यशाचे धनी अनेक असतात. मात्र, अपयश सदाच पोरके असते, असे जे म्हटले जाते ते खोटे नाही. बिहार विधानसभा निवडणुकीत यश भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच लाभले. ठरल्याप्रमाणे तेथे पुन्हा एकदा नितीशकुमार हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. स्वाभाविकच राष्ट्रीय जनता दलच्या नेत्यांची तगमग वाढली. तेजस्वी यादव या आपल्या तरुण नेत्याची सारी मेहनत वाया गेली, सर्वाधिक जागा पटकावूनही सत्तेची संधी हुकली. हे सारे झाले ते काँग्रेसच्या दुबळ्या नेतृत्त्वामुळे. बिहार निवडणूक सुरु असताना राहुल गांधी सिमला या ठिकाणी गेले होते.

पिकनिकचा आनंद लुटत होते. पक्ष अशा प्रकारे चालवला जातो का? राहुल गांधी यांच्या कार्यशैलीमुळे भाजपला मदतच होते आहे, असा आरोप राजदचे नेते शिवानंद तिवारी यांनी केलाच आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर बाहेरचे आणि घरचेही प्रश्नचिन्ह उमटवत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीतच नव्हे तर, मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील पोटनिवडणुकांमध्येही काँग्रेसचा दारुण पराभव झाला. काँग्रेसच्या या अधोगतीला पक्षनेतृत्वाला जबाबदार धरले जात आहे. लोक काँग्रेसकडे सशक्त पर्याय म्हणून पाहात नाहीत. पक्षामध्ये समस्या काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे; पण काँग्रेस नेतृत्व या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याची जाहीर टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे. पी. चिदम्बरम यांचे पुत्र व लोकसभेचे खासदार कार्ती चिदम्बरम, विवेक तन्खा आदींनी सिब्बल यांना पाठिंबा दिला आहे. तर, गांधी निष्ठावंतांकडून कपिल सिब्बल यांच्यावर निशाणा साधला जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या पाठोपाठ आता काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी कपिल सिब्बल यांना लक्ष्य केले आहे. फक्त बोलून काम होणार नाही. काम केल्यानंतर काही बोला. काम न करता बोलणे म्हणजे अंतर्मुख होणे नाही. असे अधीर रंजन चौधरी यांनी कपिल सिब्बल यांना उद्देशून म्हटले आहे.

हे खरेच की, ‘कामाला कधीमधी अन् खायला सर्वाआधी’ अशीच काहींशी काँग्रेसच्या बहुतेक नेत्यांची मानसिकता झाली आहे. अपयश, चुकांचा खापर पक्ष नेतृत्वावर फोडून रिकामे व्हायचे; पण पक्षाला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी फारसे कष्ट घ्यायचे नाही, हा अनुभव काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून येतो आहे. मध्यंतरी 23 नेत्यांनी एक पत्र लिहून पक्षनेतृत्वाविषयी काही प्रश्न उपस्थित केले होते. असंतुष्ट नेत्यांनी लिहिलेले पत्र हा गांधी घराण्यासाठी मोठाच धक्का होता. निष्ठावंत म्हणून गणले जाणारे गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी नाराजांच्या सुरात सूर मिसळल्यामुळे सोनिया, राहुल आणि प्रियांका यांना दुःख झाल्याचे बोलले जात होते. हे खरेच की, आताआतापर्यंत काँग्रेसमध्ये नेहरू-गांधी घराण्यातील व्यक्तीच्या अपयशाला फारसे महत्त्व दिले जात नसे. काँग्रेसजन मग ते कोणत्याही गटाचे किंवा विचारांचे असोत, गांधी घराण्यातील व्यक्तीकडे थेट संशयाने पाहिले जात नव्हते; पण कपिल सिब्बल हे पक्ष नेतृत्त्वाला संशयाच्या भोवर्‍यात उभे करत आहेत. म्हणूनच ‘डाऊटिंग थॉमस’ म्हणजेच सदैव संशय घेणारा व्यक्ती, अशा शब्दांनी सलमान खुर्शीद यांनी कपिल सिब्बल यांना फटकारले आहे.

ज्यांना पटत नसेल त्यांनी पक्ष सोडून बाहेर जावे, असाही सल्ला त्यांनी सिब्बल यांना दिला आहे. एकूणच काँग्रेसमधील कुरबुरी पुन्हा वाढल्याचे दिसत आहे. थेट पक्ष नेतृत्त्वावर अर्थात गांधी कुटुंबियावर शाब्दिक हल्ले चढविले जात आहेत. अर्थात हे सारे काँग्रेससाठी किंवा गांधी कुटुंबियांसाठी नवे नाही. इंदिरा गांधी या जेव्हा 1977 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पराभूत झाल्या, तेव्हाही पक्षातील नेते मोठ्या संख्येने त्यांच्यावर नाराज होते. त्यांना सोडूनही गेले होते; परंतु जे सोबत राहिले होते, त्यांच्यावर इंदिरा गांधी यांचा प्रचंड विश्वास होता. 1996 आणि 1998 मध्येही काँग्रेसचा मोठा पराभव झाला. त्यावेळीही सर्व नेत्यांना सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास होता; परंतु नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा उदय आणि 2014 तसेच 2019 अशा लागोपाठच्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेला दारूण पराभव यामुळे नेहरू-गांधी घराण्याभोवतीचे वलय हळूहळू धूसर होऊ लागले आहे. आपण जाणतोच की, स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसचे नेतृत्व गांधी घराण्यातील व्यक्तीनेच केले आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसचे नेतृत्त्व सीताराम केसरी यांच्याकडे गेले खरे; पण गुलाम नबी आझाद यांच्यासारख्यांनीच त्यावेळी सोनिया गांधी यांना साकडे घातले आणि त्यांनाच पक्षाध्यक्षपद बहाल केले.