टाटा सन्सने तब्बल 18 हजार कोटींची सर्वोच्च बोली लावून एअर इंडियावर मालकी हक्क प्रस्थापित केला आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा केंद्र सरकारने केली आहे. एअर इंडियाची सूत्रे खासगी क्षेत्राच्या हवाली करण्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू होती. मात्र, बराच काळ कोणी खरेदीदार एअर इंडियाची खरेदी करण्यासाठी पुढे आला नव्हता. दरम्यान एअर इंडियाचा तोटा वाढून तो 8500 कोटींपेक्षा अधिक झाला. त्यामुळेच बोली लावण्यास कंपन्या पुढे सरसावत नसल्याचे बोलले गेले; पण नंतरच्या काळात काही जणांकडून प्रस्ताव दाखल झाले. वेगवेगळ्या चार निविदा सरकारकडे एअर इंडियाच्या खरेदीसाठी आल्या होत्या. तरी सर्वाधिक बोली लावणारी ‘टाटा सन्स’ या स्पर्धेत आघाडीवर होते. ‘स्पाइसजेट’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनीही निविदा दाखल केली होती; पण सर्वश्रेष्ठ बोली लावणार्‍या टाटांकडे एअर इंडियाचा कारभार सोपवण्यात आला. टाटा हे भारतातील एक प्रतिष्ठित उद्योजक घराणे आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. याच घराण्यातील ‘युगपुरुष’ म्हणावे अशा जेआरडी टाटा यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाईन्स रुपात देशात पहिली विमान सेवा सुरु केली. ‘महाराजा’चे बोधचिन्ह मिरवणारी एअर इंडिया एकेकाळी टाटा एअरलाइन्स म्हणून ओळखली जात असे. देशातील पहिले परवानाधारक पायलट जेआरडी टाटा यांनी स्वतः 15 ऑक्टोबर 1932 रोजी कराची ते मुंबई विमानाचे उड्डाण केले होते.  टाटा एअरलाईन्सचा जन्मच मुळी जेआरडींच्या उड्डाण प्रेमातून झाला होता.  24 व्या वर्षीच त्यांनी मुंबईत सुरु झालेल्या फ्लाईंग क्लबचे सदस्यत्व घेतले होते. असे रजिस्ट्रेशन करणारे ते पहिले नव्हते; पण 1929 मध्ये येथून उड्डाण परवाना घेऊन बाहेर पडणारे देशातील पहिले व्यक्ती होते. पुढे या घटनेला 50 वर्षे झाल्यावर 1982 मध्ये याच मार्गावर जेआरडी यांनी पुन्हा एकदा हा प्रवास केला होता. यातूनच एअर इंडिया, एअर इंडिया इंटरनॅशनलचा जन्म झाला होता. नंतर 1953 मध्ये राष्ट्रीयीकरण कार्यक्रमांतर्गत सरकारने एअर इंडियाची खरेदी केली. सन 2000 पर्यंत एअर इंडिया फायद्यात चालली होती. मात्र, 2001 मध्ये कंपनीला प्रथमच 57 कोटींचा तोटा झाला. नंतर 2007 मध्ये सरकारने इंडियन एअरलाइन्स ही कंपनी एअर इंडियामध्ये विलीन केली. त्यावेळी दोन्ही कंपन्यांचा एकत्रित तोटा 770 कोटी रुपये होता आणि नंतर तो 7200 कोटींपर्यंत वाढला. एअर इंडियाने आपला तोटा कमी करण्यासाठी तीन एअरबस 300 ची आणि एका बोइंग 747-300 विमानाची 2009 मध्ये विक्री केली; परंतु एअर इंडियाचा तोटा कमी होण्याएवजी वाढतच गेला. मार्च 2011 मध्ये एअर इंडियावरील कर्ज 42,600 कोटी रुपये झाले. तर, परिचालन तोटा 22 हजार कोटी रुपयांवर गेला. 2018-19 या आर्थिक वर्षात सुमारे 58 हजार कोटी रुपयांच्या कर्जाखाली दबलेल्या एअर इंडियाला सुमारे 8400 कोटी रुपयांचा तोटा झाला. जास्त परिचालन मूल्य आणि परकीय चलनातील तूट यामुळे एअर इंडियाला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यातच ‘कोरोना’चा काळोख दाटला.  त्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये अडचणी उभ्या राहिल्या. विमान वाहतूक क्षेत्र मुळातच अडचणीत असताना ‘कोरोना’च्या कारणाने अधिकच्या अडचणी वाढल्या. ‘फाटक्यात पाय’ अशीच या क्षेत्राची स्थिती झाली. नेमक्या अशाच काळात एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू झाली. एअर एशिया इंडिया आणि विस्तारा या दोन महत्त्वपूर्ण एअरलाइन्समध्ये टाटांची भागीदारी आहे. या दोन्ही कंपन्या आपापली बिझनेस मॉडेल अवलंबून व्यवसाय करतात. विस्तारा कंपनीने बोइंग 737-800 एनजी विमाने आपल्या ताफ्यात सहभागी करून घेतली आहेत. कंपनीकडील विमानांची संख्या 31 वर पोहोचली आहे आणि त्यामुळे कंपनीचे नेटवर्कही 50 टक्क्यांनी वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर टाटाच एअर इंडियाचा सौदा फायदेशीर ठरवू शकतात, असे मानले जावू लागले. नव्हे ते खरेही ठरले. टाटा सन्सने तब्बल 18 हजार कोटींची बोली लावून एअर इंडियावर मालकी हक्क प्रस्थापित केला आहे. टाटा समूहाने केवळ पूर्वी त्यांच्याकडेच या कंपनीची सूत्रे होती म्हणून ही कंपनी खरेदी करण्यात रस दाखविला असावा, असे म्हणता येईलही; पण या क्षेत्रातील त्यांचा अनुभव पाहता ते कंपनी फायद्यात आणू शकतात का आणि कंपनीची सध्याची मालमत्ता पाहता सौदा फायद्याचा ठरू शकतो का, याचा विचार टाटा समूहाने केला असणार हे निश्‍चित. एअर एशियामध्ये असणारी 51 टक्क्यांची भागीदारी टाटांना याबाबतीत फायदेशीर ठरणार असून, एअर एशियामध्ये एअर इंडियाचे विलिनीकरण झाल्यास टाटांना त्यापासून चांगला लाभ होऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. हेही खरेच की, जेआरडींच्या काळात एअर इंडिया जगातील काही उत्तम एअरलाईन्स मध्ये गणली जात होती. मात्र, आज घडीला  एअर इंडियावर मोठे कर्ज आहे. कंपनीचे रोजचे नुकसान 20 ते 25 कोटींहून अधिक आहे. मात्र, कंपनीच्या अनेक ठिकाणी जमिनी आणि इमारतीही आहेत आणि हा फार मोठा फायदा आहे. टाटांना या सार्‍याची जाण निश्‍चितपणे असणार आणि याबाबत लावल्या जात असलेल्या अंदाजानुसार जर एअर एशियामध्ये एअर इंडिया विलीन करण्याची योजना टाटांच्या मनात खरोखरच असेल तर स्वगृही परतलेल्या ‘महाराजा’चा आता पुन्हा नव्याने रुबाब वाढेल, असा अंदाज बांधला जात असून तो खराच ठरेल, यात शंका नाही.