वर्ष सरले! तरीही महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार तरले! हे नवल यासाठीच की, सरकार स्थापन झाल्यापासूनच ते पाडण्याचा विडा विरोधातील भाजपने उचलला आहे. त्यासाठीच त्यांनी देव पाण्यात घातले. कधी राज्यपाल महोदयांच्या आडून ‘जादूटोणा’ करण्याचा प्रयत्न केला, तर कधी अभिनेत्री कंगना रनौतसारख्या बोलभांडांना पुढे करून या सरकारला शिव्याशाप देण्याचा प्रयत्न झाला. ते कमी की काय म्हणून केंद्र सरकारनेही अगदी ठरवून महाविकास आघाडी सरकारची आर्थिक नाकेबंदी केली. राज्य सरकारच्या घातपातासाठी अशा सार्‍या उठाठेवी केल्यामुळे भाजपचीच लाज गेली. तर, विरोधकांना पुरून उरून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली.

आपणास चांगलेच स्मरत असेल की, गेल्या साली ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. त्याचा निकाल लागला तेव्हा भाजप आणि शिवसेना यांच्या पारंपरिक युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र होते. 2014 च्या निवडणुकांप्रमाणेच याही वेळी भाजपला शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. अर्थातच पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, हे निश्चित होते; पण ऐनवेळी शिवसेनेचा स्वाभिमान जागा झाला. उद्धव ठाकरे यांना बंद खोलीतील भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांचे शब्द आठवले. सरकार स्थापन्याच्या मुहूर्तावर त्यांनी या शब्दाची भाजपला आठवणही करून दिली; पण भाजपने योजिल्याप्रमाणे हात वर केले. ‘फिफ्टी-फिफ्टी’चा असा कुठलाच शब्द शिवसेनेला दिला नव्हता, असे साळसूदपणे बोलत ते मोकळे झाले.

आपण काहीही बोलले तरी आणि मतलबी भूमिका घेतली तरी, शिवसेना काहीच करू शकणार नाही. भाजपच्या मागे शिवसेनेला कायमच फरपटत यावे लागेल. त्यांच्यापुढे दुसरा पर्याय नाही, असाच काहींसा समज भाजप नेत्यांनी विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या बगलबच्चांनी करून घेतला होता; पण झाले भलतेच! भाजपची मस्ती जिरविण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी मैत्री करण्याचा अफलातून निर्णय घेतला. तरीही राज्यात भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस असे स्पष्ट वैचारिक विभाजन असल्याने शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवाले पाठिंबा देणार नाहीत, अशीच भाजपवाल्यांची अटकळ होती; पण कळ फिरवली गेली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या ‘कसरती’ झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुढे सरसावले. त्यांनी शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन्याचे मनावर घेतले. नव्हेतर, उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा सल्लाही दिला; पण काँग्रेसचे तळ्यात-मळ्यात होते.

महाराष्ट्रातील काँग्रेसी नेत्यांना सत्तेच्या सावलीत बसण्याची घाई झाली होती; पण श्रेष्ठींच्या मनात काही शंका होत्या. स्वतः शरद पवार यांनीच त्याचे अप्रत्यक्ष निरसन केले. अंतिमतः काँग्रेसच्या श्रेष्ठींनीही हिरवा कंदील दाखविला. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन्याचा निर्णय झाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या ज्येष्ठ व अनुभवी मंत्र्यांसह अमित देशमुख, सतेज पाटील, डॉ. विश्वजीत कदम, कु.आदिती तटकरे आदी नव्या तरुण चेहर्‍यांना संधी देऊन मंत्रिमंडळाचा समतोल राखण्याचा प्रयत्न झाला. या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत राज्यातील शेतकरी, कष्टकर्‍यांचे हितरक्षण करण्याचे वचन दिले होते. त्यानुसार सरकारने प्रारंभी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, अत्यल्प दरात शिवभोजन, सामान्य माणसाला परवडेल अशी गृहबांधणी, सर्व आयुक्तांमध्ये मुख्यमंत्री सचिवालये सुरू करणे अशा काही कल्याणकारी योजनांचीही सुरुवात केली. दरम्यान कापसाची विक्रमी खरेदी शासनातर्फे करण्यात आली.

दुग्धव्यवसायाला संरक्षण देण्यासाठीही सरकारने दोनशे कोटी रुपये दूध खरेदीसाठी खर्च करून शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, औषधोपचार, रोजगार युवा पिढीचे विवाहोत्तर आयुष्य सुखी करणे, जनावरांना अभय या कल्याणकारी कार्यक्रमांच्या आधारे जनतेचे जीवन समृद्ध करावे, असा महाराष्ट्राचे आधुनिक संत गाडगेबाबा यांचा आग्रह होता. गाडगेबाबांच्या या शिकवणीनुसार आमचे शासन काम करेल, हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितले आणि त्याला कृतीरुपही दिले; पण दुर्दैव असे की, महाविकास आघाडीची गाडी रुळावर येत असतानाच ‘कोरोना’ने थैमान घातले. या महासाथीने महाराष्ट्रासह सर्व देशाला, जगाला ग्रासून एका महान संकटाच्या दारात उभे केले! त्यामुळे इतर सरकारांप्रमाणेच महाराष्ट्र राज्य सरकारही चक्राहून गेले. त्यातून मार्ग काढतानाच अवकाळी, अतिवृष्टी, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीने धुमाकूळ घातला.

संकट हे एकटे कधीच येत नसते, तर ते समूहाने चाल करून येते, याचाच अनुभव आला. निसर्ग संकटांचा सामना करताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकजुटीची गरज असताना विरोधातील भाजप आपल्याच चालीने चालू लागला. सरकारच्या मरणावर टपून राहिला. सत्तेविना कशी आणि किती तडफड होते, हेच त्यांनी मागील वर्षभरात दाखवून दिले. महाविकास आघाडी सरकारचे वर्ष सरले; पण पुढे काय वाढून ठेवले, हे कसे ओळखायचे? अडचणी अनेक आहेत, हे तर उघडच आहे; पण सरकारातील ‘त्रिमूर्ती’ने एकजूट दाखवून या सार्‍या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न केला, तर भाजपला अर्थात देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा परत येण्याची संधी लाभणार नाही, हे खरेच.