काही मुले स्वभावतःच शांत तर, काही खोडकर, दंगेखोर असतात हा भाग वेगळा; परंतु काही मुले संतापी असतात; ते दुःसाहसही करू शकतात.  धक्कादायक बाब अशी की, काही मुले गंभीर म्हणावे असे गुन्हेगारी कृत्य करतात. राज्यभरात सध्या चर्चेत असलेले प्राध्यापक डॉ. राजन शिंदे खून प्रकरणही असेच धक्कादायक ठरले आहे. सोमवार, 11 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास प्रा. शिंदे यांचा त्यांच्याच राहत्या घरी अत्यंत क्रूरपणे खून झाला. औरंगाबाद शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राजन शिंदे कार्यरत असून त्यांच्या खुनाने मराठवाडा हादरून गेला. या खुनाचा तपास करण्यासाठी प्रा. शिंदे यांचे निकटवर्तीय, कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी, महाविद्यालयातील कर्मचारी अशा सर्वांची चौकशी करण्यात येत होती. या हत्येप्रकरणाचा पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे. धक्कादायक म्हणजे प्रा. शिंदे कुटुंबातील अल्पवयीन सदस्यानेच ही हत्या केल्याचे पुढे आले आहे. इतकेच नव्हे तर, पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्रा. शिंदे आणि अल्पवयीन सदस्य यांच्यात वैचारिक मतभेद होते. करियर आणि शिक्षण याबाबत दोघांमध्ये खटके उडत होते. घटनेआधी रात्री दोघांमध्ये जोरात भांडण झाले आणि त्यांतून प्रा. शिंदे अल्पवयीन सदस्याला रागावले आणि तो राग मनात धरून खून झाला. खून करण्यासाठी त्याने गुन्हेगारी वेब सिरिज पाहिल्या. त्यातून त्याने खून करण्याचे ठरवले. यासाठी तो अनेक दिवस प्लॅनही करत होता, अशी माहिती पोलीस तपासांती पुढे आली आहे. काय म्हणायचे या वृत्तीला? एका अल्पवयीन मुलाच्या मनात दडून बसलेला गुन्हेगार की समाजात वाढत चाललेली गुन्हेगारी? काहीही असो; पण औरंगाबादेतील ही घटना अत्यंत गंभीर अशीच आहे. कुठे चालला आहे समाज? कोवळ्या वयातील मुलं अशी का वागत आहेत? मूल जन्माला आल्यावर पहिल्यांदा घराबाहेर पडते ते शाळेत जाण्यासाठी. कारण तत्पूर्वी त्याचे शिक्षण घरात सुरूच असते. तत्पूर्वी मूल ज्या-ज्या ठिकाणी जाते त्या-त्या ठिकाणी त्याचे आईवडील सोबत असतात. म्हणजेच, शाळेत जाऊ लागण्यापूर्वी मूल त्याच्या आईवडिलांकडूनच शिस्त आणि संस्कारांचे शिक्षण घेत असते. जर आईवडील शिस्तीने वागणारे असतील, तर मुलेही बहुतांश शिस्तीनेच वागू लागतात. हा सर्वसाधारण अनुभव असला तरीही आजकालची काही मुले गुन्हेगार बनत आहेत, ही अत्यंत धक्कादायक आणि तेवढीच दुःखदायक बाब आहे. हे खरेच की, कोणतेही आईवडील आपल्या मुलाला गुन्हेगार बनवू इच्छित नाहीत. मुलातील गुन्हेगारी वृत्ती ते सहनही करू शकत नाहीत. झोपडपट्टीत राहणार्‍या गरीब कुटुंबांमधील मुले गुन्हेगारीकडे लवकर ओढली जातात, असे म्हटले जाते. त्यांचे आईवडील मजुरीसाठी घराबाहेर राहतात आणि मुलाला योग्य संस्कार देऊ शकत नाहीत. परिणामी ही मुले गुन्हेगारीकडे वळतात, असे बोलणारे बोलतात; परंतु अलीकडील काही घटना पाहिल्यास हा तर्क पटेनासा होतो. कारण अलीकडे झोपडपट्टीत राहणारी, गरिबीत वाढणारी, संस्कार नसणारी नव्हे तर, चांगल्या उच्च शिक्षित, सुसंस्कारित कुटुंबातील मुलेही गुन्हेगारी कृत्य करू लागली आहेत. 11 ऑक्टोबर रोजी औरंगाबादमध्येही तोच दुर्दैवी अनुभव आला आहे. औरंगाबादच्या ‘एन-2’ या उच्चभू म्हणून ओळखल्या जाणार्‍या वस्तीत प्रा. राजन शिंदे यांचा खून झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. राहत्या घरी त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार कऱण्यात आले होते. त्यांच्या हाताच्या नसाही कापण्यात आल्या होत्या. या क्रूर कृत्याची नुसती बातमी ऐकून अंगावर भितीने अंगावर काटा उभा राहातो; पण हे हैवानी कृत्य कुटुंबातील अल्पवयीन सदस्यानेच करावे, याला काय म्हणावे? ज्या मुलाकडे पाहून माता-पित्याचा, कुटुंबातील कर्त्यांचा दिवसभराचा शीण, थकवा निघून जातो, त्याच मुलाला आज आरोपीच्या पिंजर्‍यात पाहावे लागण्याची वेळ आली आहे, हे दुर्दैवी म्हणावे लागेल. हे पाहून मनात अनेक प्रकारचे प्रश्‍न थैमान घालू लागतात. खेळण्या-बागडण्याच्या वयात मुलांच्या मनात एवढा राग, चीड, संताप अखेर येतो कुठून? एखादे हत्यार घेऊन दुसर्‍या कोणाच्या नव्हे तर, आपल्याच रक्तामासाच्या माणसावर चालविताना मुलाच्या मनात कोणत्या प्रक्रिया घडत असतील? मुले गंभीर गुन्हेगारी कृत्य करतात. ही अशी कृत्ये असतात, ज्यासाठी प्रचंड मनोधैर्य किंवा हिंमत असावी लागते. शिवाय कटकारस्थान रचण्याची क्षमताही अशा घटनांसाठी आवश्यक असते. एखादी व्यक्ती आचारविचारांनी आणि व्यवहारात अत्यंत आक्रमक असेल, तर तीच व्यक्ती असे गुन्हे करू शकते. असे मानसशास्त्र सांगते. कळत्या वयात मुलांची मानसिकता अशी का बदलते, हाही एक महत्त्वाचा प्रश्‍न आहे.  खेळताना-बागडताना मैदानात मुले हल्ली दिसतातच कुठे? पूर्वी मुले आईवडिलांबरोबर जास्तीत जास्त वेळ व्यतीत करीत असत. त्यांना आईवडिलांकडून सुसंस्कार शिकविले जात असत; परंतु आजच्या जगात हे सर्व गायब होऊ लागले आहे. टीव्हीवरही गुन्हेगारीशी संबंधित मालिका पाहण्याकडेच मुलांचा सर्वाधिक ओढा पाहायला मिळतो आहे. जेव्हा रक्तरंजित कार्यक्रम मुले वारंवार पाहतात, तेव्हा काहींच्या मनाचा नैसर्गिक नाजूकपणा नाहिसा होवून ते बेडर, क्रूरही बनू शकतात. हेही खरेच की, आजकाल आईवडील पैसा कमावण्यात इतके व्यस्त होऊन गेले आहेत, की ते आपल्या मुलांसाठी वेळच काढू शकत नाहीत. पोटची मुलं वाईट वळणाला लागल्याचे आई-वडीलाच्या लवकर लक्षातही येत नाही. त्यामुळे मुलांना योग्य मार्गावर आणणे काही वर्षांनी अशक्य होऊन बसते. मुलांच्या वाया जाण्याने, क्रूर कृत्याने काही वेळा काहींचे कुटुंबच उद्ध्वस्त होते. औरंगाबादेतील प्राध्यापक डॉ. राजन शिंदे यांचे सुखवस्तू कुटुंबही आज असेच उद्ध्वस्त झाले आहे. मुलं रागीष्ट, क्रूर का बनत आहेत? हा प्रश्‍न या पार्श्‍वभूमीवर अस्वस्थ करत आहे.