(संग्रहित छायाचिञ)
मागील दहा-अकरा महिन्यांत देशात आणि राज्यात कहर केलेल्या ‘कोरोना’चा प्रभाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘कोरोना’च्या लसीकरणालाही आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांनी अंगावरची धूळ झटकत कामाला सुरुवात केली असली तरी, राज्यातील शाळा, महाविद्यालये आणि खासगी शिकवणी वर्ग सर्वांसाठी सगळीकडे कधी खुले होणार; त्यांचे कामकाज पूर्ववत होण्यास किती अवधी लागणार, असे काही प्रश्न सर्वसंबंधितांच्या मनात घोळत असतानाच सरत्या वर्षातील नोव्हेबर 23 पासून नववी व दहावीचे वर्ग सुरु करण्याची घोषणा राज्य सरकारने केली.  अर्थात मुंबई व ठाणे हे दोन जिल्हे वगळून राज्यातील अन्य जिल्ह्यांत नववी व दहावीचे वर्ग सुरू झालेले आहेत. 
त्याचे कारण हेच की, राज्यात ‘कोरोना’चा शंभर टक्के निप्पात अजूनही झालेला नाही. त्यातच ‘कोरोना’ची दुसरी लाट विदेशात काही ठिकाणी आली; ब्रिटन व अन्य देशात त्याने कहर केला आहे. तशी ती परिस्थिती मुंबई आणि महाराष्ट्रात उद्भवू नये म्हणूनच प्रशासन शाळा सुरू करण्याचा निर्णय हळूहळू घेत आहे, असे सरकारकडून सांगण्यात येते. त्यानुसारच नववी ते बारावीचे वर्ग सुरू केल्यानंतर आता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग येत्या 27 जानेवारीपासून सुरू करण्याची घोषणा सरकारने केली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला असतील, अशी सूटही सरकारकडून देण्यात आली आहे. राज्यातील काही गावात अजूनही ‘कोरोना’ बाधितांची नव्याने नोंद होत आहे. या सर्व परिस्थितीची जाणीव ठेऊन शाळा जरी सुरू झाल्या तरी शाळेत आपल्या पाल्याला पाठवताना त्याच्या पालकांनी हमीपत्र शाळेला भरून द्यावे, असे शासनाने म्हटले आहे.  शाळा सुरू झाल्यावर पाल्याला शाळेत गेल्यावर काही झाले, तर त्याची जबाबदारी शाळेवर वा शासनावर राहणार नाही, असाच यातून अर्थ निघतो. असे हमीपत्र लिहून देण्यास किती पालक तयार होतात, हाही एक प्रश्न मागील काही दिवसांत चर्चेत आहे. 
नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतरचा अनुभव काय, तर काही विद्यार्थ्यांनी अद्यापही शाळेत जायला सुरुवात केलेली नाही. काही पालकांच्याही मनात भीतीने घर केले आहे आणि त्यामुळे मुलांना ते शाळेत पाठविण्यास राजी नाहीत. मुलांना कितीही वेळा सांगितले तरी मुले दिवसभर नाकातोंडावर मास्क घालून ठेवू शकणार नाहीत आणि मित्रांपासून शारीरिक अंतरही राखू शकणार नाहीत, हे पालकांना ठाऊक आहे. ही भीती योग्यच असून, ती रातोरात मनातून नाहीशी होणार नाही. त्यामुळेच शैक्षणिक व्यवस्था पहिल्यासारखीच सुरळीत होण्यास काहीसा वेळ लागू शकतो. अर्थात ही भीती देशात सर्वत्र सारखीच नाही. महाराष्ट्रात नववी व दहावीचे वर्ग शाळेत सुरू झाले, त्याला चांगला प्रतिसाद आहे. जवळपास पंधरा लाख विद्यार्थी रोज शाळेत, वर्गात हजेरी लावतात, असे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवरच आता पाचवी आणि आठवीपर्यंतचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. पाचवी ते आठवीच्या वर्गातील मुलांचे जवळपास ऐंशी-नव्वद टक्के पालक हमीपत्र देऊन पाल्यांना शाळेत पाठवतील, असा अंदाज वर्तविला जातो. त्याचे कारण हेच की, ‘ऑनलाईन’ शिक्षण ही पद्धत आता सर्वत्र रूढ  झाली असली तरीही त्याविषयीचे समाधान सर्वांनाच नाही.  
अ‍ॅन्युअल स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्टचे (असर) सर्वेक्षण ‘ऑनलाईन’ शिक्षणाच्या मर्यादा अधोरेखित करणारेच आहे. ‘असर’ने हे सर्वेक्षण ‘कोरोना’मुळे शाळा बंद होऊन सहा महिने लोटल्यानंतर केले. या सर्वेक्षण अहवालानुसार, देशातील ग्रामीण भागात राहणार्‍या 20 टक्के विद्यार्थ्यांजवळ पाठ्यपुस्तकेही नाहीत. ही राष्ट्रीय सरासरी आहे. वेगवेगळ्या राज्यांची सद्यःस्थिती वेगवेगळी पाहिली असता, राजस्थानमधील 40 टक्के विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध नाहीत, तर आंध्र प्रदेशमध्ये हे प्रमाण 65 टक्क्यांहून अधिक आहे. असो; पण  ‘ऑनलाईन’ शिक्षणाच्या मर्यादा आतापर्यंत स्पष्ट झाल्या आहेत. मुलांना संभाळणे, त्यांना नीट शिकवणे, त्यांना शिकवलेले आकलन झाले की नाही याचा शोध घेणे, हे सारे ‘ऑनलाईन’वरून सहज शक्य होत नाही. अनेकदा मुलांचेही ‘ऑनलाईन’ शिकवण्यामागे लक्ष लागत नाही. म्हणूनच शाळेचे वर्ग सुरू व्हावेत, अशी अनेक शिक्षक, पालक व पाल्यांचीही इच्छा आहे. त्या इच्छेचा मान राखत आणि प्राप्त परिस्थितीला सामोरे जात राज्य शासनाने नववी ते बारावीचे वर्ग सुरु केल्यानंतर आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. शेवटी जोपर्यंत शाळा नियमित सुरू होत नाहीत, तोपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करणे, प्रॅक्टिकल्स, परीक्षा यांची पूर्ववत अंमलबजावणी होणे कठीण आहे.
 यात महत्त्वाचा मुद्दा होता तो  इयत्ता 10 आणि 12 वी परीक्षांच्या तारखेचा. हा मुद्दाही आता निकाली काढण्यात आला आहे. इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांची तारीख आज, गुरुवार अखेर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार 23 एप्रिल ते 29 मे 2021 या दरम्यान इयत्ता 12 वी परीक्षा घेतली जाणार असून या परीक्षेचा निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर केला जाईल. तर, 29 एप्रिल ते 31 मे 2021 च्या दरम्यान इयत्ता 10 वीची परीक्षा घेतली जाणार असून  ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. शेवटी, सर्वांच्या प्रयत्नांतून, सहकार्यातूनच योग्य तो मार्ग निघणार आहे; ‘कोरोना’च्या काळोखातून बाहेर पडताना शैक्षणिक प्रवाहदेखील पुन्हा पूर्ववत होणार आहे.