काँग्रेसची मी स्थायी अध्यक्ष आहे, पक्षातील सर्व निर्णय मीच घेत असते, पक्षातील नेत्यांना जे वाटते, ते त्यांनी समोर येऊन स्पष्टपणे माझ्याशी बोलावे, या शब्दांत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कालच्या शनिवारी बंडखोर नेत्यांना खडसावले. काँगेस कार्यसमितीच्या बहुचर्चित बैठकीत सोनिया गांधी यांनी ‘जी 23’ च्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. विशेष असे की, या बैठकीत उपस्थित बहुतांश नेत्यांनी राहुल गांधी यांनीच पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी आग्रही मागणी केली. यावर विचार करण्याची तयारी राहुल गांधी यांनी दर्शवली. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारत नाही, तोपर्यंत सोनिया गांधी यांच्याकडेच हे पद राहील, हे खरेच; पण पक्षाला पूर्णवेळ आणि  सक्रीय, सक्षम अध्यक्ष मिळावा, ही मागणी मागील काही दिवसांत काहींनी लावून धरलेली आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचा नवा अध्यक्ष जून महिन्यात निवडला जाणार होता; पण ‘कोरोना’चे कारण देत अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली. आता पुढील वर्षीच्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडण्याचा निर्णय कार्यसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. म्हणजेच दहा-अकरा महिन्यांनंतर काँग्रेसला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळेल. त्या आधीच गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकींना काँग्रेसला सामोरे जावे लागेल. काँग्रेससाठी हे एक आव्हान ठरेल; पण पक्षीय पातळीवर खरेच एकजूट राहिली तर, या निवडणुकांत काँग्रेसची कामगिरी काहींसी सुधारल्याचे दिसू शकेल. प्रश्‍न काँग्रेसमधील बेकीचाच आहे. अर्थात हे काही नवेही नाही. काँग्रेसच्या आजवरच्या वाटचालीमध्ये पक्षांतर्गत पेचप्रसंग अनेकदा निर्माण झाले. अनेक मुरब्बी नेत्यांनी काँग्रेसपासून फारकत घेत सवतेसुभे उभे केले; परंतु तशा बिकट काळातही काँग्रेसच्या नेतृत्त्वाने आपली वाटचाल कायम ठेवली.  2004 ते 2014 या दहा वर्षांच्या काळात केंद्रासह देशातील अनेक राज्यांत काँग्रेस सत्तेत होती; परंतु 2014 नंतर सुरु झालेली काँग्रेसची घसरण काही केल्या थांबत नाही. याचे मुख्य कारण पक्षाचे नेतृत्त्व. नेतृत्त्व महत्वाचेच; पण काँग्रेसला खंबीर नेतृत्त्वाचीच अलीकडे उणिव भासू लागली. राजीव गांधी यांच्या दुर्दैवी हत्येनंतर इच्छा नसतानाही राजकारणात आलेल्या सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाला भक्‍कम नेतृत्त्व दिले, हे खरेच; पण आज काँग्रेसची अवस्था निर्नायकी झाली. मध्यंतरी, राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडल्यानंतर पुन्हा ही धुरा आजारपणामुळे लांब राहिलेल्या सोनिया गांधी यांच्याकडेच आली; पण त्यांच्या नेतृत्वातील  मर्यादा झाकून राहिल्या नाहीत. त्यामुळेच काँग्रेसला नवे नेतृत्त्व मिळण्यासाठी तत्काळ हालचाली सुरु होतील, असे वाटले होते; परंतु तशा काही हालचाली दिसेनाशा झाल्यावर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली. पक्षाच्या दुरावस्थेबाबत काही महिन्यांपूर्वी 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून सक्रिय अध्यक्षाची गरज बोलून दाखवली; पण त्या पत्राचा मतितार्थ लक्षात न घेता पत्र लिहिणार्‍या नेत्यांवर राहुल गांधी यांनी आगपाखड केली. वास्तविक, या नेत्यांचा अप्रत्यक्ष रोख राहुल गांधी यांच्याकडेच होता आणि तो स्वाभाविकही होता. कारण 2014 च्या लोकसभा निवडणुकांपासून काँग्रेस पक्षाची ज्या पद्धतीने घसरण सुरु झाली, ती रोखण्यामध्ये राहुल गांधी यशस्वी ठरले नाहीत. त्यात नरेंद्र मोदी यांच्यापुढे राहुल गांधी यांचे दुबळेपण दिसून आले. काँग्रेस हा तळागाळात जनाधार असलेला पक्ष असला तरी भाजपने राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील तुलना करण्याचे प्रचारतंत्र अवलंबल्याने काँग्रेसची मोठी कोंडी झाली. काँग्रेस पक्षाचे योगदान, पक्षाची विचारधारा, ध्येयधोरणे यांपेक्षाही राहुल गांधी यांची भाषणे, त्यांची संसदेतील वर्तणूक, जाहीर सभांमधील त्यांच्या संभाषणातील चुका, त्यांचे हावभाव यांची चर्चा अधिक होत राहिली. केवळ चर्चाच नव्हे तर त्यावरुन अनेकदा खिल्लीही उडवली. भर संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुल गांधी यांनी दिलेले आलिंगन असो किंवा सदनामध्ये डोळा मारणे असो, अशा एक ना अनेक  गोष्टींचा सोशल मीडियातून भरघोस प्रसार-प्रचार झाला. त्यावर जनसामान्यातही चर्चा झाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या काळात ‘चौकीदार चोर है’ अशी गर्जना करणार्‍या राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयापुढे नमते घ्यावे लागल्याचेही पाहायला मिळाले. या सार्‍याचा फटका राहुल गांधी यांच्याबरोबरीने काँग्रेस पक्षालाही बसला. त्या-त्यावेळी आपल्या नेतृत्त्वाच्या बाजूने खिंड लढवताना पक्षातील नेत्यांची कशी अवस्था व्हायची हे जनतेने अनेकदा पाहिले. हे सर्व घडत असतानाच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावलण्याचे धोरण अवलंबल्याने राहुल गांधी यांना अंतर्गत विरोध वाढत गेला. त्यातूनच मध्यंतरी ‘लेटर बॉम्ब’चे प्रकरण उद्भवले. दरम्यान कपिल सिब्बल यांच्यासारख्या नेत्यांवर भाजपशी संगनमत असल्याचा वरिष्ठांकडून आरोप झाला. स्वाभाविकच त्यावरुन बराच गदारोळ माजला. बिहारच्या निवडणुकीतील पराभवानंतर गुलाबनबी आझाद यांनीही राहुल गांधी यांना लक्ष्य केले. पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठका घेऊन निवडणुका जिंकता येत नाहीत, असे त्यांनी म्हटलेे. या सर्वांमधून पक्षातील जुन्याजाणत्या नेत्यांमध्ये राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीविषयी किती खदखद आहे, हेच दिसून  आले. असो; पण आता हेही स्पष्ट झाले आहे की, राहुल गांधी यांच्याच गळ्यात पक्षाध्यक्षपदाची माळ पडेल. ते जोपर्यंत पक्षाध्यक्षपद स्विकारत नाहीत तोपर्यंत सोनिया गांधी यांच्याकडेच हे पद राहणार आहे. त्यामुळे ‘जी 23’ नेत्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरेल. या नेत्यांना एकतर गांधी कुटुंबियांशी जुळवून घ्यावे लागेल, नसता काँग्रेसचा ‘हात’ सोडणे भाग पडेल. सोनिया गांधी यांनी त्यासाठीच निर्णायकी भाषा केलेली दिसते.