तंबाखूच्या व्यसनातून, समाजाला मुक्त करण्यासाठी सुरु केलेल्या, ‘तंबाखू सोडा, हिरो बना!’ या अभियानाचा आरंभ, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते कालच्या रविवारी झाला. बंगळुरू इथल्या, राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य आणि स्नायू विज्ञान संस्थेतल्या कार्यक्रमात, दूरदृश्य प्रणालीद्वारे ते सहभागी झाले होते. ‘कोणत्याही प्रकारच्या तंबाखूचे सेवन, आरोग्यासाठी घातक असून, सुदृढ आरोग्याला आपली जीवनशैली बनवूया!’ असे आवाहन आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी यानिमित्ताने केले आहे. मात्र, समाजामध्ये अशा आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्याची अनेकांची मानसिकता असल्याची दिसत नाही. म्हणूनच एकीकडे तंबाखू विरुद्ध चळवळ मोठ्या प्रमाणावर राबवली जात असतानाच दुसरीकडे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवन वाढल्याचे दिसून येत आहे. तंबाखू सेवन करण्याच्या अनेक पद्धती आहेत. काहीजण तंबाखू चुन्याबरोबर मळून खातात, काहीजण पानात सुपारीसह काताबरोबर मिश्रण करून खातात, तर काहीजण सिगारेटद्वारे धुम्रपान करतात. यापैकी सिगारेट ओढणे, तंबाखू खाणे आणि गुटखा खाणे याद्वारे तंबाखूचे सर्वाधिक सेवन केले जाते. गुटखा खाणे, सिगारेट ओढणे याची तरूणाईमध्ये क्रेझ असल्याचे दिसून येते. सुरुवातीला मजा म्हणून केल्या जाणार्‍या या गोष्टी मग व्यसनांमध्ये रुपांतरीत होतात. त्यानंतर या गोष्टी मिळण्यात अडचण आली तर चिडचिड होणे, निद्रानाशासारखे आजार जडणे यासारख्या गोष्टी होतात. एवढेच नव्हेतर तंबाखूमुळे भूक न लागणे, आतड्याची कार्यक्षमता मंदावणे, श्‍वसननलिका आणि पोटात व्रण होणे, रक्‍तदाब वाढणे,   फुफ्फुस आणि श्‍वसनसंस्थेचे आजार वारंवार होणे, हृदय आणि इतर महत्त्वाच्या अवयवांना कमी रक्‍तपुरवठा होणे असे अनेक आजार उद्भवतात. प्रदीर्घ धुम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता दाट असते.  महिलांच्या बाबतीत गर्भात विकृती निर्माण होणे, कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, गर्भपात होणे, मृत बालक जन्माला येणे आदी बाबी घडू शकतात. तंबाखूबरोबर चुना मिसळून खाल्ल्याने तोंडातील नाजूक त्वचेला व्रण पडून कर्करोग होऊ शकतो. गुटख्यातील तंबाखू किंवा तंबाखूच्या अर्कामुळे तोंडातील त्वचेवर दुष्परिणाम होतात. गुटख्याचे अतिसेवन करणार्‍यांना काही दिवसांनी तोंड उघडणेही शक्य होत नाही. तंबाखूचे हे सारे दुष्परिणाम आजवर सातत्याने सांगितले गेले आहेत. समाजातील सर्वांनाच ते माहीत आहेत; असे असूनही या व्यसनाच्या आहारी गेलेल्यांचे प्रमाण हे लाखांमध्ये असणे ही एक शोकांतिकाच म्हणायला हवी. या पार्श्‍वभूमीवर तंबाखूचे व्यसन लागू नये किंवा लागलेले व्यसन सोडविण्यासाठी व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे. तंबाखूचे व्यसन सोडविण्यासाठी प्रबळ इच्छाशक्‍तीची आवश्यकता असते. तंबाखूमधील निकोटीनमुळे धूम्रपान सोडणार्‍यांना अस्वस्थ वाटू लागते; पण हे व्यसन सोडणे शक्य आहे, हे तज्ज्ञांचे सांगणे आहे. नव्हेतर, दृढ निश्‍चयांती तंबाखूचे व्यसन सोडल्याची समाजामध्ये अनेक उदाहरणे आहेत. धूम्रपान सोडणार्‍या व्यक्‍तींनी अस्वस्थ वाटू लागल्यास पाणी पिणे, पेपरमिंटची गोळी खाणे, शतपावली करणे असे उपाय करावेत. यामुळे धुम्रपानाची इच्छा कमी होते. नवी जीवनशैली आत्मसात करणे, वैद्यकीय उपचारांचा प्रयोग करणे, व्यसनाच्या गोष्टी जवळ, घरी, कार्यालयात न ठेवणे असे विविध प्रयोग करून व्यसनांमुळे दूर राहता येते. हे खरेच; पण तंबाखूच्या किंवा कोणत्याही व्यसनापासून समाज मुक्‍त होण्यासाठी लोकचळवळ अधिक प्रभावीपणे  राबवण्याची गरज आहे. कारण तंबाखू व्यसनाचे बळी सातत्याने वाढत चालले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार जगात दरवर्षी साठ लाख लोक तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे जीवाला मुकतात. त्यापैकी पन्‍नास लाख लोक थेट व्यसन करत असतात. उर्वरित दहा लाखांपैकी सहा लाख लोक कधीतरी धुम्रपान करणारे असतात. तंबाखूचे व्यसन प्रामुख्याने अविकसित अथवा विकसनशील देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. या देशांमध्ये तब्बल 80 टक्के लोक तंबाखूचे व्यसन करत असल्याने त्या देशांमध्ये रुग्णांची संख्याही जास्त आहे. याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या देशाच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. तंबाखू सेवनामुळे मृत्यूमखी पडणार्‍या व्यक्‍तींमुळे देशाला मनुष्यबळाला मुकावे लागते. 20 व्या शतकात तंबाखूच्या सेवनामुळे दहा कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. 21 व्या शतकात हीच संख्या शंभर कोटींच्या आसपास जाणार आहे. एकूणच तंबाखूचे कुठल्याही प्रकारचे सेवन हे सर्वार्थाने घातक आहे. तंबाख्याच्या सेवनामुळे जिवास मुकलेल्यांची कुटुंबे उघड्यावर पडतात. त्यांच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण होतो, हे खरेच; पण तंबाखू हा देशाच्या विकासातील मोठा अडथळा ठरतो.  या पार्श्‍वभूमीवर आपण शालेय जीवनापासून तंबाखू आणि इतर अमली पदार्थांचेे दुष्परिणाम यांबाबतचे शिक्षण दिले पाहिजे. त्याचबरोबर व्यसनांना मिळणारी प्रतिष्ठा आणि त्यांचे उदात्तीकरण करण्याच्या प्रवृत्ती या दोहोंविरोधातही मोठी लढाई लढावी लागेल. तंबाखूचा इतिहास सांगतो की, अमेरिकेचा शोध लावणार्‍या कोलंबससोबत आलेल्या खलाशांनी तंबाखूचे कलम स्पेनमध्ये आणले. तेथूनच ते जगभर पसरले. सुरुवातीच्या काळात तंबाखू औषधी वनस्पती समजली जात होती. नंतरच्या काळात तंबाखूचे अनिष्ट परिणाम समोर येऊ लागले. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मानवी स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतात हे माहीत असूनही समाजात अशी व्यसने करणार्‍यांची संख्या वाढतच आहे. म्हणूनच जगात तंबाखूविरोधी वातावरण तयार होत आहे. जागतिक संघटनांच्या पातळीवर तंबाखूचा वापर रोखण्यासाठी अनेक ठराव होत आहेत आणि जगाला तंबाखूपासून मुक्‍त करण्यावर सर्वांचा जोर आहे. भारतातही त्यासाठीच प्रयत्न सुरू आहे. ‘तंबाखू सोडा, हिरो बना’ हे अभियानही त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. त्याचा इष्ट परिणाम दिसून येईल?