Date: Monday, June 18, 2018
Follow us on:


राज्यातील दुष्काळ हा मानवनिर्मितऔरंगाबाद/एएनएन
दुष्काळ हा मानवनिर्मित आहे. या दुष्काळाची सर्वांत जास्त झळ ही स्त्रियांना पोहोचते. यामुळे स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. असे मत पत्रकार आसाराम लोमटे यांनी केले. ते ‘महाराष्ट्रातील दुष्काळ’ या पुस्तकावर आधारित विशेष परिसंवादाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 
परिवर्तनाचा वाटसरू आणि द युनिक फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्रातील दुष्काळ’ या पुस्तकावर आधारित परिसंवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन दि.30 मे रोजी मराठवाडा साहित्य परिषद यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसरातील डॉ.नांदापूरकर सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता करण्यात आले होते. या पुस्तकात मराठवाड्यातील आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळाचा अभ्यास केला आहे. यावेळी प्रमुख वक्‍ते म्हणून पत्रकार आसाराम लोमटे (परभणी), अभ्यासक आणि कार्यकर्त्या सीमा कुलकर्णी (पुणे) आणि जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे (जालना) आदी उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून जलतज्ज्ञ विजय अण्णा बोराडे (जालना) हे होते. मान्यवरांच्या हस्ते रमेश पाध्ये लिखित ‘दुष्काळाला भिडताना’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. आसाराम लोमटे पुढे म्हणाले की, या पुस्तकात मराठवाड्यातील आणि पश्‍चिम भागातील तीन तीन गावांच्या दुष्काळाची चर्चा यात केली आहे. या दुष्काळामुळे गावाची गाव स्थलांतरित होत आहेत; पण त्याच गावात त्यांना दुसरा रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही. हे सरकारचे उदासीन धोरण आहे. सरकारचे धोरण हे आणि नेतृत्व हे धोरण असेल तर विकास हा होतोच; पण मराठवाड्यात धोरणाची कटिबद्धता दिसतच नाही. हा विषय संशोधनाचा असून यावर उपाययोजनाही झाल्या पाहिजेत. सीमा कुलकर्णी म्हणाल्या की, या पुस्तकात महिला आणि विशिष्ट जातीच्या महिलांबाबत चर्चा केली असून त्याचा परिणाम कसा होतो याबाबत चर्चा आहे. दलित आणि भटक्या जातीच्या महिलांनाच याचे परिणाम भोगावे लागतात. वास्तव म्हणजे पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष, दुष्काळ ही एक सामाजिक घटना असून याकडे वेगवेगळ्या समाजातील घटकांवर परिणाम होतात. यासाठी त्यांना निर्वाहभत्ता किंवा कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या. दुष्काळाचा प्रश्‍न हा मूलतः व्यवस्थापन, प्रशासन आणि नियमन या तीन बाबींवर अवलंबून आहे. सिंचनासाठी अनेक कायदे आहेत; पण ते अमलात आणलेच जात नाही. सर्व मनमानी कारभार चालला आहे. सर्व गाढ झोपेत आहेत. यावर उपाययोजना करण्याची गरज आहे, असे मत जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी यावेळी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत गोरे यांनी केले, तर आभार कपिल हांडे यांनी मानले. कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.