राजकारणात पक्षांतर्गत बदल हे अपरिहार्यच असतात. त्याशिवाय पक्षाला गती मिळत नसते; बेरजेचे राजकारण करणेही कठीणच होत असते. या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्षनेते दक्ष असतात. त्यात भाजप नेते कायमच आघाडीवर रहातात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कालच्याच गुरुवारी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. त्यात केंद्र सरकार वा भाजपच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करणार्‍या, सत्य बोलणार्‍या नेत्यांची प्रमुख समितीतून हकालपट्टी करण्यात आली. शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणारे माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह, मोदी यांचे टीकाकार खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनाही वगळले गेले. खासदार वरुण गांधी तसेच माजी मंत्री मनेका गांधी यांचीही भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून गच्छंती झाली! म्हणजे खोट्यांच्या ऐवजी खर्‍यांच्याच माथी गोटा मारला म्हणायचे! अर्थात हे काही नवलाईचे नाही. पक्षाच्या ध्येय-धोरणाविरोधात बोलणार्‍यांना असाच दणका दिला पाहिजे, असे बोलणारे बोलतीलही; पण अलीकडे भाजपची ध्येय-धोरणे कोण ठरवते, तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा! हे दोन नेते धोरण ठरविणार आणि बाकी अवघे ‘म’म्हणणार! वरून बोलताना मात्र सारेच पक्षांतर्गत लोकशाहीचे गोडवे गाणार! भाजप नेत्यांसारखे ढोंगी जगात सापडणार नाही, असे लोकशाहीवादी लोक बोलतात, ते काही खोटे नाही. एक मात्र खरे की, चाळीशी ओलांडलेल्या भाजपने मागील काही काळात कोणीही तोंडात बोट घालावे, अशीच प्रगती केली आहे. 1980 मध्ये स्थापन झालेल्या भाजपचे अटलबिहारी वाजपेयी हे पहिले अध्यक्ष होत. 1984 मध्ये लोकसभेत अवघे दोन सदस्य असणार्‍या आणि मागील निवडणुकीत लोकसभेच्या 303 जागा जिंकणार्‍या भाजपचा हा प्रवास निश्‍चितच नजरेत भरणारा आहे. सभासदसंख्येच्या बाबतीत जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष ठरण्याचा बहुमान या पक्षाने मिळविला आहे. मतदारसंख्येच्या बाबतीत आजमितीस सुमारे 38 टक्के मते पक्षाने काबीज केली आहेत. सत्तेच्या राजकारणात प्रभुत्व मिळविणे आणि टिकविणे भाजपला सातत्याने शक्य होत आहे. पक्षांतर्गत धोरणाची दिशा, हे त्यामागचे कारण आहेच; पण विरोधी पक्षांची झालेली दुर्दशा हेही एक त्यामागचे मुख्य कारण आहे. 2014 पासून सत्तेवर असणार्‍या भाजपने आपली संघटनात्मक आणि आर्थिक शक्तीही प्रचंड प्रमाणात वाढविली आहे. भारतीय राजकारणात ही स्थिती दीर्घकाळ राहावी, असे भाजपच्या धुरिणांना मनापासून वाटत असले, तरी सत्ता आणि आश्‍वासनांचे दुहेरी आव्हान आज पक्षासमोर आहे. 2014 मध्ये स्वबळावर सत्तेवर येताना पक्षाने नेतृत्वाकडे एकवटलेली ताकद, पक्षसंघटना आणि विशेषत्वाने जनतेच्या अपेक्षा अशी काही आव्हान आज पक्षासमोर आहेत. मोदी आणि शहा एकत्रितपणे पक्षाचा डोलारा नेटाने उचलत असतीलही; पण त्यावरही काही प्रश्‍नचिन्ह उमटवणारे आहेत. म्हणूनच राज्यपातळीवर पक्षाला सातत्याने कडवे आव्हान मिळतेे. मध्यंतरी देशातील पाच राज्यांत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपच्या झालेल्या पराभवातून त्याचाच प्रत्यय आला. आसाममध्ये पुन्हा सत्तेत येऊन भाजपने आपली प्रतिमा राखली असली, तरी ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे बिरुद मिळविणारा हा पक्षही सत्तेसाठी हापापलेला दिसतो, हे आता जनतेला कळून चुकले आहे. वाजपेयी-अडवानी यांच्या काळातील भाजप आणि मोदी-शहा यांच्या काळातील भाजप यात अनेक अर्थाने अनेकांना तफावत जाणवते आहे.  सत्ता आणि पैशाची अमर्याद लालसा सामावलेली ‘काँग्रेसी संस्कृती’ भाजपमध्ये झिरपत चालली असल्याबद्दल संघाने आजच नव्हे तर पूर्वीही अनेकदा जाहीररीत्या कोरडे ओढले आहेत. त्यातच काँग्रेससह इतर पक्षांमधून भाजपमध्ये आलेल्या प्रमुख नेत्यांची भर पडली आहे. यातील काही नेते भ्रष्ट ठरवले गेले असले तरी भाजपमध्ये जाताच ते श्रेष्ठ आणि पवित्र ठरले आहेत. तपास यंत्रणेला इशार्‍यावर नाचवून विरोधकांना जेरीस आणण्याच्या भाजपच्या खेळीही जनदृष्ट्या निषेधार्ह ठरल्या आहेत. भाजपमध्ये जे वाजपेयी विचारांचा वारसा चालवतात, ते खरे बोलायला जातात; पण ते नेतृत्त्वाला पटत नसावे. ‘चूप बैठो नही, तो कान काटुँगा’ असा धाक असल्यानेच भाजपचे दुय्यम नेते सत्य बोलताना कचरतात. जे धारिष्ट्याने बोलतात, त्यांना घरी बसण्यास वरिष्ठ भाग पाडतात. प्रश्‍न नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मनमानीचा आहेच. अशावेळी अनेकांना अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांची आठवण होणे स्वाभाविकच ठरते. 1980 मध्ये राजकीय प्रवासाचा प्रारंभ करताना अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रेरक संदेश दिले होते. भाजप हा भारतीय राजकारणातील नैतिक शक्ती असेल, असे त्यांनी म्हटले होते. पक्षात मूल्याधिष्ठित राजकारणाला प्राधान्य दिले जाईल, अति केंद्रीकरणाला विरोध केला जाईल, त्याचप्रमाणे जंगलराज नव्हे तर कायद्याचे राज्य हा सिद्धांत जोपासला जाईल, असेही त्यांनी म्हटले होते. ‘अंधेरा हटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा,’ या शब्दांत त्यांनी भाषणाचा केलेला समारोप सूर आजही अनेकांच्या मनात घुमतो आहे; पण दुर्दैव असे की, अटलजींसारख्या ऋषीतुल्य राजनेत्याने दिलेला हा गुरुमंत्र भाजपचे आधुनिक ‘चाणक्य’ विसरले की काय, असा प्रश्‍न पडावा, अशीच आज भाजपची स्थिती आहे. सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याच्या सोयीस्कर धोरणामुळे भाजप वैचारिकदृष्ट्या भ्रष्ट ठरला आहे. अशावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देतानाच ज्यांची केवळ सूडबुद्धाने हकालपट्टी करण्यात आली, त्या सत्यवाद्यांनांही आम्ही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.