जनसामान्यांना कठीण काळात दिलासा देण्याऐवजी त्यांना महागाईचे चटके देण्याचा प्रयत्न होत आहे. इंधन दरात सातत्याने होत असलेल्या वाढीचा परिणाम सर्वच वस्तूंच्या किमतीत झालेल्या 30 ते 50 टक्के वाढीच्या रूपाने समोर आला आहे. पेट्रोल आणि डिझेल प्रमाणेच गॅस सिलिंडरचेही दर आंतरराष्ट्रीय दरांच्या आधारे निश्‍चित व्हावेत, अशीच ही योजना आहे. काही महिन्यांपासून हेच धोरण सरकार वेगाने पुढे नेत असल्याचे दिसत आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत आणि त्याचवेळी केंद्र सरकार स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान सातत्याने कमी करत चालले आहे. एकूणच जनसामान्यांना दुहेरी दणका दिला जात आहे. स्वाभाविकच सर्वसंबंधीत रडकुंडीला आले असतानाच आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात ‘एसटी’ने तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एसटी’च्या तिकिटामध्ये तब्बल 17 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या तिकीटवाढीमुळे आता ‘एसटी’चा प्रवास महागणार असून त्याची अधिकतर झळ जनसामान्यांचाच बसणार आहे. कारण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ‘लाल परी‘ ही याच लोकांची अधिकची प्यारी आहे. कौतुकाची आणि अभिमानाची बाब अशी की, ‘गाव तिथे एसटी’ हा घोष करीत ‘लाल परी’ गेली 63 वर्षे राज्याच्या कानाकोपर्‍यात अखंडपणे मुक्त संचार करत आहे. 1948 साली ‘बॉम्बे रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’ या नावाने सुरू झालेली ही सेवा नंतर 1960 मध्ये ‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ’ या नावाने अस्तित्वात आली आहे. आजघडीला 18,400 बसेस आणि जवळपास 25 हजार कर्मचारी ‘एसटी’मध्ये कार्यरत असून ही ‘लाल परी’ दिवसात किमान 6 लाख किमी प्रवास करते. 609 बस स्थानके आणि 18 हजार बस तसेच काही हजार एकर जागा अशी संपत्ती असलेली ही ‘लाल परी’ आता तोट्याच्या संकटात गटांगळ्या खात आहे. वाढते इंधनाचे दर, थकीत सरकारी अनुदान, प्रवाशांची घटलेली संख्या, कर्मचार्‍यांबरोबरचे वेतन करार, ’कोरोना’मुळे प्रवासी वाहतुकीवर असलेले निर्बंध, टाळेबंदी अशा विविध कारणांमुळे ‘एसटी’ महामंडळ प्रचंड तोट्यात गेले आहे. ‘एसटी’ महामंडळाचा हा तोटा तब्बल 7 हजार कोटींच्या घरात आहे. त्यावर उपाय म्हणून निरनिराळे प्रयत्न केले जात असले तरी ते अपुरे पडत आहेत. यामुळेच ‘एसटी’ महामंडळाने ऐन दिवाळीच्या तोंडावर तिकीटाच्या दरात 17.5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयामुळे ‘एसटी’ प्रवास हा किमान 5 रुपयांनी महागणार आहे. पहिल्या सहा किलोमीटरच्या प्रवासासाठी दरवाढ करण्यात आली नसली तरी त्यानंतरच्या ‘एसटी’च्या प्रत्येक टप्प्याला ही दरवाढ लागू असणार आहे. या दरवाढीमुळे लांब पल्ल्यांच्या प्रवास हा महागणार असून दोन प्रमुख शहरांतील प्रवासासाठी 50 ते 100 रुपये हे जास्त द्यावे लागणार आहेत. ‘एसटी’ महामंडळाने ही दरवाढ करताना रातराणी म्हणजे ‘एसटी’च्या रात्रीच्या प्रवासाचे दर काहीसे कमी केले आहेत. यामुळे दिवसा आणि रात्री धावणार्‍या साध्या ‘एसटी’ प्रवासाचा तिकीटाचा दर हा जवळपास समान असणार आहे.  याआधी जून 2018 मध्ये ‘एसटी’ने दरवाढ केली होती. आता तब्बल 3 वर्षांनंतर ‘एसटी’ महामंडळाने दरवाढ केली आहे. असो; पण दरवाढीचा दोष नेमका कोणाला द्यायचा हा प्रश्‍न आहे. नियोजनाचा अभाव, भ्रष्टाचार आदी कारणामुळे ‘लाल परीला’ सततच्या तोट्याचे तोंड बघावे लागते, हा आरोप आहेच; पण वाढत्या तोट्यामुळे ‘एसटी’ अधिकारी, कर्मचार्‍यांच्या पगाराचा प्रश्‍न निर्माण व्हावा, हे काही चांगले लक्षण नाही. माहिती अशी की, कर्मचार्‍यांना वेतनापोटी दरमहा 300 कोटी रुपये या महामंडळला उभे करावे लागतात. या रकमेची जमवाजमव करतानाही म्हणे व्यवस्थापनाच्या नाकीनऊ येतात. खर्चाला लगाम घालून उत्पन्नात भर घालावी, हा विचार स्विकार्ह असला तरी अलीकडे डिझेल, पेट्रोलचे दर सातत्याने वाढत आहेत. ‘एसटी’ महामंडळाच्या ताफ्यात डिझेलवर धावणार्‍या 17 हजार बसेस असून डिझेलवर होणारा खर्च हा एकूण खर्चाच्या 34 टक्के इतका होता. वाढत्या डिझेल किमतीमुळे तो आता 38 ते 40 टक्क्यांवर पोहोचला आहे. डिझेलवर होणार्‍या कोट्यावधी रूपयांच्या खर्चाचा गांभीर्याने विचार करत डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एसटी’च्या ताफ्यात लवकरच ‘सीएनजी’ बरोबरच इलेक्ट्रीक, ‘एलएनजी’ अशा पर्यावरणपूरक इंधनावर धावणार्‍या बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे भविष्यात इंधनावरील खर्चाच्या बचतीबरोबरच पर्यावरणपूरक प्रवासाला ‘एसटी’ प्राधान्य देणार असल्याची माहिती परिवहनमंत्री तथा ‘एसटी’ महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी या आधीच दिली आहे. त्याचे स्वागत करता येईल. कारण पेट्रोल आणि डिझेलवर चालणार्‍या वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक गाडी चालविण्यासाठी येणारा खर्च आणि देखभाल खर्च निश्‍चितच कमी आहे. प्रदूषणही होत नाही. गेल्या तीन-चार वर्षांत भारतात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या आणि पर्यायही वाढले आहेत. देशातील अनेक अग्रगण्य वाहननिर्मिती कंपन्यांनी या क्षेत्रात उडी घेतली आहे; परंतु ज्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने बाजारपेठेत यावीत, असे सरकारला वाटते त्या मार्गात अजूनही बरेच अडथळे आहेत. यातून वाट काढत ‘लाल परी’ प्रगतीची भरारी घ्यायची आहे. तूर्तास तर तिकीट दरात वाढ करुन सर्वसामान्य प्रवाशांना धक्का दिला आहे. त्याचवेळी ‘एसटी’ कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ करून त्यांना दिवाळीचा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कर्मचार्‍यांना त्यावर समाधान मानावे लागणार आहे. असो; पण ‘लाल परी’चा थाट कायम राखण्यासाठी, वाढविण्यासाठी कायमचा ठोस