भाकरी वेळेवर फिरवली नाही तर ती करपते; हे जसे खरे तसे बेरजेच्या राजकारणासाठी नेतृत्व बदल करणेही वेळप्रसंगी गरजेचे असते. हे ध्यानी घेवूनच की काय, भाजपने आता गुजरातमध्ये अचानकच बदल केला. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या हाती निरोपाचा नारळ दिला! शनिवारी हे घडले आणि त्याच्या दुसर्याच दिवशी भूपेंद्र रजनीकांत पटेल हे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विसावले! त्यामुळे भाजपचे भलेभले नेतेही चक्रावले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन आधुनिक चाणक्यांच्या राजकीय खेळीच तशा चक्रावणार्या आणि भेदरवणार्या आहेत. गुजरातमध्ये विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावे लागल्यानंतर आता पुढचा नंबर कोणाचा? असा प्रश्न राजकारणामध्ये स्वाभाविकच चर्चेला आला आहे. चर्चा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याविषयीही आहे. हे खरेच की, मध्य प्रदेशमध्ये ते मजबूत आणि ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात; पण मागील काही काळातील अनुभव ध्यानात घेता हीच पात्रता काही भाजप नेत्यांना अडचणीची ठरली आहे. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांसारख्या जनसंघापासून भाजपला राष्ट्रीय पातळीवर ओळख व स्थान मिळवून देणार्या नेत्यांबाबत नरेंद्र मोदी यांच्या काळात काय झाले; हे आपण पाहिलेच आहे. अलीकडेच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मोठ्या विस्तारातून अनेक मातब्बर नेत्यांचा पत्ता कट केल्याचेही अनुभवास आले आहे. यात प्रामुख्याने रवीशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, रमेश पोखरियाल निशंक यांचा समावेश होता. हे सर्व नेते तब्बल तीन ते चार दशकांपासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. विशेष असे की, मोदी सरकार दुसर्यांदा सत्तेत आल्यापासून हे नेते म्हणजे मोदी सरकारचा जनते समोरील चेहरा होते. सरकारच्या विविध योजनांविषयीची माहिती देण्यापलीकडे जाऊन विरोधकांवर प्रहार करण्यामध्येही त्यांनी सशक्त भूमिका बजावली होती. असे असूनही या नेत्यांच्या जागी केंद्रीय कॅबिनेटमध्ये नवीन चेहरे आणले गेले. यामागे आगामी विधानसभा निवडणुकांचे राजकारण आहेच; पण त्यासाठी मातब्बर नेत्यांचा पत्ता कापणे हा प्रकार अनेकांना धक्कादायक ठरला आहे. मुद्दा हाच की, धक्क्यांवर धक्के देण्यामध्ये मोदी आणि शहा हेच आघाडीवर राहिले आहेत. त्यांनी आपल्या विरोधकांना जसे धक्के दिले, तसे स्वकियांनाही दिले आहेत. राज्य सरकारच्या निर्णयात फारशी ढवळाढवळ न करण्याची भाजपची कधी काळी भूमिका राहिली. अगदी 2014 पर्यंत भाजपमध्ये ही रीत पाळली गेली. कुणी, कितीही विरोध किंवा टीका केली तरी भाजपचे सरकार असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री अथवा मंत्री बदलण्याचे कटाक्षाने टाळले गेेले; पण मागील सहा महिन्यांमध्ये भाजपमध्ये आक्रित म्हणावे असेच घडले. या सहा महिन्यांत भाजपने विविध राज्यांचे पाच मुख्यमंत्री बदलले! उत्तराखंडमध्ये मार्च महिन्यात त्रिवेंद्रसिंह रावत यांना हटवून तिरथसिंह रावत यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली. लोकसभा सदस्य असलेल्या रावत यांना सहा महिन्यांच्या मुदतीत विधानसभेवर निवडून येणे शक्य नसल्याने अवघ्या 114 दिवसांमध्येच रावत यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यानंतर पुष्कर सिंह धामी यांची जुलैमध्ये मुख्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली. चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत उत्तराखंडमध्ये भाजपने दोन मुख्यमंत्री बदलले. तर, आसामध्ये यावर्षी मे महिन्यात भाजप पुन्हा सत्तेत येताच अगोदरचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना बदलून हेमंत बिश्वा सरमा यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली गेली. नवल म्हणजे चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषविताना दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला त्याच दिवशी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना राजीनामा देण्यास पक्षाने भाग पाडले; बसवराज बोम्मई यांना तिथे मुख्यमंत्रीपदावर बसवले! खरे तर, बी.एस. येडियुरप्पा हे कर्नाटकच नाही तर दक्षिण भारतातील भाजपचे लोकप्रिय नेते आहेत. तरीही त्यांना मुख्यमंत्रीपद सोडण्यास भाग पाडले. या निर्णयामुळे येडियुप्पा नाराज झाल्याचे दिसले. राजीनामा देताना त्यांनी मनातील भावना व्यक्त करताना काढलेले उद्गार तसे संकेतही देवून गेले. ‘जेव्हा चारचाकी नव्हत्या तेव्हा दिवसदिवसभर सायकलीवरुन फिरुन पक्षासाठी मी काम करत होतो. शिमोगातील शिकारीपुरामध्ये काही भाजप कार्यकर्त्यांना घेऊन मी पक्ष उभारणी केली’, असे त्यांनी म्हटल्याचे देशाने ऐकले. राजकारणामध्ये मनाविरुद्ध उचलबांगडी केली जात असताना अशा प्रकारची खंत व्यक्त करणे ही बाब नवीही नाही. नव्हे आता गुजरातमध्ये अचानक विजय रुपाणी यांची हकालपट्टी केल्यानेही रुपानी आणि त्यांच्या समर्थकांची नाराजी वाढणार आहे. गुजरातमध्ये पुढच्याचवर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशावेळी रुपानी यांचा रुसवा भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो का, हे पाह्यचे; पण कुणाच्या रुसव्या-फुगव्याची फारसी फिकीर न करता भाजप वरिष्ठांनी काही मुख्यमंत्री कपडे बदलावेत, तसे सहज बदलेली आहेत. मुख्यमंत्री बदलताना कोणतीही करणे दिलेली नाहीत. तर, पक्षाचा आदेश असल्याचे प्रत्येक पायउतार होणार्या मुख्यमंत्र्याने सांगितले आहे. आश्चर्य असे की, प्रत्येकाने नरेंद्र मोदी यांचे जाता जाता आभार मानले आहेत. भाजपमध्ये मोदी यांचे महत्व आणि महात्म्य कायम आहे. येत्या काळातही त्यात फारसा फरक पडणार नाही. कारण तशी स्वतः मोदी आणि शहा यांनी काळजी घेतलेली दिसते. असो; पण त्यांच्या या खेळीमुळे काँग्रेसच्या ‘दिल्ली दरबारी’ राजकारणाची येथे आवर्जून आठवण होते. कधी काळी काँग्रेसमध्येही हेच चालायचे. कुठल्याही एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाच वर्षं पदावर राहील, याची अजिबात खात्री नसायची. बाकी कुठला नसला तरीही मोदी आणि शहा यांनी काँग्रेसचा हा आदर्श घेतलेला दिसतो. त्यामुळे काही त्यांना मनोमन धन्यवादही देतील. असो. पण काँग्रेसने ट्विटरवर...‘सीएम’ नही ‘पीएम’बदलो..ही मोहीम सुरु केली आहे. असो; पण ‘पीएम’ बदलण्यासाठीच काँग्रेसनेही भाकरी फिरवणे, पक्षाला नवा कार्यक्षम राष्ट्रीय अध्यक्ष देणे गरजेचे आहे, असे काहींचे म्हणणे असू शकते. शेवटी हेच की, राजकारणात ‘भाकरी फिरवण्या’ची चर्चा कायमच रंगणारी आहे. प्रश्न भाकरी फिरवण्याचा असतोच; पण त्यामुळे पुढे काय परिणाम होणार, हाही एक उत्सुकतेचा मुद्दा उरतो.