नवरात्रीनंतर म्हणजेच अगदी 15 दिवसांनी दिवाळी सण येतो. तसा तो यंदाही आला; पण ‘कोरोना’च्या भयग्रस्त काळोखात यंदा नेहमीप्रमाणे दिवाळीची चाहूल लागलीच नाही. त्यातच निसर्गचक्र बदलेले; पावसाने धुडगूस घातलेला. त्यामुळेही दिवाळी दारात, घरात कधी आली हे कळलेच नाही. असो; पण दिवाळीचे महत्त्व त्यामुळे कमी होत नाही. दिवाळीला सणांचा ‘राजा’ म्हणून संबोधले जाते ते उगीच नाही.

दिवाळी साजरी केली जाते, त्याला ऐतिहासिक महत्त्वदेखील आहे. श्रीराम हे रावणाचा वध करून पत्नी सीता आणि लक्ष्मणासह 14 वर्षांच्या वनवासातून अयोध्येत परतले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी अयोध्यावासियांनी रोषणाई आणि दिव्यांची आरास लावून आनंद साजरा केला. मानवी जीवनातील अज्ञानाचा, वैरभाव, द्वेष-मत्सराचा अंधार दूर झाला की, प्रकाशमय आनंद प्रत्येकालाच लुटता येतो. त्यासाठीच तर दिवाळी साजरी करायची. धनत्रयोदशी, नरकचतुर्थी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे पाच दिवस चालणार्‍या या सणामध्ये सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. त्यात लक्ष्मीपूजनाचे महत्त्व अधिकचे. उद्याचा शनिवार लक्ष्मीपूजनाचाच! त्यामुळेच उद्याची संध्याकाळ होताच घराघरात दिवे उजळविले जातील. लक्ष्मीला घरात येण्यात अडथळा वाटू नये म्हणून हे दिवे उजळविले जातात. लक्ष्मी ही धनधान्य, सोनेचांदी, पैसा, संपत्ती आणि भौतिक संपदेची देवता. दिवे उजळवून लक्ष्मीची पूजाअर्चा करणे, आपल्या हिशोबाच्या वह्या आणि तिजोर्‍यांवर स्वस्तिकाचे चिन्ह उमटवून ‘श्री लक्ष्मै नमो नमः’ किंवा ‘श्री लक्ष्मी जी सदा सहाय’ किंवा ‘शुभ लाभ’ असे लिहिणे, अशा दिवाळीच्या प्रथा आहेत. दिवाळी येताच सर्वजण आपापली घरे आणि दुकाने स्वच्छ करून सजवितात. लक्ष्मीला कचरा अजिबात पसंत नाही, तर स्वच्छ, लखलखीत ठिकाणे पसंत आहेत, ही त्यामागील भावना असते. स्वच्छतेचा हा कदाचित सर्वांत जुना उत्सव असावा. दुसर्‍या शब्दांत सांगायचे म्हणजे हे सर्वांत जुने ‘स्वच्छता आंदोलन’ आहे. हे आंदोलन कुणाच्या आदेशाने सुरू झालेले नसून, प्रत्येकजण मनापासून या आंदोलनात सहभागी झालेला असतो.

दिवाळीच्या शुभमुहूर्तावरच लोक नव्या दुकानाचा, व्यवसायाचा, उद्योगाचा, संकल्पाचा शुभारंभ करतात. नवीन कामे सुरू करण्याच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. दुकानदार, व्यावसायिक, उद्योजक आपापल्या हिशोबवह्यांची पूजा करतात आणि जुन्या हिशोबवह्या बंद करतात. दीपावली कधीच एकटी येत नाही. आपल्यासोबत अनेक शुभ दिवसांना घेऊन येते. त्यानिमित्ताने आपण बरीच खरेदीही करतो.  दिवाळी आणि खरेदी हे जणू समीकरणच आहे. दिवाळीच्या निमित्ताने सर्व बाजारपेठा फुललेल्या दिसतात. ज्वेलरी, वाहन, कपडे, फराळाचे साहित्य, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, सजावटीच्या वस्तू, गॅझेट्स, दिवाळी विशेषांक याची खरेदी दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात होते. दिवाळीमध्ये सगळ्यात जास्त खरेदी केली जाते, ती म्हणजे कपड्यांची. आज मार्केटमध्ये वेगवेगळ्या फॅशनचे कपडे उपलब्ध आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही दुकानदारांनी वस्तूंवर ऑफर द्यायला सुरुवात केली आहे. दिवाळीच्या निमित्ताने झेंडूंच्या फुलांनादेखील प्रचंड मागणी असते, कारण प्रत्येकाच्या दारावर झेंडूच्या फुलांचे तोरण बांधण्याची प्रथा आहे. यामुळे  फुलबाजारामध्येही  या दिवसात फुलांची आवक मोठ्याप्रमाणात वाढते. या सगळ्या खरेदीमुळे बाजार पेठेमध्ये चांगली उलाढाल होते. दिवाळीचा अर्थव्यवहार बराच मोठा असतो. 

त्यामुळेच बाजारपेठेत पैसा खेळतो. एका अर्थाने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न होतो. हे खरेच की, काळ बदलला असताना दिवाळीचे स्वरूपही बदलले आहे; पण बदलत्या काळातही नात्याचे, मैत्रीचे स्नेहबंध घट्ट करण्याचा प्रयत्न आवर्जून होतो.  व्हॉट्स अप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या आभासी जगात वावरणारी तरुणाईदेखील दिवाळीमध्ये आपल्या परिवारासोबत आणि मित्रमंडळीसोबत वेळ घालवते. काही ठिकाणी तर, ‘तरुणाईसाठी दिवाळी पहाट’ या कार्यक्रमांनी त्यांची दिवाळी सुरू होते. छान सुंदर कपडे घालून तरुण मंडळी दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला पोहोचतात. एव्हाना जीन्स टॉप, वनपीस अशा वेस्टन आऊटफीट दिसणारी तरुणाई ट्रेडीशल लुकमध्ये दिसते. हल्ली धावपळीच्या आयुष्यात भेट जरी शक्य नसली तरी दिवाळीच्या निमित्ताने तरुणाई आपल्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत दिवाळी सेलिब्रेशन करताना दिसते. सोशल मीडियावर फोटो शेअर करून आनंद द्विगुणीत करण्याचाही प्रयत्न होतो.

दिवाळीचा खरा आनंद फराळाचे गोडधोड खाल्ल्याशिवाय पूर्णच होत नाही. चकली, लाडू, करंजी, चिवडा, शंकरपाळी,अनारसे, चिरोटे असे एकापेक्षा एक सरस पदार्थ खायला मिळतात. या सणामध्ये कोणाच्याही घरी जा तिथे या गोडधोड पदार्थांनी चांगलीच पेटपूजा होते. डाएट कॉन्शेसवाल्या मंडळींच्या डाएट प्लॅनची पुरती वाट लागते, कारण खमंग पदार्थांनी त्यांचा डाएट प्लॅन सुटलेला असतो. फराळाच्या पदार्थाची तयारी एव्हाना घरी केव्हाच सुरू झालेली असते. फराळांसाठी कोणकोणते पदार्थ करायचे आहेत, याचा बेत केव्हाच आखलेला असतो. ज्या घरात फराळ बनवणे शक्य नसते त्यांच्यासाठी रेडिमेड पदार्थाची चांगली सोय निर्माण झालेली आहे. रेडिमेड पदार्थामुळे नोकरदार महिलांची चांगलीच सोय झालेली आहे.

सण कोणताही असो तो गोडधोड पदार्थांशिवाय पूर्ण होतच नाही आणि दिवाळी म्हटले की, गोडधोड पदार्थ आवर्जून आलेच. स्वागतार्ह बाब अशी की, अलीकडे पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा कल वाढत चालला आहे. यंदा ‘कोरोना’च्या काळात दिवाळी साजरी होत असल्याने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन सरकारसह, पर्यावरणवाद्यांनी केले आहे. खरे तर, अशा आवाहनाची गरज नसावी. दिवाळी साजरी करताना पर्यावरणाला हानी होणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यावी. काळजी ‘कोरोना’चा कहर पुन्हा वाढणार नाही, याचीच विशेष करून घ्यायची आहे. काळजी घेऊनच, सारासार, विधायक विचार करूनच आपण तिमिराकडून तेजाकडे, अधोगतीकडून सर्वंकष प्रगतीकडे जावू यात! आमच्या त्यासाठीच सर्वांना हार्दिक शुभेच्छा!