जिभेला हाड नाही म्हणून काहींना द्वाड अर्थात वाईट बोलण्याची सवय असते. हीच सवय बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौतने आवर्जून जोपासलेली दिसते. कंगना मागील काही दिवसांत वादग्रस्त विधानामुळे चांगलीच गाजली आहे. अर्थात गाजण्यासाठी ती आपले तोंड वाजवितेे, असे अजिबात नाही. कंगना बॉक्स ऑफिसची ‘अनभिषिक्त सम्राज्ञी’ मानलीच जाते. त्याचीच गर्वबाधा कंगनाला झाली की काय माहित नाही; पण ती अलीकडे ठरवून आगलावी भाषा करते. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युनंतर तर कंगना बिथरल्यासारखीच झाली आहे. तिने संपूर्ण चित्रपटसृष्टीलाच लक्ष्य केले.
नेपोटिझम, ‘मुव्ही माफिया’ अशा धारदार शब्दांचा वापर करुन तिने सिनेसृष्टीतील दिग्गजांना, प्रस्थापितांना भंडावून सोडले. करण जोहर, सलमान खान, शाहरूख खान आणि आमीर खान सर्वांवरच तिने आरोप केले आहेत. तिला पहिल्यांदा चित्रपटात संधी देणार्या आणि ‘गँगस्टर, वो लम्हे आणि राज 3’असे तीन यशस्वी चित्रपट देणार्या महेश भट यांच्याशीही तिचे बिनसलेले आहे. सुशांत मृत्यु प्रकरणात जेव्हा अमली पदार्थांचा मुद्दा आला तेव्हाही 99 टक्के बॉलीवूडकर नशा करतात असे वक्तव्य कंगनाने केले. कंगना चित्रपटसृष्टीबरोबर आता समाजमाध्यमांवरुन राष्ट्रीय मुद्यांवरही प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसते. कंगना केंद्र सरकारला समर्थन देत विरोधकांना लक्ष्य करत असते. या टीकाटिप्पणीमध्ये किंवा दोषारोपांमध्ये कंगना अनेकदा भाषेची मर्यादा पाळत नसल्याचेही दिसून येते.
दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीविषयी कंगनाने तिची बहीण रंगोलीच्या ट्विटर हँडलवरून, ‘दिल्लीला सीरिया केले आहे. बॉलीवूडमधील जिहादींना आता बरे वाटले असेल. किड्यांप्रमाणे चिरडून टाका,’ अशा अर्थाचे ट्वीट केले होते. कंगनाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवरही पुनःपुन्हा टीका केली आहे. तिने मुंबईला ‘पाकव्याप्त काश्मिर’ म्हटले. त्यानंतर सर्वस्तरीय निषेध झाल्यानंतर कंगनाने सोयीस्कर कोलांटउडी मारत शिवसेनेवर शब्दबाण सोडले. कंगनाच्या घराचे बांधकाम पाडणे, तिचे खासदार संजय राऊत यांच्याबरोबरचे वाक्युद्ध यामध्ये अनेकदा भाजपने कंगनाचे समर्थन केले. कंगनाला वाय दर्जाची सुरक्षाही देऊ केली. यावरुन ती लवकरच भाजपमध्ये प्रवेश करेल, अशीही चर्चा सुरु झाली. केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही भाजप कंगना रनौतचे स्वागतच करेल, असे म्हटलेे. अर्थात राजकीय अंगणात येऊन नाचणार्या सिने नट्यांची काही कमी नाही. हेमामालिनी, जयाप्रदा, जया बच्चन अशा अनेक नायिकांनी राजकारणात आपले बस्तान बसविलेच आहे.
कंगना अजूनही प्रत्यक्षात राजकारणात आलेली नाही; पण तरीही तिच्या अंगात चांगलेच राजकारण मुरलेले आहे. अर्थातच तिचा राजकीय गुरु भारीच असावा. त्याशिवाय तिला मोका साधून टिकात्मक ठेका धरताच आला नसता. कंगनाने आजपर्यंत जो बोलभांडपणा केला, त्यावर चांगल्या कमी, वाईटच प्रतिक्रिया अधिकच्या उमटल्या; पण कंगनाला त्याची कसलीच फिकीर नाही. ती तोंडाला येईल ते बरळते. खंत अशी की, कंगनाने काल, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे निमित्त साधून निषेधार्ह ‘ट्विट-ट्विट’ केली. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना खुजे ठरविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सरदार वल्लभभाई पटेल यांना महानत्व बहाल केले. अर्थात सरदार पटेल यांचे मोठेपण कोणालीही कधीही अमान्य करता येणार नाही. सरदार पटेल पोलादी लोहपुरुष म्हणूनच कायमसाठी पूजनीय आहेत; पण महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे महत्व कमी करण्याची उठाठेव कशासाठी? असा प्रयत्न करणे चुकीचे, निषेधार्हच ठरते.
महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल यांच्यात वैचारिक मतभेद नक्कीच होते; पण त्यांची ध्येयदिशा एक होती, ती म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे. त्यात त्यांनी यश मिळविले. देश स्वतंत्र झाला. पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना संधी मिळाली. त्यांनी त्या संधीचे सोने केले असले तरीही नेहरु नितीवर काहीजण बारमाहीच टीका करत राहिले. नेहरू यांच्यासह महात्मा गांधी यांनाही या ना त्या कारणावरून दोष देणारे ‘नथुराम’ या देशात आजही अनेक आहेत. अभिनेत्री कंगना रनौतही ‘नथुरामा’चाच विचार वारसा चालवू पाहते की काय? तसेही असेल कदाचित; पण कंगनाच्या ‘ट्विट-ट्विट’मुळे महात्मा गांधी यांचे माहात्म्य अजिबात कमी होत नाही. त्यांचे विचार लपविल्याने लपणारे नाहीत. गांधीजींनी सत्य, अहिंसा, शांती, सत्याग्रह, त्याग, सेवा, समर्पण व मानवतेच्या विचारांचा आदर्श संपूर्ण जगापुढे ठेवला.
आज 21 व्या शतकामध्येही आपल्या रोजच्या जगण्यातून त्याचा प्रभाव जाणवतो. म्हणूनच जगाच्या पाठीवर सर्वत्र मानवतेचे प्रतीक म्हणून गांधीजींचा आणि त्यांच्या विचारांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला जातो. गांधीजींचे समग्र विचार, त्यांची जीवननिष्ठा व त्यांचे जीवनदर्शन याबाबत जगभरात कमालीचे आकर्षण, औत्सुक्य व आदर आहे. या सर्वांमध्ये कंगना नक्कीच नाही. कंगनाने काल गांधीजी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी अनादरच व्यक्त केला. अर्थात सूर्यावर थुंकल्याने काय होते, याचा अनुभव कंगनाला नसावा. कंगनावर भाजपची भाडोत्री म्हणून आरोप केला जातो. तेव्हा तिने काल मोका साधून आपले कर्तव्य बजावले म्हणायचे. तसेही गांधी आणि नेहरु हे महान नेते कंगनाच्या आकलनापलीकडेच आहेत.