जगभरातील अनेक राजकीय नेत्यांची आत्मचरित्रं आतापर्यंत प्रसिद्ध झालेली आहेत. तर, काहींनी अनुभवावर आधारित पुस्तकं लिहिली आहेत. पैकी काही पुस्तकांचा जागतिक पातळीवर गवगवाही झाला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याही एका पुस्तकावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. बराक ओबामा यांनी आपल्या अध्यक्षीय कार्यकाळातील अनुभवांवर दोन पुस्तके लिहिण्याचा मानस केलेला आहे. पैकी पहिल्या अध्यक्षीय कार्यकाळातील अनुभवांवर आधारित ’प्रॉमिस्ड लँड’ हे पहिले पुस्तक याच आठवड्यातील मंगळवारी जगभरात प्रकाशित झाले आहे. दोनवेळा भारताचा दौरा केलेल्या ओबामा यांनी या देशाबद्दल आपले अनुभव कथन केले आहेत.

1990 मधील अर्थबदलांमुळे भारताचेही बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेत परिवर्तन झाले. यामुळे भारतीयांची अतुलनीय उद्योजकीय कौशल्ये समोर आली. यामुळेच तंत्रज्ञान क्षेत्रे बहरली व मध्यमवर्ग विस्तारला. अनेक दृष्टीने आधुनिक भारत ही यशस्वी कथा आहे, असे ओबामा यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.

विशेष असे की, ओबामा यांनी या अर्थबदलांचे शिल्पकार म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांचा गौरव केला आहे. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आपल्या कार्यकाळात खरोखरच एक इतिहास घडविला; पण त्यांनी त्याचा कसलाच गवगवा केला नाही; श्रेय घेतले नाही. ‘कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ गीतेतील या श्‍लोकाप्रमाणेच त्यांचे सारे वागणे. जे करायचे ते समर्पित भावनेने; पण त्याचा व्यक्तीशा लाभ उठवायचा नाही. हे जणू डॉ. मनमोहन सिंग यांचे जीवनतत्त्वच! अशी माणसं राजकारणात बहुधा आढळत नाहीत. आढळले तरी ते अधिक काळ या क्षेत्रात रमत नाहीत; पण डॉ. मनमोहन सिंग भारतीय राजकारणात रमले! नव्हे तर त्यांनी पंतप्रधान या नात्याने या देशाचे सलग दहा वर्ष नेतृत्त्व केले. तरीही डॉ. सिंग हे लोकापेक्षाप्रमाणे ‘किंग’ ठरलेच नाहीत! त्याचे कारण हेच की, डॉ. मनमोहन सिंग हे प्रचलित अर्थाने ‘राजकारणी’ नाहीत. बहुतेक राजकीय नेते (झेश्रळींळलळरप) हे मोठे बेरकी असतात. ते सोयीस्करपणे राजकीय संघटन करतात. पक्षावर त्यांचा मोठा दबदबा असतो. कोण फायद्याचा, तोट्याचा कोण, याचा विचार करूनच बेरकी राजकराणी कार्यकर्ते व चाहते जमवितात. असे राजकारणी फक्त स्वतःचा, स्वतःच्या माणसांचा, स्वपक्षाचा विचार करतात. देश आणि देशातील जनता केवळ आपल्यासाठीच आहे, असाच या राजकीय नेत्यांचा समज आणि वर्तन असते. त्याउलट मुत्सुद्दयांचे (डींरींशीरप) असते.

मुत्सुद्दी स्वतःचा, स्वतःच्या पक्षाचा नव्हे, तर देशाचा, समाजाचा विचार करतात. देश आणि समाजाच्या सेवेसाठीच स्वतःला वापरतात. डॉ. मनमोहन सिंग हे त्यातलेच एक! जगत्विख्यात अर्थशास्त्रज्ज्ञ असलेले हे व्यक्तीमत्त्व सोनिया गांधी यांच्या म्हणण्यापेक्षा काँग्रेस चाणक्यांच्या शब्दात अडकले आणि ‘नाही...हो’ म्हणत पंतप्रधानपदावर बसले. तेही सलग दहा वर्षे! ते दहा वर्ष भाग्याचेच! स्वतः डॉ. सिंग यांच्यासाठी आणि देशासाठीही! असे असले तरीही डॉ. सिंग त्यांच्या हातून देशाचे आणि देशवासियांचे नेमके काय भले झाले? ते तर सोनिया गांधी यांचे ‘सांगकामे’ होते, असा आरोप डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर मागे झाला आणि आजही होतो; पण असा हा आरोप करणार्‍यानींही हेही आवर्जून ध्यानात घ्यायला हवे की, डॉ. मनमोहन सिंग यांनीच आर्थिक गटांगळ्या खाणार्‍या आपल्या देशाला अलगद बाहेर काढले. अशक्य ते शक्य करून दाखविले. 2008 चा तो काळ. त्यावेळी देशात काँग्रेस आघाडीचे सरकार होते.

दरम्यान देशाची अर्थव्यवस्था एकदम कोलमडलेली होती; त्यामुळेच सरकार पेचात पडलेले होते. मात्र, डॉ. मनमोहन सिंग यांनी संकटालाच संधीच्या रूपात पाहिले. अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी त्यांनी आपले ज्ञान, हुशारी कारणी लावली. डॉ. सिंग यांनी सोने गहाण ठेवायला लागलेल्या देशाला खुले आर्थिक धोरण स्वीकारायला लावून प्रगतीच्या वाटेवर आणले. त्यानंतर भाजपची सत्ता येऊनही त्यांना ही वाट सोडता आलेली नाही. एक खरेच की, मोदी सरकारने नोटबंदी, जीएसटी असे काही निर्णय घेतले; पण हे दोन्हीही निर्णय झोपेतलेच ठरले! म्हणूनच ते चुकीचे ठरले. तरीही या निर्णयाचे समर्थन भाजपकडून केलेच जाते. नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर येईल; बनावट नोटांचा कायमचा बंदोबस्त करता येईल, अंतिमतः दहशतवाद्यांची आर्थिक नाकेबंदी करता येईल, असे मोदी सरकार सांगत होते; पण नोटबंदीच्या निर्णयामुळे यापैकी कुठलीच गोष्ट साध्य झालेली नाही. या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चांगलीच ठेच बसली.

एकूणच डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेची घातलेली घडी मोदी सरकारने हळूहळू विस्कटण्याचा प्रयत्न सुरु केला असतानाच देशात ‘कोरोना’चा कहर झाला. अर्थातच भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेली. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न होत आहे. ‘आत्मनिर्भर भारता’च्या गप्पा सुरु आहेत; पण देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा एवढ्यात मार्गी लागेल, असे नाही. त्यासाठी नेटाने आणि नेकीनेच प्रयत्न करावे लागतील. डॉ. मनमोहन सिंग यांचा त्याबाबत आदर्श घ्यावा लागेल. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतीय अर्थबदलांचे शिल्पकार म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांना श्रेय दिलेच आहे. तेव्हा आता अर्थव्यवस्थेच्या पडत्या काळात मोदी सरकारने डॉ. मनमोहन सिंग यांचा सल्ला घेण्यास कमीपणा मानू नये, एवढेच.