घा त-अपघात हा मनुष्यप्राण्याला लागलेला एक शापच जणू. जगात, देशात रोज कुठे ना कुठे घात-अपघाताच्या घटना घडतात. त्यात प्राणहानीबरोबरच वित्तहानीही मोठ्या प्रमाणावर होते. कालच्या सोमवारी मध्यरात्री गुजरातच्या सुरतमध्येही असाच एक भयंकर अपघात झाल्याचे समोर आले. सुरतमधील किम रोडच्या फुटपाथवर झोपलेल्या लोकांना अनियंत्रित झालेल्या एका ट्रकने चिरडले. 18 जणांच्या शरीरावरून हा ट्रक गेला. या अपघातात 13 जणांचा जागीच चेंदामेंदा झाला, तर इतर गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. या अपघातातील मृत आणि जखमी लोक राजस्थानी; ते पोटापाण्यासाठी सुरतमध्ये मजुरीवर काम करत होते. त्यामुळेच त्यांचा अपघाती मृत्यू मनाला चटका लावून जातो; पण करणार काय? अपघात म्हणजे अपघातच! अपघात वेळ-काळ सांगून होत नाही.

देशात रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन होत असतानाच आताही सुरतमध्ये हा भंयकर असा ट्रक अपघात झाला. देशात दरवर्षी वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहाच्या काळात वाहन चालकांचे प्रबोधन, वाहतुकीचे नियम सांगणे, चालकांची आरोग्य तपासणी करणे, मद्यप्राशन करुन वाहन न चालविण्याविषयीचे आवाहन करणे असे जनजागृतीचे अनेक उपक्रम राबवले जातात. मध्यंतरी वाहतुकीच्या नियमांत बदल करून नियमभंग करणार्‍यांना होणार्‍या शिक्षेचा कठोरपणाही वाढवण्यात आला. तरीही चालकांचा निष्काळजीपणा, नादुरुस्त वाहने, लवकर पुढे जाण्याची स्पर्धा, वाहनाचा अंदाज न येणे यासारख्या कारणांमुळे रस्ते अपघातात मरण पावणार्‍यांची संख्या कमी होताना दिसत नाही.  उलट अपघाताचे प्रमाण चिंता वाटावी, असे वाढत चालले आहे. देशात सध्या दररोज 415 लोक केवळ रस्ते अपघातात मृत्यू पावतात. एका पाहणीनुसार, देशात दर तासाला 19 व्यक्तींचा अपघातामुळे रस्त्यावर मृत्यू होतो आणि दर 3 मिनिटाला एक जीव गमावला जातो.

देशभरात रोज होणार्‍या रस्ते अपघातांच्या आकडेवारीत मुंबईचे स्थान पाचव्या क्रमांकावर; तर दिल्लीचे स्थान पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार नामिबियाचा रस्ते अपघातांमध्ये आणि त्यात होणार्‍या मृत्यूंमध्ये पहिला क्रमांक लागतो. त्याखालोखाल इराण, सुदान, स्वित्झर्लंड, व्हेनेझुएला, काँगो, इराक वगैरे देशांचा क्रमांक आहेे. रस्ते अपघातात बळी जाणार्‍या संख्येत भारताचा जगात तिसरा नंबर लागतो. एकूण काय, तर वाढते अपघात आणि वाढते मृत्यू, हेच आता एक दुर्दैवी सूत्र बनले आहे. आजवर झालेल्या युद्धात एकूण जे निष्पाप बळी गेलेत त्यांच्याहीपेक्षा अधिक संख्येने लोक अपघातात मरण पावले आहेत. कधी काळी योग्य औषध उपचाराअभावी लोक पटापटा मरायचे. कॉलरा, पटकी, प्लेग अशा काही साथीच्या रोगांमुळे कुटुंबचे कुटुंब नाहीसे व्हायचे. गाव ओस पडायचा. मात्र, काळ बदलला आणि मानवी आरोग्याच्या सोयसुविधा वाढल्या. लसीकरण झाले. ‘कोरोना’वरही आता आपल्याकडे लसीकरण सुरु झाले आहे. मुद्दा हाच की, केवळ साथीच्या आजाराने माणसं मरण्याचे प्रमाण घटले; पण अलीकडे साथीच्या रोगांत मरण्याऐवजी माणसं विविध अपघातांमध्ये अधिकचे मरत आहेत. त्यातच अधू-अपंग होत आहेत. झाले असे आहे की, अलीकडच्या काळात विविध वाहनांची संख्या भरमसाठ वाढली. त्यात वाहनांची वेग मर्यादा पाळण्याचे संकेत नाहीत. मग होते असे की, कुठलेही वाहन हाती पडले की, ते सुसाट वेगाने दामटण्याची घाई चालक करतो.

आपल्याकडील अनेक वाहन चालक खर्‍या अर्थाने प्रशिक्षित झालेले नसतात. तरीही ते वाहन हाती घेऊन रस्त्यावर पळवतात. भूत मागे लागल्यासारखे त्यांचे ते वाहन पळवणे असते.‘अती घाई, संकटात नेई’ हे त्याला कळते; पण वळत नाही. त्यात काही अपवाद वगळता आपल्याकडील रस्त्यांची अवस्था वाईट. रस्ते काय किंवा रेल्वेरुळ लाईन काय, त्याविषयीची सरकारी उदासीनताही झाकून राहिलेली नाही. ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशा अवस्थेत असलेल्या रस्त्यांची संख्या आपल्याकडे कमी नाही. मागील चार-पाच वर्षांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाचा विकास करण्याची मोहीम हाती घेतली आहे; पण त्यालाही अपेक्षित गती नाही. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे धिम्या गतीने होत आहेत. त्यात अनुभव असा की, रस्ते निर्मिती आणि दुरुस्तीमध्ये काही कंत्राटदार, सर्वसंबंधित अधिकारी सत्ताधार्‍यांच्या सौजन्याने ‘हात मारून’ घेतात, असा आरोप होतो. त्यामुळेच आपल्याकडील रस्त्यांचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही, असे म्हणता येते.

खराब रस्ते आणि वाहनांचे वाढते वेग याच दोन कारणांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे संशोधकांनी काही अभ्यासांमधून दाखवून दिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर कारमध्ये आणि दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठीही काही सुविधा वापरण्याची सक्ती करून अपघातांचे प्रमाण कमी करण्याचा सरकारचा विचार आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही नियम करण्यात आले आहेत. त्याचे काटेकोर पालन झालेच पाहिजे. ‘तुम्ही वाहन चालवताना नियम आणि संयम नाही पाळला, तर यम भेटीला येतो जो आपला जीव घेऊन जातो.’ असे जे आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात ते खरेच आहे. ट्रक चालकाने नियम, संयम पाळला असता तर, सुरतमध्येही अपघात झालाच नसता; फूटपाथवर झोपलेले 13 कष्टकरी जीव हकनाक मृत्यूच्या दाढेत गेले, ते बेफिकीरीचेच बळी ठरले आहेत.