दिवाळीचा सण तेजाचा, आनंदाचा; पण हा आनंद नेमका कशातून, कसा मिळवायचा याचे भान बहुतेकांना नसावे. म्हणूनच आपल्याकडे बेभान होवून फटाके फोडण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. निमित्त काहीही असो, मोठ्या आवाजाच्या व रोषणाईच्या फटाक्यांचा वाढत्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. दिवाळीच्या चार-पाच दिवसांत नव्हे तर गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत, लग्नप्रसंगी, लग्नाच्या वरातीत, निवडणूक  आणि क्रिकेट सामना जिंकल्याच्या जल्लोषातही फटाक्यांचा कानठळ्या बसवणारा आवाज ऐकायला येतो; उत्साहाला मोठ्या दणक्यात वाट मोकळी करून दिली जाते. एकूणच फटाके हे आपल्या देशात उत्साहाचे, आनंदाचे आणि जल्लोषाचे जणू प्रतीक बनले आहे. असो; पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. चांगल्या गोष्टाचा अतिरेक केला की, त्याची वाईट बाजू किंवा तोटे हळूहळू लक्षात येऊ लागतात. फटाक्यांचेही तसेच आहे. गेल्या चार-पाच दशकात फटाक्यांचा वापर देशात खूपच मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अर्थातच त्यापासून होणार्‍या उपद्रवातही वाढ झाली आहे. फटाके फोडण्यापासून होणारे उपद्रव प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे फटाक्यांपासून होणारे ध्वनिप्रदूषण व दुसरा वायुप्रदूषण. ही दोन्ही प्रदूषणे मानवाच्या आरोग्याला व स्वास्थ्याला अत्यंत हानिकारक आहेत. याविषयी अनेक डॉक्टर, आरोग्यतज्ज्ञ आणि ध्वनितज्ज्ञ अनेकदा पोटतिडकेने सांगत असतात. लोकांचे प्रबोधन करून त्याबाबत सावध करण्याचा प्रयत्न करीत असतात; पण शिकलेले, शहाणे म्हणावे असे लोकही फटाक्यांपासून होणार्‍या धोक्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. हे दुर्दैव. तज्ज्ञांचे मत असे की, माणसाचे सर्वसामान्य बोलणे हे 60 डेसीबल आवाजात होत असते. तेथून पुढचा आवाज हा त्याच्यासाठी ‘ध्वनी प्रदूषण’ या सदरात मोडतो. तरीही लोकांच्या सणासुदीच्या उत्साहावर पाणी पडू नये यासाठी 80 डेसीबलपर्यंतच्या आवाजाचे फटाके फोडण्याची परवानगी आपल्याकडे आहे. मात्र, ही मर्यादा तोडण्यात जसा फटाके फोडणार्‍यांना आनंद होतो, तसा तो फटाक्यांचे उत्पादन करणार्‍या कंपन्यांनाही होतो की काय, हे कळत नाही; पण फटाक्यांपासून होणार्‍या प्रदूषणाबाबत जो निष्काळजीपणा आणि निष्क्रियता दाखवण्यात येत आहे, ती खरोखरच उद्वेगजनक आणि खेदजनक बाब आहे. कुठले फटाके वापरावेत व कुठले वापरू नयेत, यावर कायदेशीर निर्बंध घातलेले आहेत. तरीही अनेक लोक मोठ्या आवाजाचे फटाके फोडतात. त्याच्या मोठ्या आवाजामुळे वृद्ध, बालके, आजारी माणसे, गरोदर महिला, हृदयविकार असणारे रुग्ण हे सर्वच जण हैराण होतात. फटाक्यांच्या आवाजाने बालके आणि लहान मुले झोपेत दचकतात. मोठ्या फटाक्यांच्या दणक्याने व दीर्घकाळ चालणार्‍या फटाक्यांच्या आवाजाने प्रौढ माणसाच्याही कानांना इजा होऊ शकते आणि बहिरेपणाही येऊ शकतो. मोठ्या माणसांना असा हानिकारक त्रास होऊ शकतो तर लहान मुले आणि बालकांना किती धोका पोहोचू शकतो, याची कल्पना केलेली बरी. फटाक्यांमुळे त्रासदायक ध्वनिप्रदूषणच होते, असे नाही तर आरोग्याला हानिकारक असे वायुप्रदूषणही होते.  फटाक्यांमुळे कार्बनडाय ऑक्साइड, सल्फरडाय ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, फॉस्फरस यांसारखे विषारी वायू हवेत मिसळतात व या प्रदूषित हवेमुळे आजारांचे प्रमाण वाढते. या वायुप्रदूषणामुळे आधीच आजारी असलेल्या रुग्णांना, विशेषत: दमा व श्वसनाचे विकार असलेल्यांचा विकार बळावतो. दिवाळी आणि दिवाळीनंतर केलेल्या पाहणीत दमा व श्वसनाचे विकार वाढलेल्यांची संख्या खूप असते, असे आढळून आले आहे. या एकूण पार्श्‍वभूमीवर प्रश्‍न असा की, आनंदाला वाट करून देण्यासाठी खरोखरच फटाके फोडण्याची गरज आहे का? जे हानीकारक आहे, त्याचा अट्टहास का म्हणून करायचा? हे खरेच की, काही लोक खरोखरच परिस्थितीचे भान बाळगून वागतात. तामिळनाडूतील वेल्लोड या पक्षी अभयारण्याच्या परिसरातील लोकांचे त्याबाबत कौतुकच करावे लागेल. वेल्लोड परिसरातील जवळपास 750 कुटुंबीय हे या पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून मागील पंधरा वर्षे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करत आहेत. ऑक्टोबर ते जानेवारी या काळात विविध जातींचे हजारो पक्षी या अभयारण्यात येतात. याच वेळी दिवाळीचा सण येत असल्याने जर फटाके वाजले तर अभयारण्यात येणारे हे पक्षी फटाक्यांच्या आवाजाला घाबरून पळून जातील व परत येणार नाहीत, या भीतीने या परिसरातील आठ गावांतील ग्रामस्थांनी दिवाळीमध्ये एकही फटाका न फोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब  स्वागतार्ह ठरावी. विशेष असे की, या आठ गावांतील हे ग्रामस्थ केवळ दिवाळीतच नव्हे, तर अन्य सण साजरे करतानाही फटाके वाजवत नाहीत. हा आदर्श देशभरातील बाकी लोकांनी घेण्यास काय हरकत आहे. शेवटी फटाके फोडून पोट भरत नाही. आनंदासाठी म्हणाल तर, केवळ फटाके फोडल्यानेच आनंद मिळतो, असेही नाही. दिवाळीसारख्या सणाचा आनंद आप्तांच्या भेटीगाठी, शुभसंदेशांची देवाणघेवाण, दिवाळी अंकांचे वाचन, आवडते संगीत ऐकणे याद्वारे आपण घेऊ शकतो. फटाक्यांवर न उधळलेले पैसे गरीब, गरजू लोकांना किंवा वृद्धाश्रमांना देऊन सामाजिक कर्तव्यपूर्तीचा आनंदही घेऊ शकतो. तसा तो घेतलाच पाहिजे. फटाक्यांपासून होणार्‍या सर्व त्रासांचा आणि धोक्यांचा विचार केला, तर ‘फटाक्याचा आवाज नाय पायजे!’ असा विचार प्रत्येकाने केलाच पाहिजे आणि तो खर्‍या अर्थाने अंमलातही आणला पाहिजे. तेच तर सूज्ञ समाजाचे लक्षण ठरते.