आ ज 2 ऑक्टोबर. महात्मा गांधीजींचा जन्म दिन. हा विशेष दिन देशभर नव्हे, तर जगभर साजरा केला जातो. जगातील दोनशेवर देश हा दिवस ‘अहिंसा दिन’ म्हणून पाळतात. विविध पातळीवरून गांधीजींच्या विचारांचा जागर करतात. गांधीजींनी सत्य, अहिंसा, शांती, सत्याग्रह, त्याग, सेवा, समर्पण व मानवतेच्या विचारांचा आदर्श संपूर्ण जगापुढे ठेवला. गांधीजींच्या विचारांचा प्रभाव आपल्या रोजच्या जगण्यातून प्रकर्षाने जाणवतो. म्हणूनच जगाच्या पाठीवर सर्वत्र मानवतेचे प्रतीक म्हणून गांधीजींचा आणि त्यांच्या विचारांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला जातो. गांधीजींचे समग्र विचार, त्यांची जीवननिष्ठा व त्यांचे जीवनदर्शन याबाबत सर्वांनाच कमालीचे आकर्षण, औत्सुक्य व आदर आहे. या जगात कमी का असेनात; पण काही माणसं आजही गांधी विचारांनी प्रेरित झालेली आहेत. जे चांगले आहे, त्याचे स्वागत करून वाईटांचा निषेध करण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे. जगाला योग्य दिशा देण्यासाठी त्यांची सततची धडपड चालू असते. हा अनुभव असला तरी बहुतेक माणसं गांधी विचारांपासून दूर असलेली दिसतात.  सत्ता, संपत्ती, पद आणि खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लागलेली माणसं नीतिमूल्यांना पायदळी तुटवतात. सत्ता, संपत्ती व पदप्राप्ती हेच त्यांच्या जीविताचे ध्येय बनतेे. प्रेम, सद्भावना, माणसुकी, बंधुभाव, त्याग, सेवा, परोपकार ही उदात्त जीवनमूल्ये यांच्या हृदयातून नष्ट होतात. म्हणूनच देश, समाज आणि मुख्य म्हणजे माणूस माणसांपासून दुरावतो. मागील वर्ष-दीड वर्षात ‘कोरोना’च्या काळात माणसातील हे दुरावलेपण आवर्जून दिसून आले. माणसाच्या जीवाचे जणू मोलच राहिलेले नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे आपण अनुभवले. यामध्ये केंद्र सरकारही सोयीसोयीनेच वागले. केंद्रातील विद्यमान सत्ताधारी सत्याची नव्हे तर असत्याचीच पाठराखण करतात, हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. तरीही ते गांधीजींचे नाव घेतात. राजकीय नेते असोत की, इतर क्षेत्रातील पुढारी असोत, तेे सारे जाहीर बोलताना ‘गांधीवादा’चा जयघोष करतात; पण प्रत्यक्ष वागताना त्यांच्याकडून गळचेपी होते ती गांधी विचारांचीच!  त्यात आपल्याकडील भाजप नेते भलतेच ढोंगी. गांधी विचार सोयीस्करपणे स्वीकारण्याची भाजपची जुनीच सवय आहे. साधारणपणे 1980 च्या दशकात गांधीवाद स्वीकारलेल्या भाजपने पुढे कट्टर हिंदूत्त्ववादाला कुरवाळले! त्याच हिंदूत्त्ववादी विचाराचा अतिरेक करत सत्ताही बळकावली. सत्तेत आल्यानंतर त्यांनी सारे सोयीचेच निर्णय घेतले. देशाला हिंदूत्त्वाचा चेहरा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हिंदूतर समाज नाराज झाला. लोकशाही धोक्यात आल्याची भावाना आज अनेकांच्या मनात आहे. संसद, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि प्रसारमाध्यमे हे लोकशाहीचे चार स्तंभ म्हणून ओळखले जातात; पण हे चार स्तंभही आज संशयाने, गैरविश्‍वासाने डळमळू लागले आहेत.   त्यामुळे कट्टर गांधीवादी, लोकशाहीवादी अस्वस्थ असला तरी, जातीयवादी राजकारण्यांना त्याचे काही देणेघेणे नसावे. दोष द्यायचा कोणाला? कमी-अधिक प्रमाणात सर्वच राजकारणी आणि यंत्रणा संशयाच्या फेर्‍यात अडकलेली दिसते. प्रसारमाध्यमांना जनतेचे सच्चे मित्र म्हणून मानले जाते; पण या मित्रावरही आज डोळे झाकून विश्‍वास ठेवण्यासारखी स्थिती नाही. नवल असे की, न्याय देवताही आता ‘डोळस’ झाली असून ती जातीयवाद्यांच्याच पारड्यात न्यायाचे झुकते माप घालते की काय, अशी शंका काहींच्या मनात डोकावते. असो; पण मुद्दा न्यायाचा आहेच, तसा तो सरकारच्या नित्तीमत्तेचाही आहे. सरकारचे प्रमुख म्हणून मोदी महाशय जगाला नितीमत्तेचे धाडे देतात. गांधी विचारांची जपमाळ ओढतात! ‘गांधी विचारांना साक्ष ठेवूनच आम्ही आमच्या देशात स्वच्छता, सद्भावना आणि सर्वंकष विकास घडवून आणत आहोत,’ असे छोती फुगवून सांगतात; पण प्रत्यक्षात अनुभव त्याच्या उलट येतो.  हे खरेच की, एक गोष्ट चुकीची असूनही जोरात आणि सतत सांगत राहण्याची कला मोदी महाशयांनी चांगलीच अवगत केली आहे. त्यालाच तर ‘गोबेल्स निती’ म्हणतात. त्याच नितीचा अवलंब करून भारतीयांना पुनःपुन्हा भूलविले, झुलविले जाते. सत्याला असत्य म्हणून तर, असत्याला सत्य म्हणून सांगण्याचा सातत्याने सायीस्करपणे प्रयत्न होतो. अशा स्थितीत भारतीय राजकारणात गांधीवाद कुठे शोधायचा? आजची परिस्थिती आणि गांधीजींच्या वेळेची परिस्थिती यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे, हे खरेच; पण ‘काहींची प्रगती की सर्वांची प्रगती’ हा प्रश्‍न आजही ताजाच आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ करू म्हणणारे आणि ‘आत्मनिर्भर’तेची  जपमाळ ओढणारे हे तर पक्के ढोंगीच आहेत. वेळ पाहून ते गांधी नावाची जपमाळ ओढतात. मात्र, प्रसंगी गांधी विचारांनाच पायदळी तुडवितात! गांधीजींचा लढा गरिबातील गरीब व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठीचा, अशिक्षितांना सुशिक्षित बनविण्यासाठीचा होता; प्रत्येक गाव, समुदाय, कुटुंब आणि व्यक्तीला एक सन्मानाचे आयुष्य जगता यावे याची हमी देणारा त्यांचा संघर्ष होता! गांधीजी म्हणत की, ‘खरे अर्थशास्त्र सामाजिक न्याय, गरिबांचे कल्याण यावर भर देते. आर्थिक समानतेसाठी कार्य करणे म्हणजे भांडवलदार व श्रमिक यांच्यातील संघर्ष कमी करणे. जोपर्यंत आपण अशाप्रकारचा संघर्ष दूर करू शकणार नाही, तोपर्यंत अहिंसात्मक समाजाची कल्पना हे एक स्वप्नच राहील. आर्थिक समानतेचा मुख्य उद्देश प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी सर्व ती साधनसामग्री व संधी उपलब्ध असणे.’ गांधीजींनी आपल्या जीवन कार्यात मानवी कल्याणाला सर्वोच्च स्थान दिले. आज महात्मा गांधीजींची  जयंती साजरी करत असताना आपण मानवी कल्याण साधण्याची, जोपासण्याचीच शपथ घेतली पाहिजे. शेवटी ‘गांधीगिरी’ हाच जगाच्या उद्धाराचा, सुख-शांतीचा मार्ग आहे, हे आपण कायमसाठीच ध्यानात घेतले पाहिजे.