परतीच्या पावसाने केरळला मोठाच तडाखा दिला आहे. वादळी वार्‍यासह अतिमुसळधार पावसामुळे केरळमधील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोट्टयम, इडुक्की या जिल्ह्यांच्या सीमेवरच्या पर्वतीय भागात दरडी कोसळल्या आहेत. कोट्टायममध्ये 13, तर इडुक्कीमध्ये 8 जणांना जीव गमवावा लागल्याची प्राथमिक माहिती आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अशी ही भीषण स्थिती निर्माण झाली आहे. अर्थात अतिवृष्टी, महापूर हे मानवासाठी नवे नाहीत. मात्र, यंदाची भयावहता खूपच जास्त आहे. हवामान बदलांचे दुष्टचक्र सुरू झाल्याचीच ही नांदी म्हणावी लागेल. निसर्गाच्या कोपामुळे संपूर्ण खरोखरच जग हादरून गेले आहे. महाराष्ट्रातील महापुरापासून जगाच्या विविध देशांमधील या भीषण संकटांपर्यंत अनेक ठिकाणी हाहाकार उडालेला असतानाच ‘नासा’ या अमेरिकी अंतरिक्ष संशोधन संस्थेने नुकतीच   घाबरवून सोडणारी एक बातमी जगाला दिली आहे. सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि अन्य ग्रहांच्या हालचालींबाबत ‘नासा’कडून सुरू असलेल्या एका संशोधनातून ही माहिती उजेडात आली आहे. ‘नासा’ने असा दावा केला आहे की, सौरमंडलात असे काही बदल होणार आहेत, की त्यामुळे संपूर्ण जगात हाहाकार उडेल. हे नुकसान साधेसुधे नसेल तर पृथ्वीच्या अस्तित्वालाच त्यामुळे धोका उत्पन्न होईल. निसर्गाच्या या तांडवामुळे संपूर्ण जग समुद्राच्या पाण्यात बुडून जाऊ शकते. विशेष असे की, हे संकट शे-दोनशे वर्षांनंतर नव्हे तर अवघ्या नऊ वर्षांनी येणार आहे, असा ‘नासा’चा अंदाज आहे. तो खरा ठरेल, अशाच अलीकडील नैसर्गिक घटना घडत आहेत. जगातील शास्त्रज्ञ त्याची कारणे शोधत आहेत.  ‘नासा’ने अशीच काही कारणे शोधली आहेत. ‘नासा’च्या अभ्यासानुसार, 2030 मध्ये समुद्राला येणार्‍या महाभरतीमुळे येणारा पूर अत्यंत विनाशकारी असेल. या घटनेचे मुख्य कारण असेल चंद्राचे आपल्या स्थानावरून ढळणे. पृथ्वीपासून सुमारे 3 लाख 50 हजार किलोमीटर दूर असणारा चंद्र आजपासून अवघ्या नऊ वर्षांनी समुद्रकिनार्‍यावरील प्रदेशात प्रचंड उलथापालथ घडवून आणणार आहे, असा इशाराच ‘नासा’ने दिला आहे. ‘नासा’च्या भाकीतानुसार 2030 पर्यंत जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी बरीच वाढलेली असेल. त्याचवेळी चंद्र आपल्या स्थानावरून ढळल्यामुळे समुद्राला वारंवार भीषण भरती येईल आणि ती इतकी प्रचंड असेल, की त्यामुळे समुद्रकिनार्‍यांलगत हाहाकार उडेल. जलवायू परिवर्तनाशी संबंधित ‘नेचर’ या नियतकालिकात नासाचा हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. जर ‘नासा’चे हे भाकित खरे ठरले तर समुद्रकिनार्‍यावरील प्रदेशांमध्ये येणारा पूर वर्षातून एकदा किंवा दोनदा नव्हे तर दरमहा येईल आणि तोही पहिल्यापेक्षा कितीतरी नुकसानदायक असेल. कारण ज्या-ज्यावेळी चंद्राच्या कक्षेत अगदी छोटासा बदल होईल, त्या-त्यावेळी मोठ्या भरतीमुळे येणारे पूर प्रचंड असतील. चंद्राच्या हालचालींमुळे पृथ्वीवर येणारे पूर अत्यंत प्रलंयकारी असतील. ज्यावेळी दररोज समुद्रात उसळणार्‍या लाटांच्या तुलनेत त्या दोन फूट अधिक उंच उसळू लागतात, तेव्हा अशा प्रकारचे पूर समुद्रकिनार्‍यावरील प्रदेशात येतात. समुद्रातील या उंचच उंच लाटांमुळे घरे आणि रस्ते पाण्याखाली जातात आणि दैनंदिन जीवनावर प्रतिकूल परिणाम होतात. जागतिक तापमानवाढ आणि चंद्राच्या हालचालींमध्ये होणारे बदल अशा प्रकारचे संकट पृथ्वीवर घेऊन येणार आहेत. शास्त्रज्ञाचे म्हणणे असे की, चंद्र दर 18.6 वर्षांनी आपल्या जागेत किंचितसा बदल करतो. या संपूर्ण कालावधीपैकी अर्धा काळ तो पृथ्वीच्या लहरी दाबून टाकतो; परंतु अर्धा काळ पृथ्वीवरील लहरी अधिक तीव्र करतो. त्यांची उंची वाढवतो आणि हेच प्रचंड धोकादायक असते. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असला तरी चंद्राच्या प्रत्येक हाल चालीचा पृथ्वीवर परिणाम होतो. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीवर बराच परिणाम घडवून आणते. त्यामुळे पृथ्वीच्या स्वतःच्या आसाभोवती फिरण्याच्या गतीवरही परिणाम होतो, हे खरेच; पण त्याचवेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा चंद्राच्या कक्षेवरही परिणाम होतो. असो; पण आता नऊ वर्षांनंतर म्हणजे 2030 मध्ये चंद्र आपल्या जागेपासून ढळेल आणि मग त्याचा पृथ्वीवर आणखी मोठा अनिष्ट परिणाम होईल. पृथ्वीवर प्रलयाची परिस्थिती निर्माण होईल. भरतीच्या वेळी समुद्रात उसळणार्‍या लाटांची उंची तीन ते चार पटींनी अधिक असेल. महाप्रलंयकारी पूर 2030 पर्यंत बर्‍याच प्रमाणात वाढतील. जसजशी चंद्राची स्थिती बदलत जाईल, तसतसे हे हानिकारक पूर समुद्रकिनार्‍यावर राहणार्‍या लोकांसाठी अधिकाधिक धोकादायक ठरतील. ‘नासा’चे हे भयकारी भाकीत खरे व्हावे, अशीच आजची सार्वत्रिक स्थिती आहे. सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील कोकणासह काही भागातही यंदा संकटांचा डोंगर कोसळला आहे. सतत अतिपाऊस पडत राहिल्याने डोंगर-टेकड्यांवर पाणी मुरुन आतील स्तर ठिसूळ बनतो आणि दरड कोसळणे, भूस्खलन यांसारख्या घटना घडतात; तर पाणी वाहून जाण्याच्या प्रमाणापेक्षा पडणार्‍या पावसाचे प्रमाण अधिक असल्याने नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरते. केरळ राज्याच्या नाकातोंडात आता असेच पाणी शिरले आहे. परतीच्या पावसाने तिकडे हाहाकार माजविला आहे. ही धोक्याचीच घंटा असून विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मदतीने या संकटावर मात करणे गरजेचे, तातडीचे झाले आहे.  या एकूण पार्श्‍वभूमीवर तथाकथित विकासाची दिशा  बदलावी लागणार आहे. देवाची जागा घेवू पाहणार्‍या मानवाने आतातरी जागे व्हावे लागणार आहे.