्टकरी स्त्रियांचे जिणे म्हणजे सर्वांर्थाने गुलामीच! घरीदारी तिच्या वाट्याला उपेक्षाच! असे सारे असतानाच आपण नवरात्रौत्सव साजरे करीत आहोत. स्त्री शक्तीचा ऊदो-ऊदो गात आहोत. काय तर म्हणे,-‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवत:। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:॥’ याचा अर्थ हाच की, जिथे स्त्रियांचा आदर केला जातो. तेथेच देवता निवास करते आणि जिथे स्त्रियांचा अनादर होतो, तेथे सर्व काही निष्फल होते. हे तत्वज्ञान अत्यंत उदात्त, चांगले, मांगल्यमय आहे; पण प्रत्यक्षात या मांगल्याची प्रचिती खरोखरच येते काय?

आजच्या तथाकथित आधुनिकतेच्या युगात स्त्रियांविषयीचा आदरभाव कमीच झालेला आहे. यामध्ये एक सत्य असे की, स्वतः स्त्रीलाही स्वतःतील सामर्थ्याचा विसर पडलेला दिसतो. धनवृद्धीसाठी ज्या देवीच्या महालक्ष्मी रूपाची आपण घरोघरी पूजा करतो त्याच देवीच्या महाकाली रूपाने उन्मत्त झालेल्या राक्षसांचा नाश केला आहे, याचा विसर आजच्या स्त्रीला पडला म्हणूनच की काय, आज समाजात राक्षसीवृत्तीचे पुरुष मातले? निर्भया, कोपर्डी, हिंगणघाट, उन्नाव, हैदराबाद आणि आता हाथरसमधील बलात्कार करुन निर्घृणपणाने पीडितेचा खून करण्याचा अमानुष सिलसिला चालूच आहे.

पुरुषी विकृतीपुढे कायदा, सुव्यवस्था लुळीपांगळी ठरत असल्याचा अनुभव येतो आहे. म्हणूनच वासनांध दुष्प्रवृत्तीविरुद्ध लढण्यासाठी आज प्रत्येक स्त्रीने रणरागिणी बनण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येकीने किमान स्वसंरक्षणाचे
प्राथमिक धडे घेण्याची नितांत गरज आहे. अत्याचार सहन करणार्‍याचा नव्हे, तर अत्याचाराला प्रत्युत्तर देणार्‍याचा समाजात आदर केला जातो. पुराणातील, इतिहासातील आदिशक्तीच्या कथा हेच तर सांगतात. या सार्‍या कथा केवळ ऐकण्यासाठी नसतात, तर त्यातून धडा घेऊन वेळप्रसंगी त्या आचरणातही आणायच्या असतात. त्याच पार्श्‍वभूमीवर समाजातील दुष्प्रवृत्तींना ठेचून काढण्याचा विडा आज नवरात्रौत्सवाला प्रारंभ होताना समस्त स्त्रियांनी उचलला पाहिजे. त्याचवेळी स्त्रियांचा आदर, सन्मान वाढविण्याचा संकल्पही घरो घरी केला पाहिजे.