या वं...गणराया यावं!...तू सुखकर्ता आणि दुःखहर्ता...म्हणूनच तर आम्ही दुःखी लोक तुझ्याकडून हक्कानं सुखाची अपेक्षा करतो...होय देवा आम्ही दुःखीच! त्यात शेतीवर पोट असलेल्या लोकांच्या वाट्याला आलेले दुःख बक्कळ आणि भंयकर! शेतकरी-कष्टकर्‍यांना सुख लाभंल तरी कसं? शेत पिकलं अन् पिकलेलं चांगल्या दामानं बाजारात विकलं, तरच  संसारात सुख डोकावतं. नसता, दुःख सावलीसारखंच त्यांच्या साथीला सतत राहातं!...तुला सांगतो गणराया, ते आपलं मोदी महाशय लोकांना सुखाचं दिस दावतो म्हणालं; पण सात सालं सरली तरी सुखाचं मुख दिसलंच नाही! तरीही हे सरकार त्याविषयी देतेय ग्वाहीवर ग्वाही! अमूक करू,.. तमूक करू! पण होत काहीच नाही!...होय, सरकारनं एक केलं...मूठभर भांडवलदारांच्या हितासाठी धोरण राबवलं. देशाची अर्थात जनतेची मालमत्ता परस्पर विकण्याचं, भाड्यानं देण्याचं तथाकथित विकासाचं नवं सूत्रं अंगिकारलं!...त्यामुळं भांडवलदार गालातल्या गालात हसलं; पण शेतीवर पोट असलेल्या लोकांचं मन मात्र खचलं! करायचं तरी काय देवा...?...आई जेवू घालणा अन् बाप भीक मागू देईना, अशीच अवघी शेतकरी -कष्टकर्‍यांची गत! सारी दुनिया शेतकर्‍यांना म्हणतीय अन्नदाता; पण त्या सार्‍या कोरड्याच बाता!...गणेशा तूही पाहतोस की, अन्नदाता कशा खातोय परिस्थितीच्या लाथा!..निसर्ग दगेबाज आणि सरकार थापेबाज!...मग तूच सांग, कसा चढेल शेतकर्‍यांच्या संसाराला साज? सरकारी धोरणामुळंच जन आलंय गोत्यात...बाप्पा तूच बघ आता, काय चाललंय या देशात? शेतकरी-कष्टकरी भिकेला लागलाय!...तसा कंपन्यांतून, कारखान्यांतून कामाला असलेला कामगार, नोकरदारही वाटेवर आलाय!...त्यातच ‘कोरोना’ नावाचा महाभंयकर विषाणू अचानकच डोकावलाय!...त्याच्या लाटामागून लाटा येताय. ‘कोरोना’ची आता तिसरी लाट येणारंय म्हणं!...त्यामुळंच पुन्हा विस्कळीत होणारंय जनजीवन! अशा मुहूर्तावर तुझं होतय आगमनं! गतसाली जे झालं, तेच आताही अनुभवणं! तिसर्‍या लाटेची चर्चा सुरू झाल्यानं घरामध्ये सजावटीसाठी, बाप्पा तुझ्यासाठी काही वस्तू आणताना पुन्हा धास्तावनं!...गजानना, आम्ही म्हणतो, श्रद्धायुक्‍त अंत:करणानं तुला शरण जाणं हीच खरी पूजा! शेवटी तुला माहितेय की, कोणाला केव्हा अन् किती काय द्यायचं! असो; पण हे देताना सरकारलाही थोडीशी अक्कल दे!....गणराया तू बुद्धीचा देव आहेस. म्हणूनच...सरकारच्याही सार्‍या खतखोडी तू जाण -तोस. मागं याच सरकारनं नोटबंदी, ‘जीएसटी’चा निर्णय घेतला. घेईना का! सरकारला जनहिताचं निर्णय घ्यावाच लागतो; पण मोदी सरकारचं निर्णय अवसानघातकीच ठरतो! नोटबंदी, ‘जीएसटी’च्या निर्णयामुळं झालं काय, तर देशातला रोजगार घटला! हे सत्य सरकारही जाणतं; पण ते मान्य करताना कण्हतं! हेही खरंच की, या सरकारला भावनेचं राजकारण चांगलंच जमतं! धर्म भावनेच्या राजकारणाला फोडणी देतच या सरकारनं धर्मनिरपेक्षवाद्यांची चिंता वाढविली!..पण करणार काय? देशातील विरोधकांनंही घेतलाय गोगलगायीसारखा पोटात पाय!...देशात मोदी-शहा या दोन दाढीधार्‍यांची भितीच तशी. ‘चूप बैठ नही, तो कान कापूंगा!’ हीच त्यांची राजकीय नीती!...उठसूठ ते दाखवितात ‘ईडी’ची भीती! चौकशीच्या भितीपायीच विरोधक हतबल झाले; घाबरूनही गेले!...देवा...श्री गणेशा, त्यांना कळत नाही का कोणत्याही संकटाच्या वेळी घाबरुन जावू नये. हिमतीनं परिस्थितीचा सामना करावा! संकटांपासून तोंड लपविलं म्हणून संकटं थांबत नाहीत, तर त्यांचा आमनेसामने मुकाबला केला, तरच ते दूर पळतं! असो; पण एक खरंच की,  बाप्पा...अवघ्या गुणांचा गणपती तू!...तूच गणनायक! राक्षसांमध्ये अहंतासुर, कामासुर, क्रोधासुर, मायासुर, लोभासुर आदींना ठार मारण्याची कर्तबगारी तुझीच!..गणेशा...अहंतासुर म्हणजे...अहंकाराचं, कामासुर म्हणजे कामाचं, क्रोधासुर म्हणजे क्रोधाचं, मायासुर म्हणजे मायेचं तर लोभासुर म्हणजे लोभांचं प्रतीक नाही का! हे सगळे मनुष्याचं शत्रूच! त्याला ठार करावंच लागेल. त्याशिवाय मानवी जीवनात सुख, शांतीचा, समृद्धाची शिरकाव होणार कसा?....गजानना हेही खरं की, ज्ञान, सुख, धन, वैभव, ऐश्‍वर्य या सार्‍याची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर प्रत्येकाला सत्याचा मार्ग चालावा लागतो. महत्वाचं म्हणजे माता-पित्याचा आशीर्वाद मिळवावा लागतो. शिव-पार्वतीपुत्रा...त्याबाबत तूच आदर्श घालून दिलास ना!...हो... तुझ्या पृथ्वीप्रदक्षिणेची कथा आम्हाला ठाऊकंय!.. तुझा बंधू कार्तिकस्वामी पृथ्वीप्रदक्षिणा करून येईपर्यंत तू काय केलं, तर माता-पित्याला प्रदक्षिणा घातलीस आणि तीच पृथ्वीप्रदक्षिणा मानलीस!...त्यातून तुला तुझ्या भक्तांना हेच सांगायचं होतं की, जो माता-पित्याची मनोभावे सेवा करतो, त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होतं! त्यालाच पृथ्वीवरील सगळं सुखं लाभतं!..  विनायका...हेही खरंच की, तू श्रद्धा आणि विश्‍वास यांचा संगम आहेस. जगण्यासाठी श्रद्धा आणि विश्‍वास हवाच; पण तोच आता मानवी मनामनातून ढळू लागलाय. म्हणूनच माणूस माणसांपासून पळू लागलाय!....‘कोरोना’च्या काळात माणूस माणसांपासून दूर पाळणं अन्  अश्रू गाळणं आता अतीच झालंय!... हे कुठंतरी थांबलं पाहिजे.!...सुखकर्त्या, दुःखहर्त्या...तूच हे सारं थांबव!...माणसांमाणसांत श्रद्धा, विश्‍वास वाढू दे!.. वाढू दे...देश,धर्म-जातीतील प्रेम अन् जिव्हाळा! ..येऊ दे या सरकारलाही गोरगरिबांचा कळवळा!.. 

फुलू दे या देशात सुख, शांती अन् समृद्धीचा मळा...!...तू आज आमच्याकडं येतोस तर, ये!..जरूर ये!!...पण आल्यावर आम्हा दुखितांना सुख देण्याचा  प्रयत्न जरूर कर!...आम्हा दुबळ्यांची फाटकी झोळी भरं!..तातडीचं म्हणजे ‘कोरोना’चा कायमचाच नाश कर!....अजून काय मागू गौरीनंदना..?...तू तसाही मनकवडा आहेसच....!