चीनच्या वुहान प्रांतात पहिल्यांदा प्रकट झालेल्या ‘कोरोना’विषाणूने पुढील काळात जगभरात संचार केला. आज एकंदरीत मानवी समाजावर आणि सर्व खंडांवर ‘कोरोना’ची काळी छाया पडली आहे. जगातील महान आर्थिक सत्ता असलेल्या अमेरिकेपासून साता समुद्रावर ज्यांचा सूर्य कधी मावळत नव्हता अशा जगावर राज्य केलेल्या ब्रिटनसह युरोपमधील फ्रान्स, इटली, रशिया यांसारख्या प्रगतीशील राष्ट्रांनाही या ‘कोरोना’ विषाणूने प्रचंड मोठा फटका दिला आहे. त्यामुळेच चीन ‘खलनायक’ ठरवला गेला खरा; पण चीनची चाल अजिबात बदललेली नाही. महामारीच्या या काळातही चीनने आपली नफेखोरी वाढवण्याचाच अघोरी प्रयत्न सुरु ठेवला आहे. ‘कोरोना’मुळे पूर्ण जगातील देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या असल्याचे चित्र असताना चीनची अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत आहे. प्रभावी अर्थसत्ता आज ‘कोरोना’पुढे गुडघे टेकताना दिसत आहेत. अशावेळी शेअर बाजाराच्या निर्देशांकाचा फायदा घेत चीनी भांडवलदार प्रचंड 
मोठी गुंतवणूक करून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या, स्टार्टअप्स  कंपन्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जगातील मोठमोठे उद्योग, वित्तसंस्था, शेती-उद्योग, शिक्षण, संरक्षण, अणुशक्ती, अंतराळ अशा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात घुसून तेथे आपला वरचष्मा निर्माण करण्याचा चीनचा डाव आहे. निषेधार्ह बाब अशी की, ‘कोरोना’काळाचा फायदा घेऊन चीन आपल्या निकृष्ट दर्जाच्या वस्तू बळजबरीने देशादेशांत विकण्याचा अट्टाहास करीत आहे. खिळखिळ्या अर्थव्यवस्थांना ब्लॅकमेल करुन तेथे आपली दर्जाहीन उत्पादने खपवून चीन जगाचे आर्थिक शोषण करत आहे. चीनने पुरवलेले मास्क, व्हेंटीलेटर्स, पीपीई किटस् सुमार दर्जाचे असल्याची तक्रार अनेक देशांनी केली आहे. असे असतानाच  चीन आता शेजारील देशांना मोठ्या प्रमाणात लस पुरवठा करण्याच्या तयारीला लागला आहे. दुर्दैव असे की, ‘फार्मसी ऑफ द वर्ल्ड’ बनू पाहणार्‍या भारतातील ‘कोरोना’ संकट वाढले आणि त्यामुळेच लस निर्यात थांबवावी लागली आहे. त्याचाच लाभ उठवण्याची खेळी चीनने खेळली आहे.  शेजारील देशांना चीनकडे पाहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी अफगणिस्तान, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा करून लस पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागितक लसीकरण मोहिमेला हा मोठा धक्का मानला जात आहे. ‘कोरोना’च्या कारणामुळे भारत गोत्यात आला असताना चीन नफ्यासाठी जिभाळ्या चाटू लागला आहे. अर्थात चीनच्या या अघोरी खेळी नव्याही नाहीत. मजबुरी हेरून, मोका साधून दुसर्‍या देशाचा लचका तोडण्याची चीनची चाल जुनीच आहे.  ‘चीनी ड्रॅगन झोपी गेला आहे. तो एकदा जागा झाला की, सारे जग हलवून टाकेल!’ असे पूर्वी म्हटले जात होते आणि तसेच घडले आहे. ताजा इतिहास असा की, माओ त्से तुंग यांच्या उदयानंतर चीन एकसंध बनला आणि चीनने प्रगतीची मोठी झेप घेतली. त्याबरोबरच चीनने हळूहळू साम्यवादाचा मुखवटा बाजूला ठेवत विस्तारवादी पावले टाकायला सुरुवात केली. चीनने भारतावर आक्रमण केले आणि अन्य शेजारील देशांनाही गिळंकृत करायला सुरुवात केली. चीनच्या या साम्राज्यवादी, विश्वाला ग्रासणार्‍या महत्त्वाकांक्षेचे तीन टप्पे आहेत.  माओ त्से तुंग यांच्या अस्तानंतरचा चीन अधिक भांडवलशाही आणि उदार बनत गेला आहे. 1980 नंतर जगात बदललेल्या वातावरणाचा कोणत्या राष्ट्राने अधिक फायदा घेतला असेल तर तो स्वतःला साम्यवादी म्हणवणार्‍या चीनने! त्यांनी  समाजवादाची आणि साम्यवादाची वस्रे काढून टाकली आणि उघडउघड भांडवलशाहीचा पुरस्कार केला. जगातील अनेक भांडवलदारांना आपल्या देशात उद्योगउभारणीसाठी चीनने पायघड्या घातल्या. त्यातून चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर संरचनात्मक व्यवस्था तयार झाली. अनेक लघु, मध्यम व मोठे उद्योग उभे राहिले. आपण तयार केलेली उत्पादने जगाच्या बाजारपेठेत एखाद्या शस्राप्रमाणे सोडून जगातील मोठमोठ्या सत्तांना त्यांच्याच बाजारपेठेत पाणी चाखायला लावण्याचे काम चीनच्या अर्थव्यवस्थेने केले. या पहिल्या टप्प्यामुळे चीनची लालसा व महत्त्वाकांक्षा वाढत गेली. चीनने आपल्या सत्ताकांक्षेचा पुढचा टप्पा सुरु केला तो सबंध जगाला हादरवून सोडणार्‍या ‘कोरोना’ विषाणूने. सबंध जगामध्ये गोंधळ आणि अराजक निर्माण करणे हा यामागचा हेतू होता. त्यात त्याला यश आले आहे. आज अमेरिकेसारखा महासत्ताक देशही संभ्रमित, गर्भगळीत झालेला दिसतो आहे. अमेरिकेसारखी प्रभावी व्यवस्थाही जीवित व वित्तहानी रोखण्यात अपयशी ठरली आहे. हीच गोष्ट इटली, रशिया, फ्रान्स, जर्मनीमध्येही दिसून आली आहे. आशिया आणि आफ्रिकेतील छोट्या राष्ट्रांची तर आपण गणतीच करु शकत नाही. या टप्प्यात चीनला जगातील पराभूत महासत्तांचे-देशांचे अर्थकारण ताब्यात घ्यावयाचे आहे आणि भौगोलिक दृष्टीने विस्ताराची पावले टाकावयाची आहेत. तिसर्‍या टप्प्यात चीनचा हा साम्राज्यवाद अधिक आक्राळविक्राळ रुप धारण करेल आणि जगातील अनेक राष्ट्रांना तो भंडावून सोडेल, अशी भयकारी भाकिते मागील काही काळात वर्तवली जात आहेत. तेव्हा भारताने अधिक दक्ष आणि सज्ज असणे अगत्याचे असले तरीही आपल्या मोदी सरकारची धोरणदिशा चुकते आहे. सरकारचा पाय फाटक्यातच पडतो आहे. ‘कोरोना’ने तोंड फिरवले, आक्राळविक्राळ रुप धारण केले ते त्यामुळेच. त्याचाच फायदा चीन घेवू पाहतो आहे.